कातयातील काव्यालंकार

गोव्याच्या उधळशे गावातील कातयो लोकनृत्याची आणि त्यातील गीतांची समृद्ध परंपरा उलगडणारा आणि तसेच, निसर्गाशी एकरूप झालेल्या या गावातील लोकांच्या भावविश्वात लोकगीतांचे महत्त्व किती आहे, हे सविस्तर मांडणारा लेख.

Story: लोकरंग |
4 hours ago
कातयातील काव्यालंकार

एका बाजूने महावीर तर दुसऱ्या बाजूने म्हादई अभयारण्य आणि त्यालाच जोडून असलेल्या बोंडला अभयारण्याच्या शेजारील उधळशे हा गाव. पूर्वीच्या सांगे तालुक्यात येणारा. आता हा गाव धारबांदोडा तालुक्यात येतो.

रगाडो नदीच्या काठावर वसलेला हिरवागार गाव. शेती, बागायती, कुळागरे, घनदाट जंगलानी वेढलेल्या या गावाला महाकाय जंगली वृक्षांचे अभेद्य सुरक्षा कवच लाभले होते. परंतु म्हणतात ना की सौंदर्याला दृष्ट लागते. सौंदर्याचा मनसोक्त आस्वाद न घेता त्याला ओरबाडून कसे टाकता येईल हाच विचार केला जातो. या गावाचेही असेच झाले. हा हा म्हणता खाणीच्या वेढ्यात घुसमटून गेला. आर्थिक सुबत्ता आणि नैसर्गिक धन या दोहोंचा विचार करता, लोकमनाला मोहाच्या क्षणी आर्थिक सुबत्ता जास्त भावली. निखळ, नितळ सौंदर्याचे लचके तोडण्यात आले. असे असले तरीही लोकमन आपली संस्कृती विसरू शकले नाही. निसर्गाच्या सहवासातील काव्य, संगीत इथल्या लोकांच्या अंतःकरणात पुरेपूर भिनलेले होते. याची प्रचिती कातयो सारख्या लोकनृत्यातील गीतांमधून जाणवल्याशिवाय राहात नाही. 

रगाडो नदीच्या काठांवर वसलेला हा गाव. हीच नदी गावाला चैतन्याची रसद पुरवणारी ठरली. धुळीचा थर आज येथील प्रत्येक झाडाच्या मुळापासून ते शेंड्यापर्यंतच्या भागावर चढलेला आहे. पानांचे मूळचे चैतन्य मलूल झालेले आहे. नदीची सळसळ थोडी मंदावली आहे. तिच्या उदरात खनिज माती साचलेली आहे. म्हणूनच तर तिचा नितळ प्रवाह हिरवट तांबूस होऊन प्रवाहित होत आहे. गाव बकाल झाल्याची, तो कोरडा भासत असल्याच्या अनेक खुणा इथे आढळतात. हे अशी काळाची पुटे चढलेली तरीही त्याचा तजेला राखून ठेवला आहे तो कातयो नृत्य आणि कातयो गीतांनी. कार्तिक मासातील कार्तिक पुनवेची रात्र, चांदण्यांचा सडा सर्वत्र पडलेला. वातावरणात गारवा, धुक्याची चादर आच्छादून घेत त्याच्या सोबतीने ते ही अंगणात उतरलेले.

अशावेळी शांत संयत होत, शब्दांची चमत्कृतीपूर्ण रचना करून सामूहिकतेने माधुर्याने भरलेल्या गीतावर आधारित रचना करून ती म्हटली जाते तेव्हा स्वर्गीय सुखाची प्राप्ती झाल्यासारखी वाटते.

देवळा फाटकडेर फुलयली वेणी गे

पायका जलम्या देवाक सायसोन्याची शेणी गे

देवळा फाटकडेर फुलयली वेणी गे

समिस्ती देवाक सायसोन्याची शेणी गे

देवळा फाटकडेर मणियांचे ताळू गे

कातया मायाक सायसोन्याचे ताळू गे

देवळा फाटकडेर मणियांचे ताळू गे

पायका जलम्या देवाक सायसोन्याची ताळू गे

देवळा फाटकडेर कळसाचे मूडे गे

कातया मायाक सायसोन्याचे चुडे गे

देवळा फाटकडेर कळसाचे मूडे गे

गारबाय केळबाय मायेक सायसोन्याचे चुडे गे

देवळा फाटकडेर सारइला चुना गे

गावकारा घरी घरभर सुना गे

देवळा फाटकडेर सारइला चुना गे

गावड्या घरी घरभर सुना गे

गावातील विविध माणसे, जाती-जमातींचा उल्लेख यात येतो. सभोवताली असलेल्या झाडा-पेडांचा उल्लेख आढळतो. या गीतातून एवढ्या साऱ्या माणसांचा गोतावळा उभा राहतो की ही सर्व माणसे, लोकदैवते, झाडाझुडुपांची नावे लक्षात तरी कशी ठेवत असावीत हा प्रश्न पडतो.

शेऊका बाये शेऊका काळे कामळीची शेऊका सकाळी उठले पालखेन बसले

उदळशा गावचे देवूका उदळशा गावचे देवूका 

महिला एकत्रित येऊन सामूहिक नृत्य-गायन करताना रात्र मंतरल्यागत होते. लोकदैवता प्रतीची अतीव श्रद्धा या गीतातून जाणवतेच, त्याशिवाय त्यातील संगीत मनाला भुरळ पाडते. गीतातून येणारे निसर्गाचे वर्णन, विविध भातांच्या प्रजातीची नावे, झरे, ओहोळ, नदी, या सर्वांचा उल्लेख असलेली गीते ही तर गावाची खास ओळख, त्याच्या एकेकाळच्या संचिताची!

आशे बाये आशे गे

समुलग्या भाताचे आशे

उदळशाकार काशे म्हणोन

आगळोतकारांक धाडा वाशे गे

आगळोतकारांक धाडा वाशे गे

आशे बाये आशे गे

समुलग्या भाताचे आशे गे

आगळोतकार काशे म्हणोन

पान्शीकारांक धाडा वाशे गे

पान्शीकारांक धाडा वाशे गे

आशे बाये आशे

समुलग्या भाताचे आशे

पान्शीकार काशे म्हणोन

साकोर्ड्याकारांक धाडा वाशे गे

साकोर्ड्याकारांक धाडा वाशे गे

कोणयो बाये कोणयो

समुलग्या भाताच्यो कोणयो 

उदळशाकारणी राणयो म्हणोन

आगळोतकारांक धाडा पाणया गे

आगळोतकारांक धाडा पाणया

कोणयो बाये कोणयो 

समुलग्या भाताचे कोणयो 

आगळोतकारणी राणयो म्हणोन

पान्शीकारांक धाडा पाणया गे

पान्शीकारांक धाडा पाणया गे

आपल्या गावाला सुख समृद्धी देणाऱ्या निराकार शक्तीवर त्यांचे मनस्वी प्रेम. त्याच्याविषयीची श्रद्धा आणि कृतज्ञता त्यांनी याच गीतातून गुंफली.

शिदी बाये शिदी तेलातुपाचो शिदी

उजवाड पडो देवा उदळशा गावचे पिंडी रे

उदळशा गावचे पिंडी रे

शिदी बाये शिदी तेलातुपाचो शिदी

उजवाड पडो देवा आगळोत गावचे पिंडी रे

आगळोत गावचे पिंडी रे

गोव्यातल्या आदिवासी जमातीला आजच्या लौकिक शिक्षण प्रणालीनुसार अडाणी, अप्रगत, अज्ञानी म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. खरंतर सभोवतालच्या परिसराने, तिथल्या निसर्ग आणि पर्यावरणाच्या घटकांनी, आकाशीच्या तारकामंडळाने, हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा या ऋतूचक्राने त्यांच्या जगण्याला जसा अर्थ दिला तसेच त्यांचे भावविश्व समृद्ध करण्यात महत्त्वाचे योगदान केले. त्यामुळे ऋतूचक्रातील निसर्ग आणि पर्यावरणात होणाऱ्या परिवर्तनाची त्यांनी दखल घेणारी लोकगीते रचली, त्यांच्या गायनात नृत्य आणि नाट्याचा आविष्कार घडवला. कातयो उत्सवासाठी जी लोकगीतं कष्टकरी स्त्रियांच्या ओठावरती स्फुरली, त्यांनी काव्यालंकाराचे विश्व विणले. काव्य रचनेत शब्दालंकार आणि अर्थालंकार महत्त्वाचे आहेत. लोकगीते श्रवणीय आणि रसपूर्ण करण्यात त्यांच्या रचनेनं मदत केलेली आहे. यमक, अनुप्रास, श्लेष हे शब्दालंकार तर उपमा, उत्प्रेक्षा आणि अपन्हुती हे अर्थालंकार यांनी काव्य रचनेला गेयतापूर्ण, शब्दमाधुर्य आणि रससमृद्ध होण्यास सहाय्य केलेले आहे. त्याचे सुरेख दर्शन या लोकगीतांचे कातयो उत्सवावेळी सादरीकरणातून प्रभावीपणे होत असते, त्याचा प्रत्यय पदोपदी येत असतो.


पौर्णिमा केरकर