काहींना वाटला अन्याय; काहींची भूमिका नियमच श्रेष्ठ!

‘तिऱ्हाईत’ नाटकाच्या संदर्भातील प्रकारावरून नाट्य क्षेत्रात संमिश्र प्रति​क्रिया


20th January, 12:36 am
काहींना वाटला अन्याय; काहींची भूमिका नियमच श्रेष्ठ!

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : कला अकादमीच्या ‘अ’ गट नाट्य स्पर्धेत दर्जेदार ठरूनही मांगिरीश युथ क्लबच्या केलेल्या एका चुकीमुळे त्यांचे ‘तिऱ्हाईत’ नाटक निकालातून बाहेर पडले. त्यामुळे स्पर्धेचा निकालही बदलला. या प्रकारावरून नाट्य लेखक, दिग्दर्शक, कलाकार आणि रसिकांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.


यासंदर्भात दै. ‘गोवन वार्ता’ने ​‘तिऱ्हाईत’च्या दिग्दर्शक दक्षा शिरोडकर यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, कला अकादमीच्या घटनेतील नियम क्रमांक १६ नुसार ‘ब’ गटातील कलाकाराला ‘अ’ गटातील नाटकात काम करता येत नाही. पण आमच्याकडून यावर्षी ती चूक झाली. त्याबाबतचा माफीनामाही आम्ही अकादमीला सादर केला. या नियमाचे गेल्या अनेक वर्षांपासून उघडपणे उल्लंघन होत असल्याचे अनेकांना माहीत आहे. तरीही हा नियम या वर्षी इतका महत्त्वाचा का झाला, असा प्रश्न उपस्थित करत, हा न्याय नाही, तर निष्ठावान असण्याचा आपण त्याग केला आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
कला अकादमीतर्फे आयोजित ‘अ’ आणि ‘ब’ गट नाट्य स्पर्धेचा उद्देश हा गोव्यातून अधिकाधिक कलाकार तयार व्हावेत, हाच आहे. स्पर्धेसाठी नियम असणे गरजेचेच आहे. त्याच नियमाचा भंग करत गतवर्षी आवश्यकतेपेक्षा कमी नाटके स्पर्धेत असतानाही दोन नाटके अंतिम स्पर्धेसाठी पाठवण्यात आली. कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी कला अकादमीने घेतलेला हा निर्णय मला आवडला. तसाच निर्णय यावेळी ‘तिऱ्हाईत’च्या बाबतीत होणे अपेक्षित होते. कारण ती त्यांच्याकडून नकळत झालेली चूक होती, अशी प्रतिक्रिया प्रसिद्ध गोमंतकीय चित्रपट दिग्दर्शक साईनाथ परब यांनी दिली.


कायदा आणि नियम सर्वांना समान असणे हे लोकशाहीचे मूलतत्त्व आहे. मांगिरीश युथ क्लबने नियमाचा भंग केला, त्यामुळे त्यांना निकालातून बाहेर काढणे चुकीचे नाही. परंतु, नियम पालनात वास्तवाचे संदर्भ लक्षात घेतल्यास हा प्रकार सार्वजनिक जीवनातील दांभिकता आणि अध:पतनाचे उदाहरण असल्याचे नाट्य कलाकार नारायण खराडे म्हणाले. ‘तिऱ्हाईत’ नाटकाच्या बाबतीत जे काही घडले, त्याला निकालावेळी कला अकादमी माफ करू शकली असती; पण तसे काही घडले नाही. असे प्रकार यापुढे घडू नयेत, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. कला अकादमीच्या कायद्यातील नियम १६ योग्यच आहे. त्यामुळे नव्या कलाकारांना ‘ब’ गटात स्वत:ला सिद्ध करावे लागते, त्यांना त्यातून योग्य व्यासपीठ मिळते, असे नाट्य लेखक साई पाणंदीकर म्हणाले.

मांगिरीश युथ क्लबकडून चूकच : सतीश गवस
कला अकादमीच्या नियमानुसार मांगिरीश युथ क्लबने केलेली चूक ही चूकच आहे. त्यांची ही चूक गृहित धरलीच पाहिजे. नाट्य स्पर्धेत यापुढे असे प्रकार होऊ नयेत, याची कला अकादमीने दक्षता घेणे गरजेचे आहे, असे मत नाट्य लेखक सतीश गवस यांनी व्यक्त केले. एखाद्या कलाकाराने दोन्ही गटांमध्ये काम केल्यास गोंधळ उडू शकतो. त्यामुळे नियम १६ महत्त्वाचा आहे, असेही त्यांनी नमूद केले.

नाट्यरसिक संदेश प्रभुदेसाय म्हणतात...
कला अकादमीच्या नाट्य स्पर्धेत घोळ घातला तो परीक्षकांनी. ‘ब’ गटातील नाटकात काम केलेल्या एका कलाकाराने ‘अ’ गटातील ‘तिऱ्हाईत’मध्ये काम केले. त्यात त्याने एकही संवाद नसलेली (‘अ’ गटात एकदाच कुत्र्याला हाक मारण्याचे सोडून) कोरसमधील अत्यंत नगण्य पात्रे रंगवली आहेत.
कोणत्याही कलाकारास (तंत्रज्ञासह) कोणत्याही एकाच गटातून आणि एकाच नाटकात सहभागी होता येईल, असे नियमावलीचे १६ वे कलम सांगते. इतर कित्येक नियमांमध्ये कोणता नियम मोडल्यास नाटक अपात्र ठरविले जाईल, ते स्पष्टपणे नमूद केले आहे. पण, १६ व्या कलमामध्ये तसे काही सांगितलेले नाही.
यातील कुठलाही नियम मोडल्यास नाटक अपात्र ठरवले जाईल, असा सर्वसाधारण नियमही नाही. तेव्हा या नियमभंगासाठी संपूर्ण नाटकच अपात्र करणे परीक्षकांवर अजिबात बंधनकारक नव्हते. तसेच नियम क्रमांक ३२ नुसार ‘स्पर्धेतील विद्यमान सर्व बक्षिसे द्यावीत किंवा देऊ नयेत यासंबंधीचा निर्णय परीक्षक मंडळाच्या शिफारसीवर अवलंबून राहील’ असे सांगितले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त या दोन्ही गटांमध्ये असलेल्या त्या कलाकाराला बक्षिसांच्या यादीतून वगळून परीक्षक निकाल देऊ शकले असते. संपूर्ण नाटकच अपात्र ठरविण्याची काहीही गरज नव्हती.
कोणताही नियम परिपूर्ण नसतो. त्यामुळेच न्यायालये राज्यघटनेतील कलमांचाही कालांतराने अन्वयार्थ लावतात. तसा अन्वयार्थ लावून परीक्षक सर्व नाट्यप्रयोगांना न्याय देऊ शकले असते. इथे परीक्षकांनीच अन्याय केला, असे मला सकृतदर्शनी वाटते.