जनाला एकदम आठवलं. तिनं हातातला बटवा उघडला. त्यात असलेले पैसे पाहून तिचे क्षीण डोळे चमकले. पण दुसऱ्याच क्षणी हे पैसे आपले नाहीत. हे जर वापरले तर चोरीकेल्यासारखी होईल असा काहीसा विचार तिच्या मनात आला.
‘पत्रा, लोखंड, प्लास्टिक, चप्पल, बाटल्या...’ आरोळी देत ती परतत होती. झोपडीतपरतल्यावर कोपऱ्यातल्या माठातलं गार पाणी गटागटा प्याली तेव्हा तिला कुठं हायसं वाटलं. “आज्जे..! आज जत्रा हाय न्हवं गावात?” लहानगा गणपा जनाच्या पुढ्यात डोकं खाजवीत उभा होता. “व्हय रं बाबा! माहीत हाय मला...” जना दगडाखाली जाळ करीत म्हणाली.
तिला आठवला तो दिवस... त्या दिवशी ती कामासाठी अशीच बाहेर पडली होती. गणपानं पण तिच्याबरोबर येण्याचा हट्ट धरला होता. म्हणून त्याला घेऊन ती गावाकडं निघाली होती. गावात पोहचल्यावर रोजच्याप्रमाणं “बाटल्या, प्लास्टिक, जुनी चप्पल...” असं ओरडत ती पुढे चालली होती. अचानक तो एके ठिकाणी थबकला. कुत्र्याच्या पुढ्यात ठेवलेल्या प्लेटकडे टक लावून गणपा ओठावरून जीभ फिरवत होता. सकाळपास्न त्याच्या पोटात अन्नाचा कणसुद्धा गेला नव्हता. तो हळूहळू पुढे सरकत प्लेटकडे आला.
“काय रे..! चोरी करायला आलास? भिक्कारडं पोर!” त्यानं माग वळून पाहिलं. कुत्र्याची मालकीण त्याच्याकडे डोळे वटारून बघत होती. कुत्रं जोरात भुंकत होतं. “माय कालधरनं पोटात कायसुदिक नाय. एक जिल्बी द्या की!” गणपा सांगत होता. “काय रं?” आपल्याच नादात बोलत पुढे गेलेली जना मागं आली. ती बाई अजूनही भांडत होती. त्या बाईची माफी मागत गणपाच्या एक थोबाडीत मारत त्याला घराकडे आणलं.
गणपा परत परत सांगत होता... “म्या चोर न्हाय आज्जे..! फकस्त जिल्बी बघीत हुतो. मला लई आवडतीया.” “पोराss मी आणीन तुला जिल्बी. पण पुन्यांदा आसं करनार न्हाई. वचन दे या म्हातारीला!” आठवणींच्या वादळातनं बाहेर येईस्तोवर संध्याकाळ होत आली होती. एक फुटका रुपयासुद्धा नव्हता काय घ्यायला. तरीही ती आपलं फाटकं लुगडं सारखं करीत केसावरनं फणी फिरवून जत्रेला जायला निघाली होती. गणपाही आहे त्यात बरा शर्ट घालून तिच्याबरोबर बाहेर पडला होता.
“आज्जे तू जिल्बी म्हाग हाय, म्हाग हाय म्हणतीयास. पण कुत्रं सुदिक जिल्बी खातया. मग मला...” गणपा निरागसपणे विचारीत होता. जत्रेची पायवाट चालताना सारं काही आठवत चाललं होतं. लहानगा गणपा मात्र आपल्याला जिल्बी मिळणार या विचारताच उड्या मारत चालला होता. इतक्यात त्याला रस्त्यात काहीतरी पडलेलं दिसलं. त्यानं ते झटकन उचललं.
“आज्जे, हे बघ काय सापडलं!” तो हातातली वस्तू जनाच्या पुढ्यात नाचवत म्हणाला. ते कोणाचं तरी पैशाचं पाकीट होतं. जनाने चेन उघडली. पहाते तो आतमध्ये कितीतरी पैशांची चिल्लर, दहाची एक नोट, शंभराच्या दोन कोऱ्या करकरीत नोटा होत्या आणि पाचशेच्या चार नोटा होत्या. बारीकसारीक कागदाचे चिटोरेही होते. जनानं ते उलटसुलट करून बघितलं. तिला वाचता येत नसल्यामुळं त्यावर काय आहे कळलं नाही. त्या नादातच ती पाकीट हातात घेऊन जत्रेत पोहचली.
बायका, पुरुष, मुलंबाळं चांगले नवे कपडे घालून जत्रेत फिरत होते. खेळण्याच्या दुकानाजवळही गर्दी होती. रस्त्यावर दुतर्फा निरनिराळ्या वस्तूंची दुकानं थाटलेली होती. महादेवाच्या दर्शनाला तर रांगाच रांगा लागल्या होत्या. गणपाची नजर सैरभैर होत होती. इतक्यात त्याला हवं असलेलं मोक्याचं ठिकाण दिसलं तो डोकं खाजवीत म्हणाला, “आज्जे! ते बघ.” जनाचं लक्ष गणपानं बोट केलेल्या ठिकाणी गेलं. परातीत गरमागरम पिवळ्या जिलब्या भरलेल्या होत्या. आपल्याकडे असलेल्या साच्यातून जिल्बीवाला जिलब्या तळत होता. त्याचा खमंग वास नाकात भरत होता.
जनाला एकदम आठवलं. तिनं हातातला बटवा उघडला. त्यात असलेले पैसे पाहून तिचे क्षीण डोळे चमकले. पण दुसऱ्याच क्षणी हे पैसे आपले नाहीत. हे जर वापरले तर चोरी केल्यासारखी होईल असा काहीसा विचार तिच्या मनात आला. पण गणपाच्या दीनवाण्या चेहऱ्याकडं पाहिल्यावर तिनं तो जळमटासारखा झटकून टाकला.
“कशी देणार जिल्बी?” जनानं हिम्मत करून विचारलं. तिच्या गबाळ्या अवताराकडं दुकानदारानं एकदा मान वर करून पाहिलं. “दहा रुपयाला दोन.” जिलब्या तळतच त्यानं सांगितलं. इतर लोकं मात्र पाव किलोच्या पुड्या बांधून घेत होते. जना विचारात पडली. ‘एक जिल्बी घेतली का बास झाली. पोरगं कवाधरनं मागतया. एक तरी जिल्बी घेऊन द्यायाचीच.” पाकिटातील चिल्लर काढून त्यातले फक्त पाच रुपये मुठीत धरले.
तिचे हातपाय थंड पडत चालले होते. संध्याकाळची वेळ असूनही तिला दरदरून घाम फुटला होता. ‘कंदी आपण दुसऱ्याचा पैकासुदिक घेतला न्हाई. कधीमधी चारचार दिस उपाशीपोटी बी राहिलो. नि आता? देवा! माजं चुकलं बाबा, पुन्यांदा असं करायची न्हाय बघ मी” जना एकटीच बरळत होती.
गणपा अजुनि जिल्बीच्या दुकानाकडं एकटक बघत होता. जनानं ते पैसे परत आत ठेवले. इतक्यात एक पोलीस तिच्या दिशेनं येताना दिसला. काहीतरी शोधत येत होता. त्यानं तिच्या पुढ्यातनं फेऱ्या मारल्या. इतक्यात जना त्याच्या दिशेनं धावली. “साहेब, पाकीट गावलतं. कोणाचं हाय, बगा जरा.” जना पाकीट पुढं करत म्हणाली. “आरं! हे माझं पाकीट! पोराची फी भरायची होती.” असं म्हणत त्यानं चेन उघडून पैसे बरोबर आहेत की नाही ते पाहिलं. आतले पैसे बरोबर आहेत हे पाहून तो सुखावला. “तुमचे आभार कसे मानावे हेच कळत नाही बघा.” “मी काय बी मोठं केलं नाही बग.” जना म्हणाली.
तिच्याकडं बघून त्याला दया आली. पाकिटातून दहाची नोट काढून तिच्यापुढं धरली. “बक्षीस तुला...”
“नगं.” जना पटकन म्हणाली. तिनं एकवार गणपाकडं बघितलं. अजूनही तो जिल्बीच्या दुकानाकडं उभा होता. “लेकराकडनं पैसे घेत नाहीस व्हय गं?” तो पोलीस परत म्हणाला. “आज्जे ss मला जिल्बी!” गणपा तिच्या पुढ्यात उभं राहून डोकं खाजवीत म्हणाला.
“त्या पोरासाठी तरी...” पोलीस पुन्हा म्हणाला.
“बरं.” गणपाच्या आसुसलेल्या चेहऱ्याकडं पाहत जना म्हणाली.
दहाची नोट काढीत तिच्यापुढं धरली. तिने तसेच त्याच्यापुढं भरल्या मनानं हात जोडले. जिल्बीच्या दुकानाकडं येऊन जिल्बीवाल्याकडनं जिल्बी घेऊन गणपाला दिली. गणपा खुशीत येऊन जिल्बी खाऊ लागला. त्याच्या आनंदी चेहऱ्याकडं पाहून जनाचे डोळे क्षणभर चमकले. नंतर मात्र ओझ्याखाली असल्यागत संथपणे पावलं टाकीत ती झोपडीच्या दिशेनं वळली.
गौरी भालचंद्र