कालबाह्य नियम

महाराष्ट्रात होणाऱ्या स्पर्धेच्या नियमांचाही गोव्याने अभ्यास करावा, तो याचसाठी की इथे प्रथम आलेले नाटक त्या स्पर्धेत अंतिम फेरीत जाते. त्यासाठी ती स्पर्धा काय आहे, तेही समजून घेण्याची गरज आहे. कला अकादमीने ती स्पर्धाही समजून घ्यावी आणि नियमही.

Story: संपादकीय |
20th January, 10:51 pm
कालबाह्य नियम

कला अकादमीच्या 'अ' गट मराठी नाट्यस्पर्धेच्या निकालानंतर एक भलताच वाद सुरू झाला आहे. एका नाटकातील कलाकाराने 'ब' गट नाट्य स्पर्धेनंतर 'अ' गटाच्या नाट्यस्पर्धेतील नाटकात छोटीशी भूमिका केल्यामुळे त्या नाटकाविषयी लेखी तक्रार केली गेली. निकालातून हे नाटक वेगळे ठेवले गेले. नियम सर्वांना सारखेच असावेत. नियमांनुसार निकाल व्हायला हवेत यात कुणाचे दुमत नाही. अन्यथा सगळेचजण नियम मोडत राहतील. पण कला अकादमीच्या नियमांमध्येच खोट असेल तर कोणाला सांगायचे? दुटप्पीपणाचे नियम असतील तर मग अशा नियमांचे काय करायचे? नाट्य स्पर्धा ही गोव्यातील कलाकारांना मोठे करण्यासाठी असावी. त्यांचे खच्चीकरण होऊ नये. गोव्यातील नाट्य लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धेत खास तरतूद असायला हवी. तिथे हात आखडता घेऊन चालणार नाही. नाट्य संस्थांना फक्त बसचे भाडे न देता खर्चासाठी काही रक्कमही देण्यात यावी जेणेकरून मोठ्या प्रमाणात संस्था स्पर्धेत सहभागी होतील. या महत्त्वाच्या नाट्य स्पर्धेच्या नियमांमुळे सध्या उघडपणे चर्चा सुरू झाली आहे, त्यावर कला अकादमीने विचार करायला हवा.

एका संस्थेने 'तिऱ्हाईत' नावाचे नाटक सादर केले. सादरीकरण अप्रतिम होते, पण लेखी तक्रार आल्यामुळे अकादमीला या नाटकाविषयी गंभीर निर्णय घ्यावा लागला. हा निर्णय घेतला नसता तर कला संस्कृती मंत्र्यांनी आपल्या तालुक्यातील नाट्यसंस्थेला अभय दिल्याची टीकाही झाली असती. एका क्षुल्लक कारणामुळे या नाटकाला बक्षिसांच्या यादीतून वगळल्याने नाट्यस्पर्धेच्या नियमांमध्ये दुरुस्तींची आवश्यकता असल्याची चर्चा सुरू झाली. काही नाटककारांच्या मते 'अ' आणि 'ब' गटातील प्रथम आलेली नाटके पूर्वी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत जायची. कालांतराने महाराष्ट्रात होणारी 'ब' गटातील नाटकांची स्पर्धा थांबली. आता फक्त 'अ' गटातील नाटक जाते. महाराष्ट्रातील स्पर्धेत सहभागी होण्याची संधी असते, त्यामुळे दोन्ही गटात एकाच कलाकाराने काम करू नये कारण दोन्ही नाटकांचे सादरीकरण एकाचवेळी असेल तर कलाकारामुळे घोळ होऊ शकतो, असा या नियमामागचा हेतू होता. आता फक्त 'अ' गटातील नाटक महाराष्ट्रातील स्पर्धेत जात असल्यामुळे 'ब' गटात काम करणाऱ्या कलाकारांविषयी असलेल्या अटीला अर्थ राहिलेला नाही. त्यामुळे अकादमीच्या नियमावलीतून सोळाव्या क्रमांकाचा नियम हटवणे गरजेचे होते. कला अकादमीने अशा अटींमध्ये दुरुस्ती करून मुख्य कलाकार वगळता अन्य सहकारी कलाकारांना दुसऱ्या नाटकात भाग घेण्याची मुभा द्यायला हवी. ही दुरुस्ती गरजेची असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले गेले. कुठलाच प्रभाव न पाडणाऱ्या किंवा नाटकातील आवश्यक गर्दीत सहभागी झालेल्या एखाद्या कलाकाराला आक्षेप घेणे, हे तांत्रिकदृष्ट्या जरी बरोबर असले तरी नैतिकदृष्ट्या ते चुकीचेच आहे.

फक्त 'तिऱ्हाईत' नाटकातच नव्हे तर 'अ' गटातील अन्य अनेक नाटकांमध्ये 'ब' गटातील कलाकार काम करत असतात. एका नियमात गोवा किंवा गोव्याबाहेरील कोणाही व्यक्तीचे दिग्दर्शनासाठी मदत घेणे कला अकादमीला मंजूर आहे. अशाने मुरलेला दिग्दर्शक आणून त्याच्याकडून नाटक बसवून घेता येईल आणि नाममात्र अन्य कोणाचेही नाव देता येईल. मग दुसऱ्या नियमात गोव्यातीलच कलाकारांसाठी स्पर्धा आहे, असा उल्लेख कशासाठी? नियम क्रमांक दोन आणि क्रमांक सतरा हे दोन्ही परस्पर विरोधी आहेत. बाहेरच्या लोकांकडून दिग्दर्शनाची मदत घेण्यासाठी तरतूद का आणि कशासाठी केली होती, त्याचा खुलासा कला अकादमीने करायला हवा. ही नाट्यस्पर्धा कला अकादमीची एकट्याची नाही. ती सरकारने आयोजित केलेली स्पर्धा आहे आणि इथल्या प्रेक्षकांचाही या स्पर्धेवर तितकाच अधिकार आहे. शिवाय एका नियमात स्त्रीने पुरुष आणि पुरुषाने स्त्रीची भूमिका करू नये, असे म्हटले आहे. महाराष्ट्र नाट्यस्पर्धेतील एका नियमानुसार एका भाषेत एका नाटकात काम करणाऱ्या कलाकाराला दुसऱ्या नाटकात काम करता येत नाही. गोव्यात 'ब' गटामध्ये काम करणाऱ्यांना 'अ' गटात काम करता येत नाही, असा विचित्र प्रकार आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या स्पर्धेच्या नियमांचाही गोव्याने अभ्यास करावा, तो याचसाठी की इथे प्रथम आलेले नाटक त्या स्पर्धेत अंतिम फेरीत जाते. त्यासाठी ती स्पर्धा काय आहे, तेही समजून घेण्याची गरज आहे. कला अकादमीने ती स्पर्धाही समजून घ्यावी आणि नियमही. कुठल्याच मेहनती कलाकाराची घोर निराशा होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल.