कुठ्ठाळी-सांकवाळ येथे दोन कारची धडक भोम-पालयेत दुचाकींची धडक
पणजी : राज्यात रस्ते अपघाताचे सत्र कायम आहे. सोमवारी झालेल्या दोन भीषण अपघातात तिघाजणांना आपला जीव गमवावा लागला. तर तिघेजण जखमी झाले. कुठ्ठाळी-सांकवाळ मार्गावर दोन कारची समोरासमोर धडक झाली. तर पालये-भोम येथे दोन दुचाकी एकमेकांना धडकल्या. त्यात एका पर्यटकाचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले.
कुठ्ठाळी-सांकवाळ मार्गावरील शीला बार अँड रेस्टारंटसमोरच्या रस्त्यावर सोमवारी (२० रोजी) पहाटे ५ वा. च्या दोन कारमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत स्विफ्ट कारचालकासह दोघेजण ठार झाले. स्विफ्टचालक सुरेश जग्गल (४५) हाे जागीच ठार झाले. तर निस्सार अहमद (५४, रा. बंगळुरु) यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. इर्टिगा कारचालक यल्लाप्पा मुनिस्वामी (३० रा. कंळगुट) जखमी झाला आहे. त्याच्यावर इस्पितळात उचार सुरु आहेत. याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या १२५ (ब), २८१, १०६ (१) नुसार गुन्हा नोंद केला आहे.
नवे वाडे –वास्को येथे राहणारे सुरेश जग्गल हे निस्सार अहमदसह आपल्या स्विफ्ट कारने सोमवारी पहाटे ५ वा. दरम्यान कुठ्ठाळीहून सांकवाळमार्गे वास्कोकडे येत होते. ते शीला बार अँड रेस्टारंटसमोर पोहचल्यावर त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार चुकीच्या मार्गाने जाऊन समोरून येणाऱ्या इर्टिंगा कारवर धडकली. या अपघातात सुरेश जग्गल हे जागीच ठार झाले. तर निस्सार अहमद व दुसरा कारचालक मुनिस्वामी गंभीर जखमी झाले.
वेळीच उपचार न मिळाल्याने दिल्लीचा युवक ठार; दोघे जखमी
हरमल : पालये भोम पठारावर दोन दुचाकीमध्ये अपघात होऊन एक जण ठार, तर दोन जण जखमी झाले. जखमींवर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. रविवारी मध्यरात्री १.४५ वा. च्या सुमारास भोम येथे अॅक्टिव्हा स्कूटर व बुलेट या दोन दुचाकीमध्ये धडक झाली. निखिल सागर (३०, रा. दिल्ली) हा अॅक्टिव्हावरून जात होता. त्यावेळी साईश परब (रा. पालये) व एक विदेशी पर्यटक दुचाकीवरून येथे होते. दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. अपघातानंतर सागर रस्त्यावर विव्हळत पडला होता. मात्र रात्रीची वेळ असल्याने त्याला वेळीच उपचार मिळाले नाहीत आणि त्याचा मृत्यू झाला. तर बुलेटवरील दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले. हवालदार गोविंद फटनाईक यांनी पंचनामा केला.
दरम्यान, पर्यटन हंगामात दुचाकींची शर्यत लावली जाते. तर काही गाड्यांचा कर्णकर्कश आवाजामुळे ध्वनीप्रदूषण निर्माण होते. अशा चालकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून करण्यात आली. या भोम मार्गालगत भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यात आल्या. मात्र रस्ता अर्धवट डांबरीकरण करण्यात आला आहे. त्यामुळे असून, रस्ता अधिकच अरुंद बनला आहे. शिवाय रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्क करून ठेवण्यात येतात. त्यामुळे या ठिकाणी अपघात घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.