आगुस्तिन कार्व्हालोचा २५ प्रकरणांत हात, त्याशिवाय आणखी सुमारे २० गुन्हे त्याच्यावर नोंद
मडगाव : मुगाळीतील रामनगरी जंक्शनवर तक्रारदार प्रकाश निदोनी यांच्याकडील बॅग हिसकावून घेत त्यांच्यावर थुंकून सराईत गुन्हेगार आगुस्तिन कार्व्हालो (रा. माजोर्डा) पळून गेला होता. याप्रकरणी मायना कुडतरी पोलिसांनी गुन्हा नोंद करत संशयिताला अटक केली. मडगाव न्यायालयाचे मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी संशयिताला ९० दिवसांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सराईत गुन्हेगार असलेल्या संशयित आगुस्तिन कार्व्हालो याने मायना कुडतरी पोलीस ठाण्याच्या परिसरात मुगाळीतील भगवती कॉलनीनजीक रामनगरी जंक्शनवर चोरी केली. संशयित कार्व्हालो याने २४ जून २०२४ रोजी रामनगरी जंक्शनवर थांबलेल्या तक्रारदार प्रकाश निदोनी (रा. हाउसिंग बोर्ड, घोगळ) यांच्याकडील बॅग जबरदस्ती धक्काबुक्की करत खेचून घेतली.
त्यानंतर तक्रारदारांच्या अंगावर थुंकून गाडीवरुन पसार झाला होता. या बॅगेतील ४० हजार रुपये संशयिताने चोरी केले होते. याप्रकरणी मायना कुडतरी पोलिसांनी जबरदस्ती करत चोरी केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केलेला होता.
याप्रकरणी मडगाव पोलीस उपअधीक्षक व मायना कुडतरी पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संकेत नाईक यांनी याप्रकरणी तपास करत पुरावे गोळा केले होते.
संशयित आगुस्तिन कार्व्हालो हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी सुमारे २५ प्रकरणांत त्याला अटक करण्यात आलेली असून त्याशिवाय आणखी सुमारे २० गुन्हे त्याच्यावर नोंद आहेत. सोनसाखळी चोरी करुन पळून जाणे, पोलीस असल्याचे भासवून लोकांना लुबाडणे असे विविध गुन्हे त्याच्या नावावर आहेत.
त्याला दक्षिण गोव्यातून तडीपारही करण्यात आलेले होते. मडगाव येथील मुख्य न्यायदंडाधिकारी कार्लो सांतान दा सिल्वा यांच्या न्यायालयासमोर सुनावणी झाली असता संशयित कार्व्हालो याने गुन्हा केल्याची कबुली दिली.
त्यानुसार त्याच्यावर जबरदस्ती करणे व चोरी केल्याप्रकरणी आरोप निश्चित करण्यात आले होते. याप्रकरणी न्यायालयाकडून आरोपी आगुस्तिन कार्व्हालो याला ९० दिवसांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.
तसेच त्याने याआधी भोगलेल्या कारावासाचा अवधी कमी करण्याचे आदेशात नमूद आहे. सराईत आरोपीला शिक्षा झाल्यानंतर दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक सुनीता सावंत यांनी याप्रकरणी तपासकाम केलेल्या पोलीस उपनिरीक्षक संकेत नाईक याचे अभिनंदन केले.