तेथील सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यामुळे टिकटॉक या अॅप कंपनीच्या अस्तित्वाला अमेरिकेत धोका निर्माण झाला असून, सोमवारी शपथबद्ध होत असलेले नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हा गुंता हेच प्रथम आव्हान ठरणार आहे.
सामाजिक सलोखा आणि देशाची सुरक्षा बिघडविणारी व्हिडिओ पुरवठादार उत्पादक अशी प्रतिमा काही देशांत निर्माण झाल्याने बंदी घालण्यात आलेल्या टिकटॉक या अॅप कंपनीच्या अस्तित्वाला अमेरिकेत धोका निर्माण झाला असून, सोमवारी शपथबद्ध होत असलेले नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकिर्दीतील हे प्रथम आव्हान ठरणार आहे. एकीकडे निवडणूक काळात ट्रम्प यांनी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि त्यांच्या युवा अनुयायांची भलावण करीत समर्थन दिले होते, तर टिकटॉकवर मावळत्या सरकारने घातलेली बंदी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ग्राह्य ठरविल्याने ट्रम्प नेमका काय निर्णय घेतात, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. निवडणुकीच्या तोंडावर डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या अनुयायांना एक विनंती केली होती की ज्यांना अमेरिकेत टिकटॉक वाचवायचे आहे, त्यांना मतदान करा! त्यांनी सप्टेंबरमध्ये आपल्या ट्रुथ सोशल अकाऊंटवर पोस्ट केली होती. आता जर ट्रम्प यांनी न्याय विभागाला बंदीकडे दुर्लक्ष करण्याचे निर्देश दिले तर कायदेशीर आव्हान उभे राहू शकते. पण अशा प्रकारच्या कारवाईमुळे ट्रम्प आणि टिकटॉकला बाइटडान्सला व्यवसाय विकण्याचा मार्ग शोधण्यासाठी वेळ मिळू शकतो किंवा कॉंग्रेसला सध्याचा कायदा बदलण्यासाठी दुसरा कायदा संमत करण्यासाठी वेळ मिळू शकतो. या बंदीमुळे अॅप वापरणाऱ्या कोट्यवधी अमेरिकन नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन होत असल्याच्या टिकटॉकच्या युक्तिवादाला दुजोरा मिळत आहे. ट्रम्प तात्पुरत्या आदेशावरही विचार करीत असून टिकटॉक बंदीची अंमलबजावणी ६० ते ९० दिवसांसाठी थांबू शकते, दरम्यानच्या काळात आपत्कालीन योजना आखली जाऊ शकते.
अमेरिकेत टिकटॉक चालू ठेवताना, त्याचवेळी राष्ट्रीय सुरक्षेची व्यवस्था करण्याचा मार्ग जर ट्रम्प यांना सापडला तर त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड वाढ होऊ शकते. ट्रम्प यांच्या सध्याच्या भूमिकेत विरोधाभास आहे, कारण ट्रम्प यांच्यासह पुराणमतवादी लोकांनीच पहिल्यांदा बंदीचे समर्थन केले होते. मात्र डिसेंबरमध्ये टिकटॉकचे मुख्य कार्यकारी अधिकारी शाऊ च्यू यांना त्यांच्या मार-ए-लागो इस्टेटमध्ये ते भेटले होते आणि त्यानंतर टिकटॉकबंदी लांबणीवर टाकण्याची विनंती अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. ट्रम्प यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशीही चर्चा केली, त्यावेळी टिकटॉकचा विषय पुढे आला, असे सांगण्यात येते. याच कारणास्तव आता ट्रम्प दुसरी पळवाट शोधत आहेत. खरे तर टिकटॉक अमेरिकेतील मूळ कंपनीला विकले नाही तर अमेरिकेतून हद्दपार होण्याच्या उंबरठ्यावर आहे. शुक्रवारी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने बंदी किंवा विक्री कायदा घटनात्मक असल्याचा निकाल दिल्यानंतर ही स्थिती उद्भवली आहे. १७ कोटी अमेरिकन युजर्स असलेल्या या सोशल मीडिया अॅपला बीजिंगस्थित बाइटडान्सच्या मालकीचे असल्याने राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचा द्विपक्षीय कायदा काँग्रेसने बहुमताने संमत केल्यानंतर टिकटॉकचा डिजिटल अंत जवळ आल्याचे अमेरिकेत मानले गेले. कायद्यानुसार हे अॅप आता स्मार्टफोन अॅप स्टोअरमध्ये डाऊनलोड करता येणार नाही, पण ज्या दिवशी ही बंदी लागू होईल त्या दिवशी टिकटॉक सध्याच्या युजर्सचा अॅक्सेस बंद करण्याची योजना आखत आहे. टिकटॉकवरील बंदीची कार्यवाही ज्या पद्धतीने केली जाईल, त्यानुसार टिकटॉक किंवा बाइटडान्सला लक्ष्य करण्याऐवजी अॅपचे वितरण आणि होस्ट करणाऱ्या कंपन्यांना शिक्षा होऊ शकते. म्हणजेच गुगल आणि अॅपलने आपल्या अॅप स्टोअरमध्ये टिकटॉकची सुविधा सुरू ठेवल्यास अब्जावधी डॉलर्सचा दंड होऊ शकतो. मात्र, ट्रम्प तसे पाऊल उचलणार नाहीत, असे अनेकांना वाटते आहे.
टिकटॉक मुळात चिनी उद्योग असल्याने अमेरिकेच्या लोकप्रतिनिधींना त्याचा वापर धोकादायक वाटणे साहजिक आहे. आपण स्वतंत्र असून, कोणत्याही सरकारवर अथवा नेत्यावर अवलंबून नसल्याचा दावा टिकटॉक वारंवार करीत असले तरी जगातील बहुतेक देशांचा त्यावर विश्वास नाही. डाव्या विचारसरणीच्या देशात असे कोणतेही स्वातंत्र्य हे नावालाच असते. प्रत्येक गोष्टीवर सरकारी नियंत्रण असते, मग ते प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्ष. भारतानेही याचा अनुभव घेतल्यानंतर बंदी लागू केली होती. आपल्या देशात २०२२ मध्ये टकाटक नावाने अशा प्रकारचा स्वदेशी अॅप निर्माण करण्यात आला, जो नंतर मोज नावाने लोकप्रिय ठरला. इतर देशही असाच लोकप्रिय अॅप तयार करीत असताना, डोनाल्ड ट्रम्प कशासाठी धोका पत्करत आहेत, याचे उत्तर अमेरिकेच्या जनतेला शोधावे लागेल.