१३ याचिकांवरील सुनावणी लोकायुक्ताअभावी प्रलंबित

दैनंदिन कामकाज ठप्प : नेहमीच्या सुनावण्याही रखडल्या

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
6 hours ago
१३ याचिकांवरील सुनावणी लोकायुक्ताअभावी प्रलंबित

पणजी : गेल्या महिनाभरापासून राज्यातील लोकायुक्त पद रिक्त आहे. त्यामुळे दैनंदिन कामकाज ठप्प असून नेहमीच्या सुनावण्याही बंद आहेत. दरम्यान, लोकायुक्तांकडे असलेल्या १३ याचिकांवरील सुनावणी प्रलंबित आहेत. तसेच दोन याचिकांवर सुनावण्या होणार की नाही हे याबाबतचा निर्णय अद्याप निश्चित झालेला नाही, अशी माहिती लोकपाल कार्यालयातून मिळाली आहे.

लोकायुक्त अंबादास जोशी यांचा कार्यकाळ १५ डिसेंबर रोजी संपला. निवृत्त न्यायमूर्ती अंबादास जोशी यांनी ७ मे रोजी २०२१ रोजी लोकायुक्त म्हणून पदभार स्वीकारला. ते ४ वर्षे ७ महिने लोकायुक्तपदावर होते. जेव्हा त्यांनी पदभार स्वीकारला तेव्हा ४३ याचिका प्रलंबित होत्या. या कालावधीत त्यांनी प्रलंबित याचिकांसह नवीन याचिकाही निकाली काढल्या.
जोशी यांच्या कार्यकाळात २०२१ मध्ये ३, २०२२ मध्ये ३२, २०२३ मध्ये ४ आणि २०२४ मध्ये १३ याचिका निकाली काढण्यात आल्या. त्यांनी एकूण ५२ याचिका निकाली काढल्या. वय झाल्यामुळे ते पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत. निवृत्त न्यायमूर्ती पी. के. मिश्रा यांचा कार्यकाळ संपल्यानंतर अंबादास जोशी यांनी लोकायुक्त म्हणून पदभार स्वीकारला.
अंबादास जोशी हे मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश होते. जुलै २०१४ ते जुलै २०१९ पर्यंत ते महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष होते. के.एस. मिश्रा यांचा कार्यकाळ सप्टेंबर २०२० मध्ये संपल्यानंतर ७ महिने लोकायुक्त पद रिक्त होते. तो काळ कोविड-१९ महामारीचा होता. दरम्यान, आताही एक महिना उलटून गेला तरी लोकायुक्त पदावर नियुक्तीची प्रक्रिया सुरू झालेली नाही.
जोशींच्या कार्यकाळात ५२ याचिका निकाली
वर्ष   याचिका
२०२१ ०३
२०२२ ३२
२०२३ ०४
२०२४ १३
एकूण ५२

हेही वाचा