कला अकादमीचे अध्यक्ष गोविंद गावडे यांची हमी
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : कला अकादमीच्या ‘अ’ गट नाट्य स्पर्धेत गेली तीन वर्षे सहभागी झालेल्या सर्व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी लवकरच बैठक घेऊन, स्पर्धेच्या नियमांबाबत चर्चा करण्यात येईल. त्यांच्या संमतीने काही नियमांमध्ये बदल होऊ शकतात, अशी माहिती कला आणि संस्कृती मंत्री तथा कला अकादमीचे अध्यक्ष गोविंद गावडे यांनी सोमवारी दै. ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.
यंदाच्या नाट्यस्पर्धेत मंगेशीतील मांगिरीश युथ क्लब संस्थेच्या दक्षा शिरोडकर दिग्दर्शित ‘तिऱ्हाईत’ नाटकाने संपूर्ण स्पर्धेवर छाप पाडली. परंतु ‘ब’ गटातील नाटकात काम केलेल्या एका कलाकाराने ‘अ’ गटातील ‘तिऱ्हाईत’मध्ये केले. याचा मोठा फटका ‘तिऱ्हाईत’ नाटकाला बसला. या नाटकाने कला अकादमीच्या घटनेतील नियम क्रमांक १६ चा भंग केल्याचा ठपका ठेवत, कला अकादमीने या नाटकाला निकालातून बाहेर काढले. त्यामुळे नियम क्रमांक १६ चर्चेत आला. दै. ‘गोवन वार्ता’ने या संदर्भातील वृत्ताला वाचा फोडल्यानंतर अनेक नाट्य लेखक, दिग्दर्शक आणि कलाकारांनी नाट्य स्पर्धेच्या नियमावलीवर भाष्य करण्यास सुरुवात केली आहे. त्यातील काहींना कला अकादमीने ‘तिऱ्हाईत’वर अन्याय केल्याचे वाटते. तर, काहींना मात्र ‘तिऱ्हाईत’ने चूक केल्याचे वाटते.
गोविंद गावडे म्हणतात...
कला अकादमीच्या ‘अ’ आणि ‘ब’ या दोन्ही गटांतील स्पर्धा गेल्या अनेक वर्षांपासून नियमांनुसारच पार पडतात. यावेळी प्रथमच ‘तिऱ्हाईत’ने दोन नियमांचा भंग केल्याचे समोर आले. त्यामुळे या नाटकावर कारवाई करण्यात आली.
‘ब’ गटात काम केलेल्या कलाकाराला त्याचवर्षी ‘अ’ गटात काम करता येत नाही, असे नियम क्रमांक १६ सांगतो. एखाद्या दिग्दर्शकाला ‘ब’ गटातील एखाद्या कलाकाराचा अभिनय आवडला असेल, तर त्याला अगोदरच बूक करून पुढील वर्षीच्या नाटकात घेता येते. पण, मांगिरीश युथ क्लबकडून चूक झाली.
गेल्या तीन वर्षांत ‘अ’ गटातील नाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आपण त्यांच्याशी नियमांबाबत चर्चा करणार आहे. त्यानुसार त्यांच्या संमतीने काही नियमांमध्ये दुरुस्ती केली जाऊ शकते.