एक सर्वसामान्य कार्यकर्ता, माजी आमदार, भाजपमधील सभांचे सूत्रसंचालक, नाट्य आणि चित्रपट कलाकार अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून दामू नाईक यापूर्वी दिसले. आता त्यांची जबाबदारी आणि भूमिकाही बदलली आहे.
गेली बारा-तेरा वर्षे आमदार नसताना पण पक्षाशी प्रामाणिक असतानाही महामंडळ किंवा कुठल्या लाभाच्या पदासाठी पक्षाकडे तगादा न लावता पडेल ती जबाबदारी घेणारे दामू नाईक शेवटी भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले. कालपरवापर्यंत भाजपच्या सभांमधून सूत्रनिवेदनासाठी माईक पकडून मोठमोठ्याने पक्षाचा जयघोष करणारा हा कार्यकर्ता भाजपसारख्या बलाढ्य पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी येणे हेही सर्वसामान्य कार्यकर्त्यांना भाजप आपली दखल घेतो हे कळण्यास पुरेसे आहे. मावळते अध्यक्ष सदानंद शेट तानावडेही काही वर्षांपूर्वी पक्षाच्या मुख्य धारेतून बाहेर दुर्लक्षित होते. पण त्यांनी पक्षासाठी जे काही गेल्या वीस-पंचवीस वर्षांच्या काळात केले त्याचे फळ म्हणून सलगपणे चार वर्षे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार होऊ शकले. गेल्या सहा-सात वर्षांमध्ये काँग्रेसमधून दीड डझन आमदार भाजपात आले. त्यांच्यामुळे भाजपच्या अनेक स्थानिक कार्यकर्त्यांवर अन्याय होत आला असा नेहमी सूर असतो. भाजपचे जुने मूळ कार्यकर्ते आणि काँग्रेसमधून आलेले आमदार यांच्यात समन्वय साधण्याचे काम भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना करावे लागते. काहीवेळा स्थानिक आमदार यामुळे नाराजही होऊ शकतात. असे असले तरी भाजपचा कार्यकर्ता दुखावला जाऊ नये ही जबाबदारी प्रदेशाध्यक्ष म्हणून दामू नाईक यांच्यावर असेल. गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये वीसपेक्षा जास्त आमदार काँग्रेस, मगोमधून भाजपात आले. त्यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते आणि त्या मतदारसंघांतील भाजपचे कार्यकर्ते यांना पक्षासोबत ठेवण्याचे काम हे कसरतीसमान असते. भाजपच्या प्रदेशाध्यक्षासमोर हे मोठे आव्हान असते, कारण मूळ भाजप कार्यकर्त्यांना काँग्रेसमधून आलेले बहुतेक आमदार किंमत देत नाहीत अशा तक्रारी पक्षाच्या अंतर्गत बैठकांमध्ये असतात. दामू नाईक यांना भाजपात आलेले नेते आणि स्थानिक भाजप कार्यकर्ते यांच्यातील दरी कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
दामू नाईक २०१२ मध्ये पराभूत झाल्यानंतर फातोर्डा मतदारसंघात पुन्हा निवडून येऊ शकले नाहीत. काहीवेळा भाजपमधील काही नेत्यांनीच त्यांना साथ दिली नाही असा आरोपही झाला आहे. भाजपच्या काही तत्कालीन वरिष्ठ नेत्यांनी दामू नाईक यांच्या पराभवासाठी त्यांच्या प्रतिस्पर्धींना आतून मदत केली याची चर्चा आजही सासष्टीत आहे. एरवी विजय सरदेसाई हे पर्रीकरांना कधीच जास्त जवळचे नव्हते. त्याचा उल्लेख पर्रीकरांनी काहीवेळा बैठकांमधून केला होता पण २०१७ मध्ये विजय सरदेसाई यांनी पुढाकार घेऊन मनोहर पर्रीकर यांना गोव्यात आणून मुख्यमंत्री करण्यासाठी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला त्यावेळी दामू नाईक यांच्या विरोधात खरेच काही छुपे डाव होते ही शक्यता बळावली. दुसऱ्या बाजूने फातोर्डा, मडगावमधील काही लोकांनी त्यावेळी जहाल भाषेत एक पत्र दामू नाईकच्या विरोधात पेरले. २००७ ते २०१२ च्या दरम्यान दामू नाईक हे भाजपातील तरुण आणि सर्वांच्या आवडीचे होते. केंद्रीय नेत्यांना दामू नाईक यांच्याविषयी फार हेवा वाटायचा. पर्रीकर संरक्षण मंत्री म्हणून दिल्लीत गेले त्यावेळी दामू नाईक आमदार असते तर ते मुख्यमंत्रीही झाले असते. पण दुर्दैवाने त्यांना २०१२ नंतर फातोर्डात पुन्हा जम बसवता आला नाही. हे दुर्दैव फार काळ टिकू शकले नाही. कारण दामू नाईक यांना प्रदेशाध्यक्ष हे पक्षातील सर्वात मोठे पद वाट्याला आले. भाजपची सत्ता असताना या पदाचे गोव्यात किती महत्त्व ते गेल्या चार-पाच वर्षांमध्ये सर्वांनीच पाहिले. प्रदेशाध्यक्षपद हे मुख्यमंत्र्यांनंतर भाजपमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे आणि उपमुख्यमंत्रीपदासारखेच वजनदार पद बनले. पक्षाशी प्रामाणिक राहिल्यामुळेच हे फळ दामू नाईक यांना मिळाले. पोस्टर लावणारा साधा कार्यकर्ता मुख्यमंत्री होतो. कधीकाळी पक्षाने दुर्लक्षित केलेला नेता प्रदेशाध्यक्ष आणि खासदार होऊ शकतो. दामू नाईकला पुन्हा पुन्हा पराभवाचा सामना करूनही पक्षाचे काम करण्याचे सोडले नाही. मध्यंतरी काहीकाळ दामू नाईक वेगळ्याच पद्धतीने वागतात अशी टिका व्हायची. दामूंनाही ते काही मित्रांनी सांगितले. आता प्रदेशाध्यक्ष झाल्यामुळे दामू नाईक यांना निश्चितच बदलावे लागेल. २०२७ मध्ये होणारी विधानसभा निवडणूक ही दामू नाईक यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या नेतृत्वाखाली होईल. त्यामुळे आतापासूनच ताळागाळातील कार्यकर्त्यांकडे दामू नाईक यांना जुळवून घेत त्यांच्या समस्याही सोडवाव्या लागतील.
भंडारी समाजात मतभेद होत असताना भाजपने त्या समाजातील नेत्याला प्रदेश अध्यक्ष म्हणून निवडल्यामुळे पक्षासाठी तीही जमेची बाजू ठरेल. गोव्यातल्या सर्वात मोठ्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष भंडारी समाजाचा असल्यामुळे समाजालाही पक्षासोबत ठेवण्याची जबाबदारी दामू नाईक यांच्यावर असेल. लक्ष्मिकांत पार्सेकर, विनय तेंडुलकर आणि सदानंद शेट तानावडे यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कार्यकाळात भाजपला गोव्यात सरकार स्थापन करण्यात यश आले. २०२७ च्या निवडणुकीत पुन्हा भाजपचे सरकार आणण्यासाठी आता दामू नाईक यांची जबाबदारी असेल. दामू नाईक तळागाळातील कार्यकर्त्यांना जिंकू शकतील अशी खात्री भाजपला आहे. कार्यकर्त्यांची मने जिंकली तर २०२७ मध्येही भाजपला हवा तसा चमत्कार होऊ शकतो असे भाजपला वाटत असावे त्यामुळेच त्यांच्याकडे ही जबाबदारी दिली असण्याची शक्यता आहे. एक सर्वसामान्य कार्यकर्ता, माजी आमदार, भाजपमधील सभांचे सूत्रसंचालक, नाट्य आणि चित्रपट कलाकार अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून दामू नाईक यापूर्वी दिसले. आता त्यांची जबाबदारी आणि भूमिकाही बदलली आहे. दामू नाईक भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. ‘प्रत्येक कार्यकर्ता हा प्रदेशाध्यक्ष आहे’ असे म्हणत पहिल्याच भाषणातून दामू नाईक यांनी कार्यकर्त्यांना बळ दिले. त्यांनी सुरू केलेला हा अध्याय पुढे कशा मार्गाने जातो ते पाहू.
(लेखक दै. गोवन वार्ताचे संपादक आहेत.)
पांडुरंग गांवकर, ९७६३१०६३००