हळदोणा ग्रामसभेत मागणी : कचराकुंड्या नसल्यामुळे कचरा गेटबाहेर फेकण्याचे प्रकार
ग्रामस्थांच्या प्रश्नाला उत्तर देताना हळदोणाचे सरपंच अश्विन डिसोझा.
म्हापसा : हळदोणा ग्रामसभेत रविवारी कचरा व्यवस्थापन, पाणीटंचाई आणि रस्त्यांची बिकट अवस्था या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. या समस्या प्राधान्याने सोडविण्यात याव्यात, यासाठी पंचायतीने त्वरित कार्यवाही करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
मोठ्या इमारती आणि व्हिला वसाहतींमध्ये कचरा विल्हेवाट व्यवस्था नसल्याबद्दल रहिवाशांनी निराशा व्यक्त केली. अशा इमारतींमध्ये कचराकुंड्या आणि कचरा वर्गीकरण यंत्रणा नसल्यामुळे गेटबाहेर कचरा फेकण्याचे प्रकार घडतात, असे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले.
पंचायत अशा इमारतींना सार्वजनिक सूचना जारी करून कचराकुंड्यांसह योग्य कचरा व्यवस्थापन प्रणालीचा अवलंब करण्याची सूचना करेल, असे सरपंच अश्विन डिसोझा यांनी सांगितले. जर या सूचनेचे पालन झाले नाही, तर आवश्यक कारवाई केली जाईल, असा इशाराही सरपंचांनी दिला.
यावेळी पाण्याच्या टंचाईबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. बांधकाम परवाने देण्यापूर्वी पंचायतीने पाणी पुरवठ्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (पीडब्ल्यूडी) ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) आणणे बंधनकारक करावे, असा प्रस्ताव कॉस्मे फर्नांडिस यांनी मांडला. मात्र सरपंचांनी सांगितले की, गोवा पंचायती राज कायद्यांतर्गत अशी सक्ती करण्याची तरतूद नाही.
हळदोणातील रस्त्यांच्या स्थितीबद्दल ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. भूमिगत वाहिन्यांच्या कामामुळे वाहने चालवताना कसरत करावी लागते. पावसाळ्यापूर्वी रस्ते पुनर्बांधणी करण्यासाठी पंचायतीने संबंधित विभागांशी समन्वय साधावा, अशी सूचना नागरिकांनी केली. या समस्येचे निराकरण करण्यासाठी हळदोणाचे आमदार कार्लुस फेरेरा, पीडब्ल्यूडी आणि वीज विभाग यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन सरपंचांनी दिले.
प्रस्तावित बाजार संकुलाबद्दल सरपंच म्हणाले...
आवश्यक फायली पंचायत स्तरावर मंजूर झाल्या आहेत आणि आता सरकार तसेच गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे अंमलबजावणीसाठी विचाराधीन आहेत. बाजार संकुल आणि पंचायत इमारतीमध्ये अपंग लोकांना सोयीस्कर ठरेल, अशी व्यवस्था उभारण्यात येईल, अशी माहिती सरपंच डिसोझा यांनी दिली.