दुचाकीवर मागे बसलेल्या, इतर वाहनचालकांच्या मृत्यूंत वाढ
गोवन वार्ता
पणजी : राज्यात २०२४ मध्ये २,६८२ अपघातांत २८६ जणांचा मृत्यू झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत ५.७६ टक्के, म्हणजे १६४ अपघात, तर अपघाती मृत्यूंत १.३८ टक्के, म्हणजे ४ मृत्यू कमी झाले आहेत. २०२४ मध्ये सर्वाधिक ७२.७३ टक्के म्हणजे २०८ दुचाकीचालक आणि मागे बसलेल्या व्यक्तींचे मृत्यू झाले. याशिवाय दुचाकीवर मागे बसलेल्या २७.२७ टक्के (९), तर इतर वाहन चालकांच्या १३.१३ टक्के (२) मृत्यूंत वाढ झाली आहे. त्यामुळे हा चिंतेचा विषय बनला आहे.
राज्यातील अपघाती मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. वाहतुकीत शिस्त आणण्यासाठी पोलीस खात्याकडून शाळा, विद्यालये, महाविद्यालयांत तसेच इतर शैक्षणिक संस्थांत रस्ता सुरक्षेबाबत जागृती केली जात आहे. अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली जात आहे.
वाहतूक पोलीस विभागाच्या आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये २,६८२ अपघातांत २८६ जणांचा मृत्यू झाला. यात १६६ दुचाकीस्वार, दुचाकीच्या मागे बसलेले आणि पादचारी प्रत्येकी ४२, इतर वाहनचालक १७, प्रवासी १४, सायकलस्वार ५ यांचा समावेश आहे. २०२३ मध्ये २,८४६ अपघातांत २९० जणांचा मृत्यू झाला होता. त्यात १७६ दुचाकीस्वार, ४४ पादचारी, ३३ दुचाकीच्या मागे बसलेले, १५ इतर वाहनचालक, १६ प्रवासी, ४ सायकलस्वार व इतर दोघांचा समावेश होता.
सरासरी ३० तासांत एकाचा अपघातीमृत्यू
२०२४ मध्ये राज्यात २,६८२ अपघात झाले. यावरून सरासरी दिवसाला ७ अपघात होत आहेत. २८६ अपघातीमृत्यू झाले. त्यानुसार सरासरी तीस तासांत एकाचा अपघातात मृत्यू होत आहे. सर्वाधिक अपघाती मृत्यू (७२.७३ टक्के) दुचाकीस्वार आणि दुचाकीवर मागे बसलेल्यांचे झाले आहेत. त्यात १६६ दुचाकीस्वार, तर ४२ दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तींचा समावेश आहे.
दुचाकीवर मागे बसलेल्या ४२ व्यक्तींचा मृत्यू
दुचाकीवर मागे बसलेले आणि इतर वाहनचालकांच्या मृत्यूंमध्ये वाढ झाली आहे. २०२३ मध्ये दुचाकीवर मागे बसलेल्या ३३ व्यक्तींचा मृत्यू झाला होता, तर २०२४ मध्ये ४२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात २७.२७ टक्के, म्हणजेच ९ मृत्यूंची वाढ झाली आहे. २०२३ मध्ये १५ इतर वाहन चालकांचे मृत्यू झाले होते. २०२४ मध्ये १७ जणांचे मृत्यू झाले आहेत. त्यात १३.१३ टक्के, म्हणजे २ मृत्यूंची वाढ झाली आहे.