थिवी ग्रामस्थांकडून ग्रामसभेत कचरा समस्येवर चिंता व्यक्त

रस्त्याकडेला, मोकळ्या जागेत कचरा टाकण्याच्या प्रकारांत वाढ

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
20th January, 12:11 am
थिवी ग्रामस्थांकडून ग्रामसभेत कचरा समस्येवर चिंता व्यक्त

 थिवी ग्रामसभेत प्रश्न उपस्थित करताना एक ग्रामस्थ. (आग्नेल परेरा)

म्हापसा : थिवी ग्रामपंचायत क्षेत्रातील कचऱ्याच्या वाढत्या समस्येबद्दल ग्रामस्थांनी ग्रामसभेत चिंता व्यक्त केली. गावातील कचऱ्याच्या समस्येला तोंड देण्यासाठी कचरा व्यवस्थापन समितीची बैठक बोलावली जाईल, असे आश्वासन सरपंच व्यंकटेश शिरोडकर यांनी दिले.
नवीन गृहनिर्माण वसाहतींमुळे रस्त्याच्या कडेला आणि मोकळ्या जागेत कचरा टाकण्याच्या प्रकारांत वाढ झाली आहे. एका ग्रामस्थाने याबाबत चिंता व्यक्त केली. नव्या इमारतीमध्ये राहायला आलेल्यांनी गावाला डंपिंग ग्राऊंड बनविले आहे. त्यामुळे यापुढे बांधकाम व्यावसायिकांना नवी इमारत बांधताना कचरा प्रक्रिया सुविधा उभारणे सक्तीचे करावे, अशी सूचना ग्रामस्थांनी केली.
कायमस्वरूपी कचरा व्यवस्थापन सुविधा स्थापन करण्यात अपयशी ठरल्याबद्दल नीलेश साळगावकर यांनी पंचायतीवर टीका केली. मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी (एमआरएफ) नसणे हे न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन करते. कचरा संकलनासाठी सध्या पंचायत इमारतीच्या मागील जागा वापरण्यात येत आहे. मात्र, हा उपाय दीर्घकालीन असू शकत नाही, असे साळगावकर म्हणाले. यासाठी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मंजुरी मिळविण्याची विनंती साळगावकर यांनी पंचायतीला केली. कचरा व्यवस्थापन समितीच्या साहाय्याने उपाययोजना करण्यात येतील, असे सरपंच शिरोडकर म्हणाले.

उपआरोग्य केंद्रात डॉक्टरांची कमतरता
थिवीच्या उपआरोग्य केंद्रात डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता असते. याबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर सरपंचांनी सरकारला पत्र लिहिणार असल्याचे आश्वासन दिले.

हेही वाचा