कुणकेरी गावाच्या एका टोकावर, एकाकी घरात राहणाऱ्या मृणालला लोक 'मोगरा काकू' म्हणून ओळखत. तिचे जीवन विधवा म्हणून दुःखात गेले, पण तिचा शांत स्वभाव आणि मोगऱ्याचा सुगंध कायम दरवळत राहिला.

हिरवेगार डोंगर. कड्याकपारीतून वाहणारी नदी. दोन गावांना पाणी देणारी पण अथांग पसरलेल्या नदीच्या पाण्यामुळे दोन्ही गावं दुरावलेली. अशा या कुणकेरी गावाच्या एका टोकावर, जुनाट वाटसरूंना थांबायला निवांत जागा असलेलं एक घर आहे. ते चिरफळ्यांचं, मातीचं, झाडाझुडपांमध्ये लपलेलं कुणालाही पटकन नजरेला न पडणारे. रात्रीच्या वेळी तर घरातला मिणमिणता उजेड काजवा चमकावा तसा वाटे. अशा या एकाकी घराच्या अंगणात एक मोठं मोगऱ्याचं झाड मात्र कायम बहरलेलं असे. सकाळी सकाळी त्या घराकडून मोगऱ्याचा सुगंध वाऱ्यावर सर्वत्र दरवळतो. अशा या सुगंधी सकाळी त्या झाडाखाली एक बाई पांढऱ्या साडी नेसून, सुरकुतलेल्या चेहऱ्याने, पण डोळ्यांत शांतता असलेल्या नजरेने बसलेली असते. तिचं नाव असतं मृणाल. पण गावात तिला कोणीही मृणाल म्हणून ओळखत नाहीत. सगळ्यांसाठी ती असते ‘मोगरा काकू’.
मोगरा काकूचा म्हणजेच मृणालचा जन्म गावातील प्रतिष्ठित, घरंदाज कुटुंबात झाला. तिचे बाबा श्रीधरपंत गावाच्या प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक आणि आई सुमतीबाई शांत, संयमी आणि अतिशय धार्मिक स्त्री. त्यांचं घर म्हणजे शिस्त, प्रेम आणि सुसंस्कृततेचा संगम वाटावा असं होतं. अंगणात रोज सकाळी गाईच्या शेणाने सडा सारवण करणं, तुळशीला पाणी घालणं, संध्याकाळी देवघरात सायंप्रार्थना, रामरक्षा म्हणणं अशा संस्कारात मृणाल लहानाची मोठी होत होती.
मृणाल लहानपणापासूनच हसरी, सगळ्यांना मदत करायला पुढे येणारी. शाळेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या मृणालला गायन व नृत्य शिकायला आवडत असे. गावातल्या महिलांच्या कीर्तनात अभंग म्हणताना ती भान हरपून गात असे. तिने गोड आवाजात म्हटलेल्या अभंगामुळे सर्वजण कीर्तनात तल्लीन होऊन जात. तिची एक सवय मात्र सगळ्यांना आवडायची. दर सकाळी परसबागेत फुललेलं सुवासिक फूल आणून आईला द्यायची व म्हणायची, “आई हे केसांत माळ ना.” आई ते फूल केसांत माळायची आणि तिला म्हणायची, “बाळा, तूच माझा सुगंध आहेस. तू हसतेस, खेळतेस, बागडतेस, तेव्हा अख्खं घर दरवळतं.” हळूहळू मृणाल मोठी होत होती. वयाच्या सोळाव्या वर्षी तिला एक स्थळ सांगून आलं. अक्कलकोटजवळील एका श्रीमंत आणि सुसंस्कृत कुटुंबातील युवक गंगाधर महाडिक याचे. गंगाधर प्रामाणिक, गोड बोलणारा आणि विचारवंत असा शिक्षक होता. हे स्थळ सर्वांना पसंत पडल्यावर मृणाल आणि गंगाधर यांचे लग्न धूमधडाक्यात झाले. मृणालच्या डोळ्यांत नवीन आयुष्याची स्वप्नं होती. गंगाधरने पहिल्याच रात्री तिला म्हटले, “तू फक्त मृणाल नाहीस. मोगऱ्यासारखी वाटतेस. सौम्य, शांत पण सुवासिक. तुला मोगरा आवडतो ना. हा घे मोगऱ्याचा गजरा.” त्याच दिवसापासून ती गंगाधरची ‘मोगरा’ झाली. तिच्या प्रेमळ संसाराची फुलं हळूहळू उमलायला लागली. सासरच्या लोकांनी तिला सून न समजता मुलगीच मानली होती. ती सकाळी लवकर उठून गंगाधरसाठी डबा बनवायची, त्याचे कपडे नीट इस्त्री करायची. गंगाधर तिला संध्याकाळी देवळात घेऊन जायचा. ते दोघेही एकत्र रामायण वाचायचे. मोगरा एखाद्या दिवशी अभंग म्हणायची. त्यांचे जीवन म्हणजे गंधमय सोहळा आहे, असं लोकांना वाटायचे. पण स्वप्नं जशी येतात, तशीच मोडतात. लग्नाला नऊ महिनेच झाले होते. एक दिवस गंगाधर शाळेतून परत येताना ट्रकखाली आला. त्याचा जागीच मृत्यू झाला. ही बातमी मृणालवर वज्राघातासारखी आदळली. तिच्या नशिबात गंगाधरच्या रूपाने आलेला सुगंध परत एकदा मंद होत दूर गेला होता, परत कधीही न दरवळण्यासाठी. गंगाधरची मोगरा पायातल्या पैंजणांसकट जाग्यावरच कोसळली. सासरच्या घरात आठवडाभर आक्रोश होता. पण नंतर लोक शांत झाले.. आणि बोलू लागले. “नवरा मेला, आता हिचा काय उपयोग?” “विधवा आहे. वाईट वेळ येऊ नये म्हणून वेगळी ठेवावी.” सासऱ्यांनी एक दिवस हळूच सांगितलं, “मृणालबाई, तू माहेरी जा. आम्ही काळजी घेऊ, पण आता तुझं इथं काही उरलेलं नाही.” मृणालला माहेरी परत पाठवलं गेलं. आई-वडिलांनी तिला मायेने घरात घेतलं, पण गावातल्या नजरा वेगळ्या होत्या. “हिच्यामुळे अपशकुन झाला.” “हिला पाहिलं, तर आपलं काम बिघडतं.” अशा वावटळी लोक कुजबुजत. काही लोक तर उघडपणे ऐकू येईल अशा आवाजात बोलत. मृणाल आता हे सगळं ऐकून बिचकून राहू लागली. तिला वाटायचं, आपलं अस्तित्वच शापित आहे. मृणालच्या वडिलांवर गावकऱ्यांचा दबाव वाढत होता. शेवटी गावातील काही लोकांच्या दबावाखाली येऊन त्यांनी एक निर्णय घेतला आणि घराच्या मागच्या बाजूस, झाडाझुडपांमागे मृणालला एक वेगळं घर बांधून दिलं. “ही एकटीच राहील. पण आपल्यापासून फार लांब नाही,” आई काळजावर दगड ठेवून म्हणाली. शेवटी गावकरी व रूढीपुढे तिची बिचारीची आईची माया हतबल झाली. त्या दिवसापासून मृणालच्या नावासोबत ‘काकू’ आणि ‘एकटी’ हे शब्द कायमचेच चिकटले.
मोगरा काकू रोज मातीची चूल पेटवत असे, एकटीच जेवण करत असे. गंगाधरचा फोटो समोर ठेऊन, त्याच्यापुढे रोज एक मोगऱ्याचं फूल वाहायची. तिचं मोगऱ्याचं झाड हाच तिचा एक साथी होता. तिच्याशी कुणीही बोलायला येत नसे. एखादं मूल पळत सुटून तिच्या अंगणात आलं, तरी त्याची आई ओरडून त्या मुलाला ओढत घेऊन जाई. मात्र मोगरा काकूने कधीही तक्रार केली नाही. ती सकाळी स्नान करून देवासमोर बसून रामरक्षा, दुर्गा सप्तशती, अभंग म्हणायची. तिचा दिवस देवपूजा व वाचनात जायचा. संध्याकाळी मोगऱ्याच्या फुलांचा गजरा बनवून देवाला वाहायची. कित्येक वर्षांनी गावातल्या शाळेत नवीन शिक्षिका आली. तिचं नाव होतं राधा. राधा शहरातून आलेली, नव्या विचारांची, पण माणुसकी जपणारी. नुकतेच शिक्षण संपवून नोकरीसाठी अर्ज केल्यावर तिला या शाळेत नोकरीसाठी पाठवलं होतं. तिला शाळेजवळ घर मिळेना, म्हणून मोगरा काकूच्या घराजवळ तात्पुरतं थांबावं लागलं. ती पहिल्यांदा मोगरा काकूला भेटली, तेव्हा काकूने हसून चहा बनवला. म्हणाली, “थांब गं, चहा झालाय. मोगऱ्याच्या हातचा चहा पिऊन जा.” त्या दिवसापासून राधा रोज संध्याकाळी मोगरा काकूजवळ यायची. तिच्याशी गप्पा मारायची, तिला पुस्तके वाचून दाखवायची. मोगरा काकूच्या डोळ्यांतली शांती तिला भुरळ घालत असे.
एक दिवस राधा म्हणाली, “काकू, तुम्ही इतकी वर्षं एकटं राहता. कसं तरी नाही वाटत का तुम्हाला?” मोगरा काकू डोळे मिटून म्हणाली, “लक्ष्मीच्या भोगात जे सौख्य नाही, ते रामाच्या नावात आहे, बाळा. मी एकटी नाही. गंगाधर, देव आणि मोगऱ्याचा सुगंध हे सगळे माझे सोबती आहेत.” एक दिवस मोगरा काकूने राधाला आपले एक गाठोडे दिले. त्यात मोगऱ्याच्या वासाचा एक जुना गजरा, गंगाधरचा फोटो आणि एक वही होती. त्यात तिच्या आवडत्या कविता, लोकगीते आणि गाणी होती. “हे तू ठेव. हे तू ठेव. जेव्हा माझी आठवण येईल, वाच.” दुसऱ्या दिवशी सकाळी, राधा आली. तर मोगरा काकू खाटेवर निपचित पडलेली. चेहऱ्यावर शांततेचं हास्य, हातात मोगऱ्याचं एक फूल.
राधा ओक्साबोक्शी रडली. गावातील लोकही हळहळले. ज्यांनी तिला टाळलं, त्यांनी आज तिला फुलं वाहिली. तिचा अंत्यसंस्कार अनाथ पण सन्मानाने केला. आज त्या जागी एक छोटासा चौथरा बांधलेला आहे. ‘मोगरा माईची आठवण’ म्हणून कुणी तिथे एखादं फूल ठेवून नमस्कार करून निघून जातं. ती मनातल्या मनात म्हणते, “माझ्या वाट्याला तुझ्यासारखं दु:ख नको देऊ. तुझ्या पायावर माझं सगळं दुःख ठेवून सुख माझ्या पदरात दे.” मोगरा काकू गेली. पण तिचा सुगंध अजूनही त्या चौथऱ्याच्या पायरीवर कुणी ठेवलेल्या फुलांत दरवळतो आहे.
