खारवन: पर्यावरणाची नैसर्गिक ढाल

खारफुटी म्हणजे खारवन किंवा खारफुटी जी किनारी पर्यावरणाचे रक्षण करते. ती नैसर्गिक तटबंदी म्हणून काम करून पूर आणि भू-धूप रोखतात, तसेच कार्बन शोषून हवामान बदलावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात.

Story: साद निसर्गाची |
5 hours ago
खारवन: पर्यावरणाची नैसर्गिक ढाल

खारफुटी ही एक अशी वनस्पती आहे जी खाऱ्या पाण्यात, नदीमुखाजवळ, खाडी परिसरात किंवा समुद्राचे पाणी येणाऱ्या भागात वाढते. 'खार' म्हणजे समुद्राचे खारे पाणी तर 'फुटी' म्हणजे झाडांचा समूह, वनराई. ह्या वनस्पतीमध्ये पाण्यातील क्षार (मीठ) सहन करण्याची क्षमता असते. या कारणामुळे कदाचित तिला खारफुटी असे नाव पडले असावे.

ह्या वनस्पतीची खासियत म्हणजे त्यांची मुळे. खारफुटीची मुळे जमिनीच्या बाहेर असतात. पाण्यातील ऑक्सिजन कमी असला तरी झाडाला श्वास घेता येतो, त्यामुळे यांना ‘श्वसनमुळे’ (Pneumatophores) असे संबोधले जाते. ही मुळे मातीची धूप कमी करण्यास मदत करतात. यामुळे किनारपट्टी भागातील गावांचे नुकसान होत नाही. त्याव्यतिरिक्त, ही वनस्पती पूर आणि भरतीच्या वेळी पाण्याचा वेग थोपवून जमिनीचे संरक्षण करते. तटबंदीप्रमाणे वाऱ्याचा आणि लाटांचा जोर कमी करते. खारफुटी हे कित्येक मासे, खेकडे, सरपटणारे प्राणी व इतर जलचर प्राण्यांचे वास्तव्याचे ठिकाण. विविध पक्षी, फुलपाखरे, सुरवंट देखील खारफुटीवर अवलंबून असतात. खारवन हे एरवीच्या जंगलांपेक्षा ३-४ पट जास्त कार्बन साठवू शकते. ही वनस्पती प्रचंड प्रमाणात कार्बन शोषून घेत असल्यामुळे हवामान बदल रोखण्यासाठी खारफुटी अत्यंत उपयुक्त मानली जाते.

ह्या वनस्पतीची आणखीन एक खासियात म्हणजे तिचे रोपटे. ह्या वनस्पतीचे ‘रोपटे’ झाडावरच उगवते, जसे ते त्याचेच एक छोटेसे अंग. ते लांबट, शेंगेसारखे दिसते. हे शेंगेसारखे दिसणारे रोपटे एकबाजूने टोकदार असते; जेणेकरून ते झाडावरून चिखल/दलदलीत पडताना थेट जमिनीत उभे पडावे व त्याच्या जगण्याची शक्यता वाढावी. एखादे रोपटे खाली पडताना जर जमिनीऐवजी पाण्यात पडले तर ते काही दिवस पाण्यावर तरंगते व योग्य जागा सापडल्यावर तिथे रुजते. ही झाडे खाऱ्या किंवा अर्ध-खाऱ्या पाण्यात वाढतात. त्यांच्या पानांमध्ये आणि मुळांमध्ये मीठ गाळून टाकण्याची क्षमता असते.

कोकण पट्ट्यात राहणाऱ्या किंवा किनारपट्टीवरील समुदायांत खारफुटी/खाडी पूजनाची प्रथा आहे. खारफुटी असलेल्या ठिकाणी किंवा खाडीच्या पाण्यात दिवे सोडून खाडीची पूजा केली जाते. गावा-गावांनुसार पद्धती बदलतात. साधारणपणे खाडीच्या काठाची स्वच्छता करणे, खारफुटी परिसर साफ करणे, नारळ, फुले आणि हळद-कुंकू अर्पण करणे यासारख्या प्रथा आहेत. काही ठिकाणी खारफुटीच्या विशिष्ट मुळांजवळ किंवा खाडीकाठी नारळ फोडणे, फुले अर्पण करणे, हळद-कुंकू लावणे यासारख्या पारंपरिक पद्धती पाहायला मिळतात.

आजकाल किनारी भागातील बेकायदेशीर बांधकामे, पर्यटनासाठी किनारी भागात केलेले अतिक्रमण, कचरा व प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण, प्रक्रिया न करता पाण्यात सोडलेली औद्योगिक रसायने, नदी–खाडी, नाल्यांत सोडलेल्या सांडपाण्यामुळे होणारे प्रदूषण यामुळे खारफुटीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. जलाशयात परकीय प्रजातींचे अतिक्रमण हा खारफुटीवर येणारा आणखीन एक धोका. वर्तमानात उदभवणाऱ्या धोक्यांचे गांभीर्य ओळखून जलद व दीर्घकालीन उपाययोजना शोधून काढण्याची आवश्यकता भासते. गोव्यातील प्रमुख खारफुटी वनक्षेत्रांमध्ये मांडवी, झुवारी, तळपण, गालजीबाग, शापोरा, साळ यांसारख्या नदीपात्रांचा समावेश होतो. गोवा सरकारने हल्लीच एक ‘मँग्रोव्ह मॅनेजमेंट मास्टर प्लॅन’ म्हणजेच खारफुटी व्यवस्थापन योजना जाहीर केली आहे, ज्यामध्ये किनारपट्टी संरक्षण, खारफुटीचे पुनरुज्जीवन आणि स्थानिक समुदायांचा सहभाग बळकट करण्यावर भर देण्यात येणार आहे.


- स्त्रिग्धरा नाईक