पालक पनीर ही एक पौष्टिक आणि चवदार रेसिपी आहे, जी खास करून लहान मुलांना आवडेल. पालेभाजी असूनही यातील पनीरमुळे मुलं ही डिश आवडीने खातील आणि त्यांना कळणारही नाही की त्यांनी पालक खाल्ला आहे.

साहित्य:
* २ जुड्या पालक
* २ बारीक चिरलेले कांदे व २ उभे चिरलेले कांदे
* २ ते ३ हिरव्या मिरच्या
* १ ते २ लहान चमचे आलं-लसूण पेस्ट
* १ लहान चमचा जिरं
* २ उभे चिरलेले टोमॅटो
* १ मोठा चमचा धने पूड
* १ मोठा चमचा जिरं पूड
* बारीक तुकडे केलेले पनीर
* तेल
कृती:
प्रथम, एका भांड्यात पालक, उभे चिरलेले कांदे, टोमॅटो व मिरच्या घाला. हे सगळे जिन्नस पाणी घालून गॅसवर शिजू द्या. शिजल्यावर ते मिश्रण थंड करा व बारीक वाटून घ्या. आता एका कढईत २ ते ३ मोठे चमचे तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झाल्यावर यात जिरं घाला व ते छान फुटेपर्यंत परतून घ्या. आता यात बारीक चिरलेला कांदा घाला व सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या. कांद्याला सोनेरी रंग आला की त्यात आलं-लसूण पेस्ट, धने पूड आणि जिरे पूड घाला. हे सर्व मसाले दोन मिनिटांसाठी मंद गॅसवर परतून घ्या.
आता यात बारीक वाटलेला पालक घाला व छान उकळी काढा. छान उकळी आली की यात पनीर आणि चवीनुसार मीठ घाला. हा पालक पनीर तुम्ही पराठा, चपाती, किंवा पावाबरोबर खाऊ शकता.
टीप:
तुम्हाला पनीर कुरकुरीत पाहिजे असल्यास, पनीर तूप किंवा बटरमध्ये भाजून घ्या.
पालक पनीरमध्ये शक्यतो मसाले कमीच घालावे.
