अडवलपालच्या ग्रामसभेत फोमेन्तोच्या खाणीला समर्थन

खाणी सुरू राहणे गरजेचे गावाचे हित जपण्याचे आवाहन


20th January, 12:43 am
अडवलपालच्या ग्रामसभेत फोमेन्तोच्या खाणीला समर्थन

ग्रामसभेनंतर पत्रकारांशी संवाद साधताना अडवलपाल पंचायतीचे सदस्य आणि ग्रामस्थ.

प्रतिनिधी। गोवन वार्ता

डिचोली : अडवलपाल ग्रामसभेत खाण व्यवसाय सुरू राहण्यासाठी उपस्थित ग्रामस्थांनी समर्थन दिले. खाण व्यवसाय सुरू होऊन गावाचा उत्कर्ष होणे गरजेचे आहे. खाण कंपनीने पर्यावरण व ग्रामस्थांचे हित जपण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असा सूर ग्रामसभेत उमटला. ग्रामपंचायत सभागृहात रविवारी झालेल्या या ग्रामसभेला पंचायत मंडळाचे सदस्य आणि ग्रामस्थ उपास्थित होते.            

ग्रामसभेत खाण व्यवसाय विषयावर सविस्तर चर्चा होऊन उपस्थित ग्रामस्थांनी खाण व्यवसाय सुरू राहण्याला समर्थन दिले. फोमेन्तो कंपनीच्या खाणीला दिलेला ‘ना हरकत’ दाखला पंचायतीने मागे घेऊ नये. खाणीला पाठिंबा द्यावा, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली. अंकिता खरवत, मयूर कलंगुटकर, नीलेश परब यांच्यासह अनेकांनी भूमिका मांडताना खाण व्यवसाय सुरू राहण्याचे समर्थन केले. 

पंचायत कार्यालयात झालेल्या ग्रामसभेला ट्रक मालक, खाण अवलंबित आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी खाण व्यवसाय सुरू राहण्याला समर्थन देताना खाणीमुळे वेगवेगळ्या योजना येऊन गावाच्या विकासाला चालना मिळेल, असा सूर व्यक्त केला. खाण समर्थक लोकांनी ग्रामसभेत खाणीला सर्व प्रकारचे परवाने देण्यासाठी पूर्ण समर्थन दर्शवले. तसा ठराव या ग्रामसभेत मंजूर करण्यात आला. हा व्यवसाय चालू ठेवताना गावाचे संपूर्ण हित जपणे बंधनकारक आहे. त्यामुळे पर्यावरणाची हानी होणार नाही.

फोमेन्तो कंपनीबद्दल कौतुकोद् गार

ग्रामसभेत ग्रामस्थांनी फोमेन्तो कंपनीबद्दल कौतुकोद्गार काढले. खाण गावातील लोकांच्या भल्यासाठी काम करत आहे. त्यामुळे आम्ही फोमेन्तो खाण कंपनीचे आभारी आहोत. या कंपनीमुळे गावातील बेरोजगार तरुणांना काम मिळाले आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रोजगारामुळे गावातील आर्थिक प्रश्न मिटत आहेत. खाण कंपनीमुळे गावात आणखी सुधारणा होऊ शकते. त्यामुळे खाण व्यवसायाला विरोध न करता त्याला पाठिंबा देऊया, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. 

खाण कंपनीकडून ग्रामस्थांच्या अपेक्षा...
 स्थानिकांना रोजगार द्यावा.
वेगवेगळे कंत्राट उपलब्ध करून द्यावीत
स्थानिकांचे ट्रक माल वाहतुकीसाठी घ्यावेत.
गावाचे सर्वतोपरी ‌हित जपावे.
गावाच्या सर्वसमावेशक विकासासाठी योगदान द्यावे.