रविवारी केरी किनाऱ्यावर सामसूम : अनेक वर्षांपासून बेकायदा व्यवसाय
पेडणे : केरी समुद्रकिनारी पठारावर पुणे येथील पर्यटक शिवानी दाभाळे व पॅराग्लाइडिंग पायलट सुमन नेपाळी याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पॅराग्लायडिंग कंपनीचा मालक शेखर रायझादा यांच्या विरोधात गुन्हा नोंद करून अटक केल्यानंतर बेकायदेशीर पॅराग्लायडिंग करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. रविवारी सर्वत्र पॅराग्लाइडिंग व्यवसाय बंद होते. त्यामुळे किनाऱ्यावर सामसूम होती.
गेल्या कित्येक वर्षांपासून केरी, हरमल पठारावरून बेकायदेशीर पॅराग्लायडिंग सुरू होते. या संदर्भात अनेकांनी कोस्टल पोलिसांकडे तक्रारी केल्या. परंतु तात्पुरती कारवाई करण्यात येत होती. हे बेकायदेशीर व्यावसायिक पोलिसांना जुमानत नसल्याचे नागरिकांनी सांगितले.
केरी मुख्य रस्त्यावरून पठारावर जाण्यासाठी किमान पाच किलोमीटर पेक्षा जास्त अंतर आहे. या पठारावर जाण्यासाठी तसा पक्का रस्ता नाही. त्याच रस्त्यावरून वाट काढत काढत पॅराग्लायडिंग करण्यासाठी अनेक पर्यटक या पठारावर जातात. बेकायदेशीर पॅराग्लायडिंग करणारे व्यावसायिक आपापले फलक आपापली जागा निश्चित करून येणाऱ्या पर्यटकांकडून किमान साडेचार हजार रुपये वसूल करतात आणि बेकायदेशीर पॅराग्लायडिंग व्यवसाय करतात. पूर्वी या पठारावर मोठ्या प्रमाणात पॅराग्लायडिंग करणाऱ्या व्यावसायिकांचे फलक त्यांचे संपर्क नंबर आणि त्यांची जागा निश्चित करण्यात येत होती. परिसरात पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्थाही केली जायची. त्या ठिकाणी बियरच्या बाटल्यांच्या खचही पडलेला दिसून आला.
पर्यटन खात्यांच्या अधिकाऱ्यासमोर पॅराग्लायडिंग
दोन दिवसांपूर्वी केरी तेरेखोल समुद्रकिनारी भागातील दोन शॅक व्यावसायिकांना शॅक रेस्टॉरंट उभारण्यासाठी त्यांची जमीन मोजमाप करून देण्यासाठी पर्यटन खात्याचे अधिकारी आले होते. हे अधिकारी जमिनीची मोज माप करत असताना परिसरात मोठ्या प्रमाणात किमान दहा पॅराग्लायडिंग पर्यटक उड्डाण करत होते आणि हे चित्र पर्यटन खात्याचे अधिकारी उघड्या डोळ्यांनी पाहत होते. मात्र त्यांच्यावर त्यावेळी सुद्धा कारवाई झाली नाही.
दोन्ही मृतदेह शवागरात
दरम्यान, दोन्ही मृतदेह बांबोळी येथील शवगृहात ठेवण्यात आले आहेत. दोघांचेही कुटुंबिय गोव्यात पोहाचले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. ओळख पटवून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येतील, अशी माहिती मांद्रे पोलीस निरीक्षक शेरीफ जॅकीस यांनी दिली.
सरकारकडून कोणतीही कारवाई नाही : सरपंच नागोजी
या घटनेनंतर केरीच्या सरपंच धरती नागोजी यांच्याकडे संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की स्थानिक आमदार जीत आरोलकर यांनीही पंचायतीला सूचना केली होती. किनारी भागात पॅराग्लायडिंग करण्यास परवाने देऊ नये. त्यासाठी विरोध करणारा ठराव मंजूर करावा. तसा ठराव मंजूर करून आम्ही संबंधित खात्याला पाठवला. परंतु त्याची आजपर्यंत कार्यवाही झाली नाही. परंतु केरी गावात जी घटना घडलेली आहे. ती अत्यंत दुर्दैवी आहे. पर्यटकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी सरपंच धरती नागोजी यांनी केली. तसेच घटना घडली तो परिसर केरी पंचायत क्षेत्रात येत नसल्याचा दावा त्यांनी केला.
केरी येथील याच पठारावरून बेकायदा पॅराग्लायडिंग सुरू होते.