पणजीतील पशुवैद्यकीय हॉस्पिटलमध्ये १.३१ लाखांची अफरातफर

रिसेप्शन व्यवस्थापक महिलेविरुद्ध गुन्हा नोंद

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
5 hours ago
पणजीतील पशुवैद्यकीय हॉस्पिटलमध्ये १.३१ लाखांची अफरातफर

म्हापसा : सांतइनेज पणजी येथील फेअरी टेल्स सर्व्हिसेस एलएलपी कांपाल ट्रेड सेंटर या वेटरीनरी (पशुवैद्यकीय) हॉस्पिटलमध्ये १.३१ लाखांची अफरातफर करण्यात आली. याप्रकरणी पणजी पोलिसांनी हॉस्पिटलची रिसेप्शन व्यवस्थापक राधा बारेकर (रा. सांताक्रुझ) हिच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

हॉस्पिटलचे मालक सौरभ वासुदेवा (रा. मिरामार) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. १८ महिन्यांपासून सुरू असलेला गैरव्यवहाराचा प्रकार ३ जानेवारी रोजी उघडकीस आला. त्यानंतर शुक्रवार, दि. १७ रोजी पोलिसांत तक्रार दिली.

हॉस्पिटलमध्ये पशुचिकित्सेसाठी येणार्‍या ग्राहकांकडून चिकित्सा खर्चाची काही रक्कम आगाऊ घेतली जात होती. तर शिल्लक रक्कम चिकित्सेनंतर घेतली जात असे. यातील काही रक्कम संशयित आरोपी महिलेने हॉस्पिटलच्या खात्यात जमा न करता स्वतःच्या बँक अकाऊंटचा क्यूआर कोड वापरून आपल्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यास सुरुवात केली. हॉस्पिटल मालकाच्या हा प्रकार निदर्शनास आल्यावर त्यांनी चौकशी केली. संशयित कर्मचारी महिलेने एकूण १ लाख ३१ हजार ७ रूपयांची अफरातफर केल्याचे आढळून आले.

पणजी पोलिसांनी या प्रकरणी संशयित महिलेविरुद्ध भा.न्या.सं.च्या ३१६(४) कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे. संबंधित महिलेला चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली रोहन नागेशकर करीत आहेत.