२०१९ मध्ये झाली अटक : मडगाव अतिरिक्त सत्र न्यायालयाचा आदेश
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : खोट्या गुन्ह्यात गोवल्याचे सिद्ध करण्यासाठी आरोपी आणि पोलिसांमध्ये शत्रुत्व असल्याचे सूचित करणारा एकही पुरावा नाही. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जचा अहवाल सकारात्मक अाहे, असे निरीक्षण नोंदवून २०१९ मध्ये ड्रग्ज बाळगल्या प्रकरणी अटक केलेल्या जोसेफ अचोला औमा या केनियन नागरिकाला मडगाव येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने दहा वर्षांचा सश्रम कारावास आणि दीड लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. याबाबतचा निवाडा न्या. क्षमा जोशी यांनी दिला.
या प्रकरणी काणकोण पोलिसांनी २९ जानेवारी २०१९ रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार, कोळंब - गावडोंगरी येथील कोमरपंत समाज सभागृहाजवळ विदेशी नागरिक ड्रग्ज तस्करीसाठी येणार असल्याची माहिती अधिकाऱ्याला मिळाली होती. त्यानुसार, तत्कालीन उपअधीक्षक उत्तम राऊत देसाई आणि निरीक्षक सुदेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रशल नाईक देसाई, दामोदर शिरोडकर, रामचंद्र नाईक, काॅन्स्टेबल उदय शेट, राजेश पागी, संतोष नाईक, संदेश नाईक व इतरांच्या पथकाने सायं. ४.४० ते ६.३० सापळा रचला होता. तेथे आलेल्या विदेशी व्यक्तीची पथकाने चौकशी केली. त्याने आपण जोसेफ अचोला औमा केनियन नागरिक असल्याचे सांगितले. झडती घेतली असता त्याच्याकडे २.४० लाखांचे ३.१० ग्रॅम कोकेन आणि ७.५३ ग्रॅम एलएसडी लिक्विड मिळाले. तत्कालीन उपनिरीक्षक दामोदर शिरोडकर यांच्या तक्रारीवरून उपनिरीक्षक धीरज देविदास यांनी औमाच्या विरोधात गुन्हा दाखल केला व त्याला अटक केली. तत्कालीन उपनिरीक्षक रमेश शिरोडकर यांनी तपास पूर्ण करून मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात २२ जुलै २०१९ रोजी आरोपपत्र दाखल केले आहे. न्यायालयाने २८ नोव्हेंबर २०११ रोजी आरोप निश्चित करून खटला सुरू केला.
सुनावणीवेळी संशयित औमा याला पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा दावा संशयिताच्या वकिलांनी केला. पोलिसांनी नियमाचे उल्लंघन केल्यामुळे आशिलाची निर्दोष सुटका करण्याची मागणी औमाच्या वकिलांनी केली. सरकारी वकील डी. कोरगावकर यांनी बाजू मांडली. तत्कालीन मामलेदार रघुराज फळदेसाई, पथकातील पोलीस कर्मचारी, न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील अधिकारी, तसेच साक्षीदारांनी दिलेली साक्ष महत्त्वाची ठरली. जप्त केलेल्या ड्रग्जचा अहवाल सकारात्मक आल्यामुळे न्यायालयाने औमाला दोषी ठरवले.
न्यायालयाने सुनावलेली शिक्षा
आरोपीला अमली पदार्थ विरोधी कायद्याचे कलम २२ सी अंतर्गत दहा वर्षे सश्रम कारावास आणि एक लाख रुपयांचा दंड.
दंड न भरल्यास दोन वर्षे कारावासाची शिक्षा.
कलम २१ बी अंतर्गत पाच वर्षे सश्रम कारावास व ५० हजार रुपयांचा दंड.
दंड न भरल्यास १ वर्ष साधी कैद.