गेल्या काही दिवसांपासून राज्यातील प्रत्येक भाजप कार्यकर्ता ज्या घोषणेची आतुरतेने वाट पाहत होता, ती घोषणा शनिवारी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील बन्सल यांनी केली. भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून दामू नाईक यांच्या नावाची घोषणा त्यांनी केली. भाजप प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या इतर सहा जणांवर मात करीत दामू नाईक या पदावर विराजमान झाल्यानंतर त्यांच्या गौरवासाठी गोमंतक मराठा समाजाच्या पणजीतील सभागृहात झालेली तोबा गर्दीही सर्वांनी अनुभवली. पण, २०१२ पासून भाजपला राज्यात मिळालेले यश पुढील काळात दामू नाईक कशा पद्धतीने टिकवून ठेवणार, याकडे संपूर्ण गोमंतकीय जनतेचे लक्ष लागून असणार आहे.
दामू नाईक हे भाजपचे केडर नेते. विधानसभा निवडणुकीत २००२ आणि २००७ असे सलग दोनवेळा फातोर्ड्यातून आमदार झालेल्या दामूंना नंतरच्या निवडणुकांत मात्र यश मिळाले नाही. तरीही पक्षाने या मतदारसंघात दामूंंचाच विचार केला तो त्यांच्या निष्ठेमुळे. या काळात पक्षाने दामूंची संघटनेतील महत्त्वाच्या पदांवर नेमणूक केली. त्या सर्व पदांना त्यांनी योग्य न्याय दिल्याचे सिद्ध झाल्यामुळेच पक्षाने इतर सहा नावे बाजूला ठेवत दामू नाईक यांची प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड केली. दामू नाईक यांच्या गौरव समारंभात बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह सर्वांनीच दामू आपल्या पदाला योग्य न्याय देतील, असा ठाम विश्वासही व्यक्त केला. दामू नाईक या विश्वासास किती पात्र ठरतात, हे पुढील काही महिन्यांत दिसून येणार आहे.
माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी २०१२ मध्ये राज्यात भाजपची सत्ता आणली. त्यानंतर झालेल्या २०१७ च्या निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेत काँग्रेसला आलेल्या अपयशाचा फायदा घेत भाजपने सरकार स्थापन केले. २०२२ च्या निवडणुकीत भाजपला भरघोस यश मिळाले. या तेरा वर्षांच्या काळात भाजपला लक्ष्मीकांत पार्सेकर, विनय तेंडुलकर आणि सदानंद शेट तानावडे असे तीन प्रदेशाध्यक्ष मिळाले. या तिन्ही प्रदेशाध्यक्षांनी केलेल्या कामाची पावती प्रदेश भाजपला या तिन्ही निवडणुकांत मिळाली. तानावडे यांच्या कार्यकाळात तर भाजपने दोन वेळा जिल्हा पंचायत निवडणुका जिंकल्या. पालिका, पंचायत निवडणुकांत बाजी मारली आणि विधानसभा निवडणुकही जिंकली. या तीन प्रदेशाध्यक्षांनी पक्षाला मिळवून दिलेले ‘अच्छे दिन’ पुढील काळात टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्यासमोर असणार आहे.
विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम असलेली जिल्हा पंचायत निवडणूक येत्या डिसेंबरमध्ये होईल. त्यानंतर पालिका आणि २०२७ मध्ये विधानसभा निवडणूक होईल. भाजप कार्यकर्त्यांना सोबत घेऊन या सर्व निवडणुका पुन्हा एकदा जिंकण्याची हमी दिलेले दामू नाईक त्यासाठी कशापद्धतीने प्रयत्न करणार हे पुढील काळात दिसून येणार आहे.
सिद्धार्थ कांबळे
(लेखक गोवन वार्ताचे मुख्य प्रतिनिधी आहेत.)