गोवा : जीकॅममार्फत ५० जाणांवर होणार हाताच्या दुर्धर शस्त्रक्रिया

गोमेकॉचे डीन बांदेकर : २५ जानेवारीपर्यंत शिबिर राहणार सुरू


20th January, 11:59 pm
गोवा : जीकॅममार्फत ५० जाणांवर होणार हाताच्या दुर्धर शस्त्रक्रिया

पत्रकार परिषदेत माहिती देताना गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर. सोबत डॉ. युरी डायस आणि जीकॅमचे सदस्य.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : स्वीस फाऊंडेशनच्या जीकॅमतर्फे गोवा वैद्यकीय महाविद्यालात (गोमेकॉ) ५० जणांच्या हातांवर दुर्धर शस्त्र‌क्रिया केल्या जाणार आहेत. शिबिराच्या पहिल्या दिवशी, सोमवारी ४ जणांवर शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या. पूर्ण शिबिरात ५० जणांच्या हातांवर शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत, अशी माहिती गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला डॉ. बांदेकर यांच्यासोबत गोमेकॉतील डाॅक्टर आणि जीकॅमचे सदस्य उपस्थित होते. सोमवारी झालेल्या शस्त्रक्रिया जीकॅमचे डॉ. मार्को लँझेटा बर्तानी (स्वीत्झर्लंड), जीओवन्नी विटले (इटली), अलेस्ला मोरेथ या तज्ज्ञांनी केल्या. गोमेकॉच्या प्लास्टिक सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. युरी डायस आणि अन्य डॉक्टरांनी या शस्त्रक्रियेत सहभाग घेतला. पहिल्या दिवशी जीकॅमच्या डॉक्टरांनी ६० रुग्णांच्या हातांची तपासणी केली. तपासणीनंतर ४ जाणांच्या हातांवर शस्त्रक्रिया केल्या. मॅलीगनेसी ऑफ हँड, न्युरोफायब्रोमेटोसिस, रीकरंट ड्युपट्रेन कॉन्ट्रॅक्चर हँड याविषयी या शस्त्रक्रिया होत्या. पूर्ण शिबिरात आणखी ४६ शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट आहे.
गोमेकॉतील ऑर्थोपेडिक विभागातील डॉक्टर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया करतात. तरीही दहा टक्के शस्त्रक्रिया गोमेकॉतील डॉक्टरांना आव्हान ठरत असतात. या शस्त्रक्रियांसाठी तज्ज्ञांचा सल्ला आणि मदत गरजेची असते. अशा दुर्धर शस्त्रक्रिया जीकॅमच्या शिबिरात केल्या जातील, असे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी सांगितले. दरवर्षी स्वीस फाऊंडेशनच्या जीकॅमचे डॉक्टर गोमेकॉला भेट देऊन दुर्धर शस्त्रक्रिया करतील. रुग्णांसह गोमेकॉतील विद्यार्थी आणि डॉक्टरांना या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळणार आहे. जीकॅमचे ५ ते ६ डॉक्टर या शस्त्रक्रिया करत आहेत. शस्त्रक्रिया केलेल्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे, असे प्लास्टिक सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. युरी डायस यांनी सांगितले.
पहिल्या शिबिरात चार जाणांच्या हातांवर शस्त्रक्रिया
स्वीस फाऊंडेशनच्या जीकॅमसोबत गोमेकॉने करार केला आहे. जीकॅमचे तज्ज्ञ डॉक्टर गोमेकॉत येऊन हाताच्या दुर्धर शस्त्रक्रिया करणार आहेत. गोमेकॉत होत असलेले हे अशा प्रकारचे दुसरे शिबिर आहे. पहिल्या शिबिरात चार जाणांच्या हातांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. जीकॅमचे तज्ज्ञ डॉक्टर गोमेकॉचे विद्यार्थी तसेच डॉक्टरांनाही मार्गदर्शन करत आहेत. २५ जानेवारीपर्यंत हे शिबिर सुरू राहणार आहे, असे डॉ. बांदेकर यांनी सांगितले.