नातेसंबंध, आनंद आणि व्यक्तिगत विकास : योगीचा सल्ला

जर नाती सर्व पातळ्यांवर खरोखरच चांगली टिकवायची आहेत, तर तुम्ही स्वतःचे आयुष्य आनंदाचा शोध घेण्यापासून आनंदाच्या अभिव्यक्तीकडे वळवणे, हे घडले पाहिजे. एकदा का लोक एकत्र आले की, त्यांना अनेक गोष्टी सामायिक कराव्या लागतील.

Story: विचारचक्र |
19th January, 11:46 pm
नातेसंबंध, आनंद आणि व्यक्तिगत विकास : योगीचा सल्ला

स द्गुरू : बहुतेक लोकांसाठी, त्यांच्या जीवनात असलेल्या नात्यांची गुणवत्ता त्यांच्या जीवनाची गुणवत्ता ठरवते. जेव्हा ती तुमच्या आयुष्यात इतकी महत्वाची भूमिका बजावते, तेव्हा त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. एखाद्या नात्याचा पाया काय आहे? माणसाला नात्याची गरज का असते?

वेगवेगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी विविध प्रकारची नाती असतात. या गरजा शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक, आर्थिक किंवा राजकीय असू शकतात - त्या कोणत्याही प्रकारच्या असू शकतात. तुमच्या आयुष्यात अनेक प्रकारची नाती तुम्ही सांभाळलेली असतात. शेजारी, मित्र, पत्नी, पती, मुले, आई-वडील, भाऊ-बहीण, प्रेमी, एकमेकांचा द्वेष करणारे लोक - ही सगळी नातीच आहेत.

नात्याचं स्वरूप काहीही असो, नात्याचा प्रकार कोणताही असो, तरी मूळ मुद्दा हा आहे की, तुम्हाला एक गरज पूर्ण करायची असते. "नाही, मला काही मिळवायचे नाही, मला द्यायचे आहे." देण्याची गरज ही सुद्धा घेण्याइतकीच गरजेची आहे. "मला कुणाला तरी काहीतरी द्यायचे आहे" - ही सुद्धा तितकीच गरज आहे जितकी "मला काहीतरी मिळवायचे आहे." गरज ही असतेच. गरजा वेगवेगळ्या असू शकतात, त्याचप्रमाणे नाती सुद्धा वेगवेगळी असू शकतात.

अपेक्षांचा स्रोत

जिथे नाते आहे, तिथे अपेक्षा आहे. बहुतेक लोक अशा प्रकारच्या अपेक्षा निर्माण करतात की, पृथ्वीवर असा कोणताही माणूस नाही जो त्या पूर्ण करू शकेल. विशेषतः स्त्री-पुरुष नात्यामध्ये, अपेक्षा इतक्या असतात की, तुम्ही जरी देव किंवा देवीशी लग्न केले तरी ते तुम्हाला निराश करतील. जेव्हा तुम्ही अपेक्षा किंवा अपेक्षांचा स्रोत समजून घेऊ शकत नाही, तेव्हा तुम्ही अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. पण तुम्ही जर या अपेक्षांचा स्रोत काय आहे हे समजून घेतले, तर तुम्ही एक खूप सुंदर भागीदारी तयार करू शकता.

मुळात, तुम्ही नात्यांचा शोध का घेत आहात? कारण तुम्हाला आढळून येईल की कोणत्याही नात्याशिवाय तुम्ही तुमच्या जीवनात निराश व्हाल. तुम्ही नाते शोधत आहात, कारण तुम्हाला आनंदी व्हायचे आहे, तुम्हाला सुखी व्हायचे आहे किंवा वेगळ्या शब्दांमध्ये, तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला तुमच्या आनंदाचा स्रोत म्हणून वापरण्याचा प्रयत्न करत आहात. जर तुम्ही स्वतःहूनच आनंदी असाल, तर नाती तुमच्या आनंदाच्या अभिव्यक्तीचे साधन बनतील, आनंद शोधण्याचे नाही. जर तुम्ही कुणाकडून आनंद पिळून काढण्याचा प्रयत्न करत असाल आणि ती व्यक्ती तुमच्याकडून आनंद पिळून काढण्याचा प्रयत्न करत असेल, तर काही काळानंतर ते नाते दुःखदायक बनेल.

जर नाती शरीरावर आधारित असतील, तर एकमेकांच्या शरीराबद्दलचा उत्साह साधारणपणे काही काळानंतर संपून जाईल. जे तुम्हाला सर्वोच्च वाटत होते ते काही काळानंतर सर्वोच्च राहत नाही. हे स्वाभाविक आहे की त्यांना एकत्र आणणारे मुख्य आकर्षण संपून जायला लागल्यावर ते लोक त्यातून बाहेर पडू लागतात. कशासाठी हे न समजताच, ते एकमेकांशी कटू वागू लागतात कारण, मुळात असे नाते दुसऱ्या व्यक्तीकडून गोडवा आणि आनंद काढून घेण्याबद्दल असते. जर तुम्ही कुणाकडून आनंद पिळून काढण्याचा प्रयत्न केलात, तर काही काळानंतर, जेव्हा त्यातून सुरुवातीला मिळत असणारे तेच परिणाम मिळत नसतील, तेव्हा काही प्रमाणात कटुता सुरू होईल. पण जर तुम्ही तुमचा आनंद व्यक्त करण्यासाठी नाती जोडत असाल, तर कुणीही तुमच्याबद्दल तक्रार करणार नाही कारण तुम्ही तुमचा आनंद व्यक्त करण्याच्या प्रक्रियेत आहात, दुसऱ्या व्यक्तीकडून आनंद शोधत नाही आहात.

जर तुमचे जीवन आनंदाचा शोध घेण्याऐवजी, तुमच्या आनंदाची अभिव्यक्ती बनले, तर नाती स्वभाविकपणे  सुंदर बनतील. तुम्ही लाखो नाती जोडू शकता आणि तरीही ती चांगल्या प्रकारे सांभाळू शकता. दुसऱ्याच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा हा सगळा खेळ उद्भवतच नाही कारण जर तुम्ही आनंदाची अभिव्यक्ती असाल, तर तसेही त्यांना तुमच्या सोबत रहावे असे  वाटेल.

आनंदी असण्याची निवड करा

लाओ-त्झू, ज्यांनी ताओचा मार्ग खुला केला, ते या पृथ्वीवर वावरलेल्या सर्वात सुंदर माणसांपैकी एक होते. वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी, जेव्हा ते मृत्युशय्येवर होते, तेव्हा त्यांच्या शिष्यांनी त्यांच्याभोवती गोळा होत विचारले, "गुरुजी, आम्ही तुम्हाला हरेक प्रकारच्या टोकाच्या परिस्थितीत पाहिले आहे पण तुम्ही नेहमीच कायम आनंदी राहिलात. याचे रहस्य काय आहे?"

लाओ-त्झू म्हणाले, "अच्छा, ते होय! ते फक्त एवढेच की दर दिवशी सकाळी उठल्यावर मला एक विचार येतो, 'आज मी आनंदी राहू की दुःखी?' आजपर्यंत, मी नेहमीच आनंदाची निवड केली, बस्स एवढेच."

ते फक्त एवढेच आहे. जर तुम्ही या क्षणी आनंदी राहण्याची निवड केली, तर तुम्ही आनंदी राहू शकता. हे फक्त एवढेच आहे की तुम्हाला प्रत्येक क्षणी निवड करायची असते की तुम्हाला आनंदी राहायचे आहे. जाणीवपूर्वक, खूप दृढतेने निवड करा की तुम्ही एक आनंदी माणूस म्हणून जगणार आहात. ते गहाण ठेवू नका – "पण जर असे झाले तर मी आनंदी कसा राहू? जर तसे झाले तर मी आनंदी कसा राहू?" "काहीही झाले तरी मी एक आनंदी माणूस म्हणून जगेन" – अशी निवड करा.

जर नाती सर्व पातळ्यांवर खरोखरच चांगली टिकवायची आहेत, तर तुम्ही स्वतःचे आयुष्य आनंदाच्या शोध घेण्यापासून आनंदाच्या अभिव्यक्तीकडे वळवणे, हे घडले पाहिजे. एखादे नाते कदाचित आयुष्याच्या फक्त एका क्षेत्रात राहणार नाही. एकदा का लोक एकत्र आले की, त्यांना अनेक गोष्टी सामायिक कराव्या लागतील. स्वाभाविकपणे, अनेक छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुम्ही एकमेकांच्या पायावर पाय द्याल. यामुळे, अनेक संवाद - किंवा तुम्ही त्यांना वाद म्हणू शकता - होतील. तुम्ही हे सगळे रोज व्यवस्थापित करू शकत नाही. म्हणून, सर्वोत्तम गोष्ट अशी आहे की तुम्ही स्वतःला अशा प्रकारे व्यवस्थापित करा की तुम्ही नैसर्गिकपणे उत्साही, आनंदी व्यक्ती व्हाल.


(ईशा फाऊंडेशन)