गोव्याच्या लोकधर्मात खारफुटी

आजतागायत आखाड्यावर आलेल्या असंख्य संकटांतून स्थानिकांवर इथल्या खारफुटीच्या नैस‌र्गिक जंगलाने सुरक्षा छत्र धरल्याने मुक्तता झालेली आहे. खारफुटीच्या जंगलाने बेटावरच्या भूमीचे स्खलन नियंत्रित केलेले आहे.

Story: विचारचक्र |
9 hours ago
गोव्याच्या लोकधर्मात खारफुटी

भारतीय संस्कृतीचा निसर्ग आणि पर्यावरणातील विविध घटकांना देवतास्वरूप मानण्याचा वारसा असून, आजच्या बदलत्या काळातही या परंपरेचे दर्शन पहायला मिळते. गोव्याची भूमी पश्चिम किनारपट्टीवर वसलेली असल्याने आगामी काळात हवामान बदलामुळे जी परिस्थित उद्‌भवणार आहे, तिला सामोरे जाण्यासाठी सधन जंगलांचे नैसर्गिक आच्छादन महत्त्वाचे ठरणार असले तरी आपल्या पूर्वजांनी निसर्गाच्या कणाकणांत देवत्व अनुभवत खरेतर त्याची पूर्वतयारी अगोदर केली होती. परंतु आज भूपृष्ठावर शेती, बागायती, लोकवस्ती, विकास प्रकल्पांना जमीन उपलब्ध नसल्याचे सांगत पाणथळी, दलदली, नदी-सागर यांच्या किनाऱ्यावरच्या जागांवर पर्यावरणीय संवेदनाक्षमतेकडे कानाडोळा करून अतिक्रमण वाढू लागलेले आहे. अशा प्रतिकुल परिस्थितीची कल्पना नवाश्म युगात आदिमानवाला आली होती आणि त्यासाठी त्यांनी देवराईची परंपरा निर्माण केली होती. गोव्यातील खेड्यापाड्यांत शेकडो वर्षांपासून देवरायांच्या माध्यमातून वृक्षवेली, पशुपक्षी यांचे संवर्धन आणि संरक्षण केले होते. सोळाव्या शतकात पोर्तुगीज राजवटीत गोव्यात तिसवाडीसारख्या महालात ख्रिस्ती ध‌र्माचा सक्तीने प्रसार करणाऱ्या धर्मगुरूंनी इथल्या भारतीय धर्म-संस्कृतीचे संचित नाहीसे करण्याचे आटोकाट प्रयत्न केले होते, परंतु असे असताना वृक्षवेलींत देवत्व पाहण्याची परंपरा या मातीत आपली घट्ट मुळे रोवून असलेली देववृक्षांतून पहायला मिळते.

तिसवाडी तालुक्यातल्या चारही बाजूने नदीच्या पाण्याने वेढलेल्या बेटात देववृक्ष वड, पिंपळासारख्या शतकोत्तर आयुमर्यादा असलेल्या महावृक्षांतून पहायला मिळते. त्याचप्रमाणे सांत इस्तेव्हसारख्या बेटावरच्या ग्रामपंचायत क्षेत्रात ही परंपरा आखाड्यासारख्या बेटावर आजही पहायला मिळते. जागतिक पातळीवर तापमान वाढीमुळे सागराच्या पाण्याच्या वाढत्या पात‌ळीच्या संकटांना सामोरे जाण्यासाठी खारफुटीच्या परिसंस्थेचे संरक्षण आणि संवर्धनाला प्राधान्य दिले जात आहे. वादळवाऱ्यांच्या संकटातून, त्याचप्रमाणे भूकंपामुळे जी परिस्थिती उद्‌भवते त्यातून सागर आणि नदी किनाऱ्यावरच्या प्रदेशांना संरक्षण पुरवण्याची कामगिरी खारफुटीचे जंगल करत असल्याचे स्पष्ट झाल्याकारणाने आज अशा परिसंस्थेचे अस्तित्व टिकव‌ण्यासाठी समाज आणि सरकार पातळीवर‌ जगभर प्रयत्न केले जात आहेत. किनारपट्टीवरच्या लोकवस्तीचे रक्षण करण्याबरोबर अन्न, वस्त्र, निवारा, औषधासारख्या महत्त्वाच्या गरजांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने खारफुटीचे योगदान होत असते.

आखाडा या सांत इस्तेव्ह बेटावरच्या समाजाने आपल्या छोटेखानी बेटावरच्या लोकवस्तीच्या संरक्षणाच्या दृष्टीने खारफुटीच्या जंगलाचे महत्त्व जाणले होते. पूर्वीच्या काळी जेव्हा मान्सूनची पर्जन्यवृष्टी व्हायची, तेव्हा आखाडा चारही बाजूने पाण्याने वेढलेले असल्याकारणाने मुख्य प्रवाहापासून अलिप्त राहत असे. पूर, भूकंप आणि नानाविविध नैसर्गिक प्रको‌पांपासून त्यांना खारफुटीतल्या जंगलाची परिसंस्था करत असलेल्या योगदानाची जाणिव होती. त्यामुळे साखळ्यो लोकदैवताच्या माध्यमातून त्यांनी खारफुटीचे जंगल आणि तेथील शतकोत्तर इतिहास असलेल्या झाडांचे श्रद्धेने पावित्र्य जपले होते. साखळ्याची हुपळी या नावाने आखाड्यावर परिचित अस‌लेले हे खारफुटीचे झाड म्हणजे लोकदैवताचे नैसर्गिक मंदिर ठरले होते. पूर्वीच्या काळी आखाडा कृषीप्रधान असल्याकारणाने इथल्या खारभूमीत कोरगूट भाताची मुबलक पैदासी व्हायची. कष्टकऱ्यांनी मांडवी आणि तिच्या खाड्यांतून भरती-ओहोटीचे खारे पाणी शेतात घुसू नये म्हणून चिखलाचे ठिकठिकाणी बांध घातले होते. मानशीच्या यंत्रणेद्वारे खाऱ्या पाण्यावर नियंत्रण प्रस्थापित केले होते. खाजन शेतीत कोरगुट भाताची आणि खाड्यांतून चवदार माशांची मुबलक पैदासी यामुळे आखाड्यावरच्या स्थानिकांना शीतकडीचा आस्वाद सदासर्वकाळ घेता यायचा. आखाड्यावर सुजलाम् सुफलाम्‌तेचा वारसा आणि नैसर्गिक प्रकोपातून वेळोवेळी रक्षण हे आपल्या खारफुटीचा अधिष्ठाता देव असणाऱ्या साखळ्योच्या कृपेने होत असे, यावर त्यांची पूर्वापार श्रद्धा होती म्हणूनच त्यांनी आजच्या बदलत्या काळात साखळ्याच्या हुपळीचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी मानली.

चांद कालगणनेतील पौष या दहाव्या महिन्यात साखळ्यो देवाचा अधिवास असणाऱ्या खारफुटीच्या जुन्या झाडाखाली पूर्वी कोंबडा, बकऱ्याचा बळी दिला जायचा. परंतु आत इथल्या ग्रामस्थांनी पशुबळी देण्याऐवजी खिचडीचा नैवेद्य देण्याची नवी परंपरा निर्माण केली आहे. पूर्वी पौषातील या लोकविधीच्या वेळी आखाडा बेटाच्या पंचक्रो‌शीतील धावजीचा मुकोबा, बायगिणीचा बायगिणेश्वर, खराडेवरचा दाड त्याचप्र‌माणे ८० रंभांचे स्मरण केले जाते. पूर्वी या विधीच्या प्रसंगी मुकोबा, वनदेवी आदींचा भार आखाड्यावरच्या भाविकांत संचारायचा. खेत्रपुजेवेळी होणारा मांसाहार टाळून खिचडीचा शाकाहार साखळ्योच्या पवित्र ठिकाणी आखाड्यावरच्या ग्रामस्थांनी स्वीकारलेला आहे. साखळ्याच्या नावाने पिढ्यान् पिढ्यांपासून गावातील मांडवीच्या खाडीत कुंभारजुवेच्या कालव्याशी संलग्न बांधावर उभे असलेल्या खारफुटीच्या झाडाला देवत्व देऊन लोक‌मान‌साने आपले सांस्कृतिक, भावनिक अनुबंध सुदृढ केलेले आहे. आज खारफुटीचे शतकोत्तर परंपरा असलेले हे झाड, सामान्यांपासून श्रीमंतांपर्यंत स्थानिकांना असामान्य असे लोकधर्माचे अनमोल संचित ठरलेले आहे आणि त्यामुळे त्याच्याशी निगडित असलेल्या परंपरांचे जाळे विणलेले आहे.

गेल्या कित्येक दशकांपासून आखाडा हे बेट मांडवी आणि जुवारी या दोन्ही नद्यांना एकत्र आणणाऱ्या कुंभारजुवे कालव्याच्या सान्निध्यात सगळ्या दिशांना पाण्याने वेढलेले आहे. भूकंप, वादळवारे, त्सुनामीसारख्या एकापेक्षा एक मोठ्या नैसर्गिक प्रकोपांना निर्भिडपणे सामोरे जात आखाडा बेट सुरक्षित राहिलेले आहे, त्याला इथल्या स्थानिकांवरती साखळ्याची कृपासावली अक्षय असल्याची लोकश्रद्धा कारणीभूत ठरलेली आहे. महापुरावेळी जेव्हा पाण्याच्या पातळीखाली साखळ्याची हुपळी बुडेल तेव्ह‌ाच आखाडा बेट बुडेल, असा विश्वास आहे. आजतागायत आखाड्यावर आलेल्या असंख्य संकटांतून स्थानिकांवर इथल्या खारफुटीच्या नैस‌र्गिक जंगलाने सुरक्षा छत्र धरल्याने मुक्तता झालेली आहे. खारफुटीच्या जंगलाने बेटावरच्या भूमीचे स्खलन नियंत्रित करून, या खाडीत चवदार मत्स्य संपदेच्या पैदासीसाठी पोषक वातावरण निर्माण केलेले आहे. आपले जगणे सुंदर, सुखी, समृद्ध करण्यात खार‌फुटीच्या योगदानाला इथल्या लोकधर्माने देवत्व प्रदान केलेले आहे.


- प्रा. राजेंद्र केरकर

(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते 

असून पर्यावरणप्रेमी आहेत.) मो. ९४२१२४८५४५