लक्षवेधी जिल्हा पंचायत निवडणुका: सत्ताधारी आणि विरोधकांचा खरा कस

गोव्यातील आगामी जिल्हा पंचायत निवडणुका राजकीय वातावरण तापवत आहेत. आरक्षणाची अधिसूचना आणि उमेदवारी जाहीर होण्याची प्रक्रिया सुरू असताना, हा निकाल सर्वच पक्षांसाठी त्यांची ताकद आणि जनमताचा अंदाज घेणारा ठरणार आहे.

Story: कॉलिंग अटेंशन |
4 hours ago
लक्षवेधी जिल्हा पंचायत निवडणुका: सत्ताधारी आणि विरोधकांचा खरा कस

जिल्हा पंचायत निवडणुकांना जेमतेम एक महिना असल्याने राजकीय वातावरण तापण्यास सुरवात झाली आहे. आरक्षणाची अधिसूचना जारी झाल्यानंतर उमेदवारांचे चित्र काही प्रमाणात स्पष्ट झाले आहे. तारीख जाहीर झालेलीच आहे. अधिसूचना जारी होताच राजकीय पक्षांकडून उमेदवारांची निवड जाहीर होईल. निकाल काहीही लागला तरी सर्वच राजकीय पक्षांना आपल्या ताकदीचा वा एकंंदर वातावरणाचा अंंदाज येणार आहे. यामुळे जिल्हा पंचायत निवडणुकीचा निकाल महत्त्वाचा ठरणार आहे.

देशातील इतर राज्यांंप्रमाणे गोव्यात भारतीय जनता पक्षाची घोडदौड सुसाटपणे सुरू आहे. मागच्या वेळी म्हणजे २०२२ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले. यामुळे डॉ. प्रमोद सावंंत यांंचे मुख्यमंत्रिपद आणखी मजबूत झाले. विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या जिल्हा पंंचायत निवडणुकीत सुद्धा भाजपनेच बाजी मारली होती. पक्ष म्हणून विचार केला तर काँग्रेस वा इतर पक्षांंपेक्षा भाजपची स्थिती मजबूत आहे. पक्षाच्या प्रत्येक मतदारसंंघात समित्या आहेत. या समित्यांंच्या नियमितपणे बैठका होतात. याशिवाय बुथ समित्या आहेत. जिल्हा तसेच राज्य समित्याही सक्रिय आहेत. केंंद्र तसेच राज्य सरकारच्या योजना कार्यकर्त्यांमार्फत पोचविण्यासह पक्षाचाही प्रचार या समित्या करतात. यामुळे कधीही निवडणूक झाली वा कोणीही उमेदवार असला तरी एकंंदर पक्षाला फरक पडत नाही. यामुळे बंंडखोरी झाली तरी मातब्बर उमेदवाराला भाजपाचा अधिकृत उमेदवार खंंबीरपणे लढत देतो. आताच्या जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपामध्येच इच्छुकांंचा आकडा सर्वाधिक आहे. प्रत्येक मतदारसंंघात किमान तिघे तरी इच्छुक आहेत. एखाद्या कोणाला तरी उमेदवारी मिळणार आणि इतर दोघे जण नाराज होणार. नाराज होणाऱ्यांंमध्ये एखाद, दुसऱ्याची समजूत काढणे पक्षाला शक्य होणार असले तरी सर्वांची समजूत काढणे शक्य होणार नाही. यामुळे बंडखोरी ही होणारच आहे. याचा फटकाही पक्षाला बसणार आहे. फटका किती प्रमाणात बसेल? यावर एकंंदरीत निकाल अवलंबून असेल. बंंडखोर उमेदवार भाजपची किती मते घेईल, यावर सारे काही अवलंबून असेल.

मगो पक्ष सरकारात आहे. यामुळे मगो पक्ष स्वतंंत्रपणे उमेदवार उभे करणार नाही. विधानसभा निवडणूक नजीक असल्याने मगो नेतृत्व स्वतंंत्रपणे उमेदवार उभे करण्याचे धाडस करणार नाही. मात्र काही मतदारसंंघात मगो उमेदवार ठेवेल. भाजपकडे काही जागांंची मागणी मगो नेतृत्व निश्चितपणे करणार आहे. याचा मगोसह भाजपलाही लाभ मिळण्याची शक्यता आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत भाजपला वीस जागा मिळाल्या होत्या. यापैकी कृषी मंंत्री रवी नाईक यांंचेनिधन झाले आहे. रवी नाईक यांंचे निधन झाल्याने फोंडा मतदारसंंघात पोटनिवडणूक होईल. जिल्हा पंंचायत निवडणुकीनंंतर फोंडा पोटनिवडणूक होणार आहे. यामुळे जिल्हा पंंचायत निवडणुकांंच्या निकालानुसार इच्छुक तसेच राजकीय पक्षांना व्यूहरचना तयार करण्यास मदत होणार आहे.

भाजपकडे सध्या आमदारांंची संंख्या अधिक आहे. तसेच अलेक्स रेजिनाल्ड, डॉ. चंंद्रकांंत शेट्ये, आंंतोन वाज या अपक्षांंचाही पाठिंंबा सरकारला आहे. यामुळे या आमदारांंच्या जिल्हा पंंचायत मतदारसंंघात त्या-त्या आमदारांना सांंभाळण्याची कसरत करावी लागणार आहे. विधानसभा निवडणुकीनंंतर मायकल लोबो, दिलायला लोबो, केदार नायक, रूडॉल्फ फर्नांडिस, संंकल्प आमोणकर, राजेश फळदेसाई, अलेक्स सिक्वेरा व दिगंंबर कामत या काँग्रेस आमदारांंनी भाजपमध्ये प्रवेश केला. या मतदारसंंघात भाजपचे मूळ कार्यकर्ते व भाजपात प्रवेश केलेल्या आमदारांंमध्ये मतभेद आहेत. मागील लोकसभा निवडणुकीतही याचा प्रत्यय आला होता. यामुळे दक्षिण गोव्यात पूर्वीपेक्षाही अधिक आमदार असताना महिला उमेदवाराला निवडून आणण्यात पक्षाला अपयश आले होते. जिल्हा पंंचायतीत आमदारांंच्या पसंंतीचा उमेदवार पक्षाने उतरवला आणि त्याला मूळ कार्यकर्त्यांचा पाठिंंबा नसला तर पक्षाला अपेक्षित यश मिळणे कठीण आहे. उमेदवारी न मिळणाऱ्या इच्छुकांंची मनधरणी करणे व अधिकृत उमेदवाराला कार्यकर्त्यांची पसंंती मिळविणे यातच नेतृत्वाचा कस लागणार आहे. आरजी, गोवा फॉरवर्ड, आप हे पक्ष सध्या सक्रिय बनले आहेत. या सर्वांनी काही मतदारसंंघात तरी समझोता करायला हवा. एकंंदरीत कोणत्या पक्षाला कोणत्या मतदारसंंघात किती मते मिळतात, याबद्दल उत्सुकता आहे. यामुळे सत्ताधारी भाजपसह सर्वच राजकीय पक्षांंचा जिल्हा पंचायत निवडणुकीत कस लागणार आहे.

विरोधकांंचा विचार करता काँग्रेसने जिल्हा पंंचायत निवडणुकीच्या तयारीसाठी समिती स्थापन केली आहे. अलीकडच्या काळात काँग्रेसने विविध प्रश्नावर आवाज उठवला आहे. तरी सर्व मतदारसंंघात काँग्रेसच्या समित्या सक्रिय नाहीत. काही मतदारसंंघात तर पक्षाला इच्छुक नसल्याने पदांंवर नियुक्ती करणेही शक्य झालेले नाही. या स्थितीत उत्तर गोव्यात तरी पक्षाला यश मिळणे बरेच कठीण आहे. तरीही सरकारविरोधात जो असंंतोष आहे, त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न काँग्रेसने करायला हवा. यावर जिल्हा पंचायत निवडणुकीत काँग्रेसचे यश अवलंबून असेल. आम आदमी पक्ष काँग्रेससोबत युती करेल असे सध्या तरी वाटत नाही. तरीही काँग्रेस, गोवा फॉरवर्ड व आरजीदरम्यान युती होणे शक्य आहे. भाजपला लढत देण्यासाठी विरोधी पक्षांंची युती व्हायला हवी. विरोधी पक्ष स्वतंंत्रपणे लढले तर विधानसभा निवडणुकीप्रमाणेच जिल्हा पंंचायतीचा निकाल लागणार आहे. युती व जागावाटप यावर बऱ्याच अंंशी काँग्रेसचे यश अवलंबून असेल.


गणेश जावडेकर

(लेखक गोवन वार्ताचे मुख्य प्रतिनिधी आहेत.)