उत्तर गोवा मोटार अपघात दावा लवादाचा आदेश
प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : केरीये-खांडेपार येथे २०१७ मध्ये दोन दुचाकी आणि मिक्सचर ट्रक यांच्यात अपघात झाला होता. त्यात दुचाकीवर मागे बसलेल्या आणि ट्रकच्या चाकाखाली सापडलेल्या हेरंब सुभाष तिळवे या १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. त्याच्या आईला ३० दिवसांच्या आत ९ टक्के व्याज दरासह १५ लाख ९६ हजार ७०० रुपयांची नुकसान भरपाई द्यावी. रक्कम वरील मुदतीत न दिल्यास त्यावर २ टक्के दंडात्मक व्याज देण्याचा आदेश फोंडा येथील उत्तर गोवा मोटार अपघात दावा लवादाचे अध्यक्ष अपूर्वा नागवेकर यांनी दिला आहे.
या प्रकरणी हेरंब याची आई आशालता तिळवे यांनी मोटार अपघात दावा लवादाकडे याचिका दाखल केली होती. त्यात त्यांनी बरुणा कुमार रौता (ट्रकचालक), एम. वेंकटराव इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड (मिक्स्चर ट्रक कंपनी) आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांना प्रतिवादी केले होते. या प्रकरणी फोंडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार, ५ सप्टेंबर २०१७ रोजी सायं. ५ वा. मिक्स्चर ट्रक खांडेपारहून फोंड्याकडे येत असताना केरये-खांडेपार येथे विरुद्ध दिशेने येणाऱ्या मेस्ट्रो स्कूटरला धडक दिली होती. या भीषण अपघातात दुचाकीवर मागे बसलेला हेरंब तिळवे ट्रकच्या चाकाखाली येऊन ठार झाला होता. फोंडा पोलीस स्थानकाचे तत्कालीन उपनिरीक्षक अरुण बाकरे यांनी ट्रकचालक बरुणा कुमार रौता याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती.
या प्रकरणी हेरंब याची आई आशालता यांनी गोवा मोटार अपघात दावा लवादाकडे खटला दाखल करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. न्यायालयात सुनावणी झाली असता, तिळवे यांच्यातर्फे अॅड. व्ही. देऊळकर यांनी बाजू मांडून नुकसानभरपाईचा दावा केला. ट्रक चालकाने बाजू मांडताना दुचाकी चालक अल्पवयीन होता. त्याच्याकडे वाहन परवाना नव्हता. त्याने प्रथम मोटारसायकलला धडक दिली. त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि दुचाकीवर मागे बसलेला हेंरब रस्त्यावर फेकला गेला आणि ट्रकच्या चाकाखाली आला. लवादाने सर्वांची बाजू एेकून ३० दिवसांच्या आत ९ टक्के व्याज दरासह १५ लाख ९६ हजार ७०० रुपयांची भरपाई देण्याचा आदेश दिला.