अशीच एक गाठभेट

गाठीभेटीच्या निमित्ताने गेली कित्येक वर्षे न भेटलेले आपले क्लासमेट, मित्र-मैत्रिणी शिक्षक या मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आले. जुन्या आठवणींना उजाळा देत मित्रांचे रुसवे फुगवे काढण्याची संधी मिळाली.

Story: वेधक |
2 hours ago
अशीच एक गाठभेट

तिसवाडी तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या मार्फत आयोजित केलेल्या अखिल गोवा प्राथमिक शिक्षक संघ मेळावा म्हणजेच गाठभेट रविवारी दिनांक १२ मार्च २०२५ रोजी पणजी शहरात देवी महालक्ष्मीच्या सानिध्यात गोमंत मराठा समाज सभागृहात यशस्वीपणे पार पडली. संर्पूण दिवसाचा हा मेळावा असला तरी त्याची तयारी गेली १०-११ महिन्यापासून चालूच होती. घरात सोयरीक जुळली व सुपारी फुटली, की लगबग सुरू होते. तसेच काहीसे वातावरण तिसवाडी तालुक्यातील शिक्षकांमध्ये होते. ठरवलेल्या मुर्हुतापासून कार्यसंपन्न होईपर्यंत यजमानांची जशी घालमेल होते, तशीच घालमेल पणजीतील तालुका संघ समितीची होती. 

इतर ११ तालुक्यांचे मानपान, पैशांचा समास बांधणे, वाहतूक व्यवस्था, खानपान, तसेच संघ सदस्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेणे व ते अमलात आणणे यांचा शिस्तबद्ध व काटेकोर अभ्यास झाला होता, हे यशस्वीपणे संपन्न झालेल्या गाठभेट मेळाव्यातून दिसून आले. शिक्षकांच्या गाठभेट कार्यक्रमाचे आयोजन प्रत्येक वर्षी होत असते, ज्यात विविध शाळांच्या शिक्षकांना शिक्षणाची गुणवत्ता सुधारणे, नवीन शिक्षण पद्धतींचे आदान-प्रदान करणे, आणि शिक्षकांना त्यांच्या कार्यासाठी प्रोत्साहित करणे या प्रयोजनासाठी एकत्र आणले जाते. या कार्यक्रमात दरवर्षी काही खास बाबी समाविष्ट केल्या जातात आणि यावर्षी पर्यावरणपूरक सजावट त्यात एक महत्त्वाची बाब ठरली. माडाच्या झावळीपासून साजवट केलेल्या व्यासपीठाची कल्पना शिक्षिकांच्या कल्पनेतून साकार झाली. समितीकडून जमेल तेवढा प्लस्टिकचा वापर टाळावा ही जणू प्रतिज्ञाच घेतली होती, ज्यामुळे या कार्यक्रमाला एक वेगळे आकर्षण प्राप्त झाले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणसंबंधी सकारात्मक विचार करण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे, ज्यामुळे पर्यावरणाच्या रक्षणासाठी त्यांचे योगदान वाढेल. शिक्षणाच्या माध्यमातून, पर्यावरणासंबंधी जागरूकता निर्माण करण्याची ही एक उत्तम संधी ठरली. अशा प्रकारच्या गाठभेठ कार्यक्रमांमुळे शिक्षकांना त्यांचे काम अधिक अर्थपूर्ण आणि सृजनशील बनवता येते आणि समाजावर सकारात्मक प्रभाव पडतो. तसेच पारंपरिक दीप ‘माले’ हे सर्व निर्सगाशी आपण समतोल राखून आहोत हेच दाखवत होते. विविध तालुक्यातून आलेल्या प्रत्येक शिक्षकांना एक प्रेमाची भेट म्हणून दिलेली फुलेही,  शिक्षिका मिलन नाईक यांच्या देखरेखीत इतर शिक्षकांनी मन लावून केली होती.


कार्यक्रमाविषयी आठवायला गेलो तर जसे जसे कार्यक्रमाचे दिवस सरत होते तसे शिक्षकांच्या कल्पनांच्या लाटा उफाळत होत्या. एक ऊर्जा जणू शिक्षकांमध्ये संचारात होती. नवतरुण शिक्षक मंडळी आपापले नवनवीन विचार ज्येष्ठ शिक्षकांसमोर मांडत असत. ज्येष्ठ शिक्षक त्यांच्या अनुभवांची जोड या विचारांना देत, ज्यामुळे कार्यक्रमाच्या तयारीत भलतेच उधाण येत होते. वयोमर्यादा हा आकडा शिक्षकांनी कधीच मनात धरला नाही. आपण तिसवाडी तालुक्याचे शिक्षक व त्याचा अभिमान राखावा हेच एक ध्येय आहे, हीच गाठ मनात जणू शिक्षकांनी मारली होती. सांस्कृतिक कार्यक्रमात ज्येष्ठ शिक्षकांनी तर म्हातारपण ही व्याख्याच बदलून टाकली. वय फक्त शरीराने होते मनाने नाही, हे सिद्ध करून दाखविले. सरावासाठी शाळेचा नित्यनियम पाळून, ठरविलेल्या वेळेत म्हणजे शाळा सुटल्यानंतर शिक्षिका तालमीसाठी हजर असायच्या. सर्व जणी एवढ्या गुंग असायच्या, की आपल्याला शारीरिक दुखण्याचे, औषधांचे भानही नसायचे. सकाळी लवकर उठणे, कुटुंबाच्या जेवणाखाणाची तयारी करणे आणि मग लगबगीने शाळेत जाणे. शाळेत मुलांची शिकवणी केल्यानंतर जो शरीरात व मनात असलेला थकवा बाजूला सारून वेळोवेळी नृत्यात केलेले बदल या सर्वांवर मात करत, तालमीला  नवीन जोषात  सुरुवात करायचे.


 मेळाव्याच्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमाला व्यासपीठावर तरूण वयाच्या शिक्षिकांबरोबर काही पन्नाशी ते साठ पर्यंतच्या वयापर्यंत पोहोचलेल्या शिक्षकांनी केलेले उत्स्फूर्त नृत्य पाहून सार्‍यांनी तोंडात बोटे घातली. मेळाव्यात पर्यावरण समतोल राखण्याचा पुरेपूर प्रयत्न करताना प्लास्टिकचा वापर करून सुजलाम सुफलाम भारत देश कशा प्रकारे प्रदूषित होत आहे हे आपल्या नृत्यातून शिक्षकांनी सादर केले. तसेच दाक्षिणात्य संस्कृती व तेथील संगीत ऐकल्यावर आपले पाय थिरकायला लागतात याचा अनुभव त्यावेळी काही शिक्षकांनी दक्षिणी राज्यांचे नृत्य सादर करून सर्वांचे पाय थिरकायला लावले. नृत्याबरोबर गायन सादरीकरण व वेळेला शोभेल असे ‘ये शाम एक हसी के नाम’ गाणे शिक्षकांच्या विचार बुद्धीला दाद देण्यासारखेच होते. तसेच प्रत्येक उपस्थित असलेल्या तालुक्याच्या शिक्षकांसाठी काही ऑन द स्पॉट स्पर्धांचेही प्रयोजन झाले. त्याचप्रमाणे शिक्षक हा आता पुस्तक एके पुस्तक न राहता सर्वगुणसंपन्न झाल्यामुळे शाळेत वेगवेगळे सण, जयंती, पुण्यतिथी, शैक्षणिक सहलींच्या आयोजनाची प्रसिद्धी करण्यासाठी बातमी कशी लिहावी? याचे मार्गदर्शनही शिक्षकांना लाभले. पेडणेपासून काणकोण अशा अकराही तालुक्यांचा संगम तिसवाडीत श्री देवी महालक्ष्मीच्या चरणापाशी उत्तम प्रकारे झाला. 

सकाळच्या सत्रात सर्व तालुक्यातील शिक्षकांनी सभागृहात चहापान व नाश्ता करून दोनपावल जेटी गाठली. तेथील समुद्रकिनारा व राजभवन परिसर फिरून आल्यावर थकलेल्या शिक्षकांनी रूचकर अशा पारंपरिक जेवणावर ताव मारला. यावेळी असे दिसत होते जसे की देवी सरस्वती बरोबर देवी अन्नपूर्णा बसून जेवत होती.

  दुपारनंतर सुरू झालेली इतर सत्रे, ज्यात तालुका समितीचे अध्यक्ष, पदाधिकारी यांनी सर्वांना आपल्या भाषणाद्वारे मार्गदर्शन केले. शिक्षिका मिलन नाईक यांचा सरप्राईज सत्कार हा सर्वांना सुखद अनुभव देऊन गेला. संध्याकाळच्या चहापानाचा आस्वाद घेत सर्व शिक्षकांनी परतीची वाट धरली. त्यावेळी प्रत्येकाचा सुखद व समाधानक चेहरा पाहून, आपण गेले काही महिने करत असलेली दगदग, धावपळ आणि कौटुंबिक जीवनाशी केलेला समतोल याची जराही मनात खंत वाटत नव्हती. गाठीभेटीच्या निमित्ताने गेली कित्येक वर्षे न भेटलेले आपले क्लासमेट, मित्र-मैत्रिणी शिक्षक या मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आले. जुन्या आठवणींना उजाळा देत  मित्रांचे रुसवे फुगवे काढण्याची संधी मिळाली. 

कार्यक्रमाविषयी आपल्या मनातील प्रतिक्रिया, प्रतिक्रिया फळ्यावर लिहून शिक्षकांनी आमची जणू शाबासकीने पाठच थोपटल्याचे आम्हाला जाणवत राहिले. त्यांच्या शब्दांच्या प्रतिक्रियेतून लग्नसमारंभाच्या घरात दिलेला आहेरच असे जाणवत होते. शब्दांचा आहेर अजूनही व्हाॅट्सअप, एसएमएस, फोन कॉल, ऑडिओ एसएमएस, यातून चालूच आहे. यावरून यजमानपद भुषवलेल्या तिसवाडी शिक्षक संघाने आपले कर्तृत्व व जबाबदारी योग्यरितीने पार पाडली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आपण बांधलेल्या विचारांचा सेतू अखंडपणे सर्वांच्या मनात भक्कम व अतूट नाते घेऊन राहिल अशीच आशा. निरक्षरांचे

भवितव्य घडवण्यासाठी, स्वीकारलाय त्याने रंग काळा

अज्ञानाकडून ज्ञानाकडे प्रवास घडवतोय,निस्वार्थपणे... एक फळा


सुनैना कैलास नाईक