स्थलांतरित वडाचे झाड होणार पुनर्जीवित

वनस्पती शास्त्रतज्ञ डॅनियल डिसोझा : योग्य काळजी न घेतल्याने झाड सुकले

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
6 hours ago
स्थलांतरित वडाचे झाड होणार पुनर्जीवित

कांपाल येथील वडाच्या झाडाला येणारी नवी पालवी.

पणजी : कांपाल मैदानावर ट्रान्सलोकेट पद्धतीने स्थलांतरित केलेले वडाचे झाड जिवंत असून त्याची वाढ होत आहे. या वडाच्या झाडामध्ये ३० टक्के जीव असून काही वर्षांनी तो पूर्वीप्रमाणेच हिरवागार होईल. स्मार्ट सिटीच्या कामावेळी सदर वडाचे स्थलांतर करताना त्याची योग्यती काळजी न घेतल्याने ते झाड सुकल्याचे वनस्पती शास्त्रज्ञ डॅनियल डिसोझा यांनी सांगितले.
सांतइनेज परिसरातील शीतल हॉटेलच्या पाठीमागे स्मार्ट सिटीचे काम सुरू असताना रस्ता रुंदीकरणादरम्यान १०० वर्षे जुन्या वडाच्या झाडावर कुऱ्हाड बसली. दरम्यान, सदर झाड तेथून काढून टाकण्यासाठी पर्यावरणवाद्यांसह स्थानिकांनी विरोध केला. मात्र, स्मार्ट सिटी प्रशासनाने सदर झाड रातोरात तोडून सकाळी कांपाल परेड मैदानावर स्थलांतरित करून तेथे वृक्षारोपण केले.
दरम्यान, या झाडाचे अस्तित्व फेब्रुवारी महिन्यात कळणार आहे. या महिन्यात झाडांची पाने गळून पडत असल्यामुळे ते झाड मेले की जिवंत आहे याचा निर्णय सद्यस्थितीत घेणे चुकीचे आहे, असे मत डिसोझा यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी सदर झाड जिवंत असल्याचे प्रात्यक्षिकही दाखविले.
या झाडाच्या मुळावर घाव घातल्यास त्यातून डिंक बाहेर पडतो. याचा अर्थ या झाडाचा ३० टक्के भाग जिवंत असून ७० टक्के भाग सुकलेला आहे. या वडाचे खोड अजूनही ताजे आहे. झाडाच्या चारही बाजूंच्या मुळांमधून डिंक बाहेर येतो. त्यामुळे सदर झाड जिवंत असून ते पूर्वीसारखेच हिरवेगार होण्यासाठी काही वर्षे लागतील, असेही ते म्हणाले.
झाडाच्या पुनरुज्जीवनासाठी वेळ, पैसा खर्च
स्मार्ट सिटी प्रशासनाने सदर झाड एप्रिलमध्ये तोडून कांपालला हलवले तेव्हा उन्हाळ्याचे दिवस होते. कांपाल येथील जागा उतारावर असल्यामुळे पावसाळ्यात मुसळधार कोसळणाऱ्या पावसाचे पाणी या झाडाच्या मुळाकडे साचून राहिले. ज्या भागात पाणी साचत नाही अशी जागा झाडासाठी उपयुक्त आहे. दरम्यान, या झाडाला पुनर्जीवित करण्यासाठी मी एकही सरकारी पैसा न घेता माझा वेळ आणि पैसा खर्च केल्याचे डिसोझा यांनी सांगितले.       

हेही वाचा