इंडियन मुजाहिद्दीनच्या आतंकवादीने घेतले होते प्रशिक्षण
म्हापसा : पालये-केरी पाठारावर पॅराग्लायडिंग अपघातात शिवानी दाबळे (२६, पुणे) या पर्यटक युवतीसह पॅराग्लाडिंग पायलट सुमन नेपाळी (२६, मूळ नेपाळ) हे दोघे ठार झाले होते. २०१३ मध्ये या पठारावर इंडियन मुजाहिद्दीनचा आतंकवादी सय्यद अफाकीने पॅराग्लायडिंगचे प्रशिक्षण घेतले होते. त्यानंतर काही महिने हा बेकायदा व्यवसाय बंद होता. मात्र, सरकारच्या दुर्लक्षामुळे पुन्हा हा धंदा तेजीत चालला होता.
केरी समुद्रकिनारी असलेला हा पठार पालये गावाचा भाग आहे. मात्र, या पठारावर जाण्यासाठी केरी गावातून जावे लागते. या ठिकाणी सध्या ५ ते ६ व्यावसायिक राजू नामक तसेच इतर स्थानिकांच्या मदतीने पॅराग्लायडिंगचा व्यवसाय करीत होते. त्यातील फक्त एका व्यक्तीकडेच परवाना होता. तर इतरांकडून अवैधपणे हा व्यवसाय चालवला जात होता. पॅराग्लायडिंगसाठी पठारावर पॅराग्लायडिंग तळ तयार करण्यात आला आहे, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.
२०१३ मध्ये आतंकवादी सय्यद अफाकीने पॅराग्लायडिंगचे प्रशिक्षण घेतल्याचे उघड झाल्यावर गोवा पोलिसांच्या आतंकवादी विरोधी पथकाने याठिकाणी सुमारे दोन महिने सतत गस्त ठेवली होती. या पथकाच्या चौकशीत प्रशिक्षक नरेंद्र रमण यानेच अफाकीला हे प्रशिक्षण दिल्याचे उघड झाले होते. हे प्रकरण थंडावल्यानंतर पुन्हा या ठिकाणी नरेंद्र रमण व साथीदारांच्या माध्यमातून पॅराग्लायडिंगच्या कसरती आणि प्रशिक्षण सुरू होते.
शिवाय २०१५ मध्ये याच पठारावर नागपूरमधील पेट्रोल व्यावसायिकाचा मुलगा हरसाहेब बवेजा (२४, नागपूर) या पर्यटक युवकाचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाला होता. त्यानंतर हरमलमधील स्वीट वॉटर लेक या तळीकडे जाणार्या अनेक पर्यटकांचा अपघात घडला होता.
या पॅराग्लाडिंगच्या बेकायदा व्यवसायाचा मुद्दा ग्रामस्थांनी उपस्थित केल्यामुळे केरी ग्रामपंचायतीने काही वर्षांपूर्वी ठराव घेत पॅराग्लायडिंगवर बंदी घालण्याची मागणी केली होती. मात्र, ही जागा पालये ग्रामपंचायत हद्दीत येत असल्यामुळे अद्याप या पंचायतीने याविरोधात ठराव घेतलेला नाही. शिवाय ही जागा पॅराग्लाडिंगसाठी पूरक नाही, अशी माहिती समोर आली आहे.
हा पठार पालये पंचायत क्षेत्राचा भाग असला तरीही पठारावर जाण्यासाठी केरी गावातूनच जावे लागते. तिथूनच पर्यटक पठारावर जातात आणि पॅराग्लायडिंग करतात. केरी गावातील लोक तसेच पंचायतीने या व्यवसायाला हरकत घेतलेली आहे, असे पालये पंचायतीचे पंच सागर तिळवे यांनी सांगितले.