ग्रामसभेत ठराव : पीडब्ल्यूडीसह केंद्र सरकारचे वेधणार लक्ष
उसगाव पंचायतीच्या ग्रामसभेत बोलताना सरपंच रामदास डांगी.
फोंडा : तिस्क-उसगाव ते खांडेपारपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे सत्र सुरू असते. अपघातात अनेकांचा नाहक बळीसुद्धा गेलेले आहेत. अपघात रोखण्यासाठी पार-उसगाव ते तिस्क-उसगाव पर्यंतच्या बगल रस्त्यावर उड्डाणपूल उभारण्याचा महत्त्वपूर्ण ठराव उसगाव पंचायतीच्या ग्रामसभेत रविवारी घेण्यात आला आहे. सरपंच रामनाथ डांगी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत पंचायतीचे अतिरिक्त सचिव मयूर कुडाळकर व अन्य पंच सदस्य उपस्थित होते.
अपघातावर नियंत्रण येण्यासाठी ठोस उपाय काढणे अत्यंत गरजेचे आहे. स्थानिक पंचायतीमार्फत परिसरात उड्डाणपूल उभारण्याचा ठराव बांधकाम खात्याकडे तथा राष्ट्रीय महामार्ग खात्याकडे पोहचवणे गरजेचे आहे. तरच या मार्गावरील अपघातांवर नियंत्रण येऊ शकते. उड्डाणपूल उभारताना मध्यभागी खांब उभारण्याची गरज असल्याचा ठराव यावेळी ग्रामस्थांनी घेतला आहे.
उसगाव भागात अनेक औद्योगिक वसाहती कार्यरत कंपन्यामध्ये स्थानिकांना रोजगार मिळणे गरजेचे आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ग्रामसभेत वारंवार प्रश्न उपस्थित केला जातो. पण, औद्योगिक वसाहती कार्यरत कंपन्यामध्ये इतर भागातील कामगारांची भरती केली जाते. स्थानिक पंचायतीने यासंदर्भात उपाय करण्याची मागणी करून ग्रामस्थांनी आवश्यक ठराव घेतला.
मागील पंचायत सचिवाविरोधात विनयभंगाची तक्रार पोलीस स्थानकात नोंद झाली. तसेच पंचायतीमार्फत केलेल्या सर्वेक्षणाबद्दल चर्चा करण्यात आली. त्यावर सरपंच रामदास डांगी यांनी दिलेल्या उत्तरावर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
ग्रामसभेबरोबर पंचायत मंडळही उड्डाणपूल उभारण्यासाठी ठराव घेऊन संबंधित खात्याला पाठविणार आहे. स्थानिकांना औद्योगिक वसाहतीत रोजगार देण्यासाठीही कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल. तसेच पंचायत क्षेत्रातील सर्व घरांचे सर्वेक्षण पंचायतीमार्फत करण्यात आले अाहे. - रामनाथ डांगी, सरपंच, उसगाव पंचायत