आफ्रिका खंडातील नायजेरिया हा देश शुक्रवारी औपचारिकपणे ब्रिक्स परिषदेचा भागीदार सदस्य बनला. ब्राझीलच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही घोषणा केली. बेलारूस, बोलिव्हिया, क्युबा, कझाकिस्तान, मलेशिया, थायलंड, युगांडा आणि उझबेकिस्तानसह नायजेरिया आता ब्रिक्स परिषदेचा अधिकृत सदस्य बनला आहे. ब्रिक्स परिषदेचे अध्यक्षपद सध्या ब्राझीलकडे असून अध्यक्ष देशाला मिळणाऱ्या अधिकारांचा वापर करत नायजेरियाला हा दर्जा देण्यात आला आहे.
जगातील सहाव्या क्रमांकाची लोकसंख्या आणि आफ्रिकन खंडातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था (३.२९ लाख कोटी रुपये) असलेल्या नायजेरियाची धोरणे ही येथील समाजाच्या उन्नतीसाठी पूरक आहे. विविध अडचणींचा सामना करत नायजेरिया शिक्षण, वैद्यकीय, ऑटोमोबाईल्स आणि अभियांत्रिकीसारख्या इतर क्षेत्रांत दैदीप्यमान कामगिरी बजावत आहे. ब्रिक्स परिषदेतील देश देखील वैचारिकदृष्ट्या नायजेरीयाशी बऱ्याच अंशी एकरूप आहेत. या आणि अनेक कारणांचा अभ्यास करूनच नायजेरियाला ब्रिक्समध्ये सामावून घेण्यात आले आहे, असे ब्राझीलच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले
आहे.
नायजेरियाने ब्रिक्स देशांसोबत मिळून ग्लोबल साऊथला बळकट करण्यासाठी आणि जागतिक व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न केले आहेत. गेल्या वर्षी रशियातील कझान शहरात झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेत १३ देशांना भागीदार देशांचा दर्जा देण्यात आला होता. यापैकी आत्तापर्यंत ९ देश औपचारिकपणे त्याचे भागीदार देश बनले आहेत.
नायजेरिया हा आफ्रिकेतील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. त्याची लोकसंख्या २२ कोटी आहे. हा देश सर्वाधिक वेगाने वाढणारी लोकसंख्या असलेल्या देशांपैकी एक आहे. नायजेरियामध्ये तेल आणि वायूचे प्रचंड साठे आहेत, परंतु विविध जमातींमधील संघर्षामुळे येथील राजकीय वातावरण नेहमीच तंग असते. नायजेरिया दोन भागात विभागला गेला आहे. मुस्लिम बहुसंख्य असलेल्या उत्तर भागात गरिबी जास्त आहे. दक्षिण आणि पूर्व भागात ख्रिश्चन लोकसंख्या अधिक आहे. हे क्षेत्र अधिक समृद्ध आहे.
एकूणच भारताबरोबर ब्रिक्स संघटनेतील इतर देश आणि नायजेरिया यांच्यात व्यापार, शिक्षण, वैद्यकीय क्षेत्रातील उलाढाल येत्या काळात अनेक पटीने वाढण्याची शक्यता आहे.
- ऋषभ एकावडे, गोवन वार्ता