दयानंदनगर येथील ‘हिट अँड रन’ प्रकरणातील अज्ञात वाहनाचा शोध जारी

पार्टीसाठी लिंबू, कांदे घेऊन परतताना पहाटे झाला होता अपघात

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
10 hours ago
दयानंदनगर येथील ‘हिट अँड रन’ प्रकरणातील अज्ञात वाहनाचा शोध जारी

फोंडा : दयानंदनगर-धारबांदोडा येथील राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी सकाळी झालेल्या अपघात प्रकरणी अज्ञात वाहनाचा शोध घेण्याची दिशा बदलण्यात आली आहे. मोले येथे मित्राच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पार्टीसाठी लिंबू व कांदे कमी पडल्याने पहाटेच्या वेळी दोघेजण दुचाकी घेऊन तिस्क-उसगावमध्ये आले होते. कांदे व लिंबू घेऊन परत जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनाची धडक बसून अपघात घडला. फोंडा पोलीस अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत.

दयानंदनगर येथे अज्ञात वाहनाची धडक बसून दुचाकी चालक महमदरिफ हुसेनबाशा मोमीन (२८, भूमिकानगर- उसगाव, मूळ कर्नाटक) याचा मृत्यू तर मागे बसलेला रोहित निकोलस कुजर (२०, भूमिकानगर, मूळ झारखंड) हा गंभीर जखमी झाला. पोलिसांनी गुरुवारी केलेल्या पंचनाम्यावेळी दुचाकी चालक मोले येथून तिस्क उसगावच्या दिशेने जात असल्याचे घटनास्थळी पाहिल्यानंतर दिसून येत होते. गुरुवारी संध्याकाळी जखमी झालेल्या युवकाने पोलिसांना दिलेल्या जबाबात पार्टीत लिंबू व कांदे कमी पडल्याने तिस्क-उसगाव येथे येऊन कांदे व लिंबू घेऊन परत मोले येथे जात असताना अपघात घडल्याचे स्पष्ट केले. पोलिसांनी तिस्क- उसगावहून मोलेच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. पण जखमी झालेल्या युवकाने उपचार सुरू असताना दिलेल्या जबाबानंतर पोलिसांना तपासाची दिशा बदलण्याची वेळ आली.

पार्टीत गुरुवारी रात्री कांदे व लिंबू कमी पडले होते. त्यामुळे महमदरिफ आणि रोहित कुजर दुचाकी घेऊन सकाळी ४.३० वा. तिस्क-उसगाव येथे आले होते. आपल्या खोलीजवळ येऊनसुद्धा महमदरिफ मोमीन याने कुटुंबीयांना जागे न करता अवघ्या दोन मिनिटात माघारी परत मोलेच्या दिशेने वाट धरली. मात्र लिंबू व कांदे कुठून घेतले हे समजू शकले नसल्याने पोलीस सध्या वेगळ्या दिशेने तपास करत आहेत. अपघातानंतर घटनास्थळीहून धूम ठोकलेले अज्ञात वाहन फोंडा किंवा साखळीच्या दिशेने जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निरीक्षक विजयनाथ कवळेकर तपास करीत आहेत.

पोलिसांकडून सीसीटिव्ही कॅमेरांची तपासणी

अज्ञात वाहनाचा शोध घेताना फोंडा पोलिसांनी काही सीसीटिव्ही कॅमेरांची तपासणी केली. त्यावेळी दुचाकी चालक सुसाट वेगाने जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

‘हिट अँड रन’मध्ये खेकडे विक्रेता जखमी

आमोणा जंक्शनवर खेकडे विकणारा एक विक्रेता ‘हिट अँड रन’मध्ये गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर धडक देऊन चालक तेथून फरार झाला. याप्रकरणी डिचोली पोलिसांकडून तपास सुरू केला आहे.