भाजप कार्यालयात जाऊन दामू नाईक यांना शुभेच्छा दिल्याने चर्चांना ऊत
नूतन प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांना पेढा भरवताना आमदार जीत आरोलकर.
पणजी : मांद्रेचे मगो आमदार सध्या शरीराने मगोत आणि मनाने भाजपात असल्याचे वारंवार दिसून येत असल्यामुळे मगोच्या राज्यभरातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. आरोलकर यांनी सोमवारी कार्यकर्त्यांसह भाजपच्या पणजीतील कार्यालयात जाऊन नवनिर्वाचित अध्यक्ष दामू नाईक यांना शुभेच्छा दिल्यामुळे त्यांच्यासंदर्भात अनेक तर्क-वितर्क लढवण्यात येत आहेत.
गत विधानसभा निवडणुकीत मांद्रे मतदारसंघातून जीत आरोलकर यांनी भाजपच्या दयानंद सोपटे यांचा पराभव केला होता. त्यानंतर भाजपने मगोला सत्तेत घेतल्यानंतर आमदार आरोलकर यांची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह भाजपच्या राज्यातील वरिष्ठ नेत्यांशी जवळीक वाढलेली आहे. मंत्री तथा मगोचे ज्येष्ठ नेते सुदिन ढवळीकर आणि अध्यक्ष दीपक ढवळीकर यांच्यासोबत कधीही न झळकणारे आरोलकर गेल्या काही महिन्यांपासून मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यासह राज्यसभा खासदार तथा माजी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्यासोबत झळकत होते.
दरम्यान, आमदार जीत आरोलकर यांच्या भाजप नेत्यांशी गाठीभेटी वाढल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपकडून मांद्रेची उमेदवारी त्यांना मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात होती. परंतु, आम्ही जीत आरोलकर यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांचे सर्व प्रश्न मिटवण्यात आले आहेत. ते आमच्यासोबतच आहेत आणि राहतील, असा ठाम विश्वास काहीच दिवसांपूर्वी मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला होता. पण, आता एका पक्षाचा आमदारच दुसऱ्या पक्षाच्या कार्यालयात गेल्याने आरोलकर यांच्याबाबतच्या चर्चांना जोर चढला आहे.
राज्यातील मगो कार्यकर्त्यांत खळबळ
मध्यंतरी राज्य मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना राज्यात ऊत आलेला होता, त्यावेळी आरोलकर यांनी भाजप नेत्यांसोबत दिल्लीचा दौराही केलेला होता. त्यानंतर आता त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन भाजप कार्यालयात जात नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांना शुभेच्छा दिल्या. त्यामुळे मगोच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांत खळबळ माजलेली आहे.