वृत्तनिवेदकाच्या पदासाठी जी चाचणी असते त्याकरता उमेदवारांना तीन स्तरीय परीक्षांना तोंड द्यावं लागतं. नियमित वाचन, बातम्या वाचणं, बातम्या ऐकणं व या संदर्भात अद्ययावत राहणं फार महत्त्वाचं असतं.
रेडिओवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना अद्ययावत सामान्य ज्ञान असणं जरूरीचं. सभोवती काय घडतं याचं भान हवं. कुणी मोठा राष्ट्रीय स्तराचा नेता आजारी असला व अतिदक्षता विभागात असला तर तिथंही लक्ष हवं. कारण त्याचं निधन झालं तर दिल्ली मुख्यालयातून अमूक दिवस शोक वा दुखवटा पाळण्याविषयी संदेश येतो. या काळात मनोरंजनात्मक कार्यक्रम प्रसारित केले जात नाहीत. न्यूज कार्यक्रमाआधी जे द्रूत संगीत वाजवले जाते ते वाजवत नाही. म्हणून सजग असावं लागतं.
त्याचप्रमाणे त्या नेत्याविषयी खास कार्यक्रम प्रसारित करावे लागतात. अशा वेळी हे सामान्य ज्ञान कामी येते. कारण चर्चात्मक कार्यक्रम करताना अॅन्करिंग करताना ती माहिती संवादकाला ताबडतोब द्यावी लागते. अथवा जर त्याच्यावर रूपक (फिचर) केलं तर त्यातही त्या नेत्याच्या कार्याविषयी व जीवनपटाविषयी थोडक्यात अचूक माहिती द्यावी लागते.
वृत्तनिवेदकाच्या पदासाठी जी चाचणी असते त्याकरता उमेदवारांना तीन स्तरीय परीक्षांना तोंड द्यावं लागतं. प्रथम स्तरावर लेखी परीक्षा असते. त्यात पन्नास गुण सामान्य ज्ञान व पन्नास गुण अनुवाद क्षमता यासाठी असतात. हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न सद्याच्या घटनांवर तसेच बातम्यांसंदर्भातील संबंधित प्रश्नांवर आधारलेले असतात. नियमित वाचन, बातम्या वाचणं, बातम्या ऐकणं व या संदर्भात अद्ययावत राहणं फार महत्त्वाचं असतं. NCERT, CRR, TDS, RBI वगैरे संक्षिप्त रूपांचा अर्थ उलगडून सांगा अशा स्वरुपाचे प्रश्न असतात. एक थोडीशी झलक पाहूया. गोवा विधानसभेत मगो पक्षाचे किती आमदार आहेत?, राज्यसभेत गोव्याचे खासदार प्रतिनिधित्व करतात त्यांचे नांव सांगा, माशेलातील हा उत्सव पर्यटन खात्याने पर्यटनाच्या दृष्टीने प्रकाशात आणण्यास सुरूवात केली आहे, या दोन कोंकणी साहित्यिकांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कार्यक्रम झाले… साहित्यिक कोण?, गोव्यातील बुद्धिबळ वूमन ग्रॅण्डमास्टर कोण?, गोव्याचे कला संस्कृती मंत्री कोण?, विषयनिष्ठ प्रश्नात निबंध विचारतात प्रामुख्याने त्यात ज्वलंत प्रश्नांवरील विषय असतात. अनुवादासाठी इंग्रजी व हिंदी उतारे देतात. ही बातम्यांतील शब्दावली सोपी नसते तशीच कठीण नसतेच. सराव असेल तर धडाधड करणं शक्य असतं. आकाशवाणीची वेबसाईट आहे. newsonair.nic.in याच्यावर जाऊन राष्ट्रीय व इतर बातम्यांचा अनुवाद करण्याचा सराव जर चालू ठेवला तर हा अनुवाद कठीण वाटत नाही.
बातम्यांची म्हणजे पत्रकारिता पारिभाषिक शब्दावली अजून कोंकणीत तयार झाली नाही. त्यावर मी काम करत आहे. बातम्यांचे काही शब्द असतात ते सामान्य शब्दकोशात मिळत नाहीत. म्हणून जितकी तयारी अधिक तितकं परीक्षेला तोंड देणं सोपं जातं. या लेखी परीक्षेला जे किमान ५० टक्के गुण मिळवतात त्यांनाच आवाजाच्या चाचणीसाठी बोलावलं जातं. ऑडिशनआधी एक बातमीपत्र दिलं जातं. आपण कधी औपचारिक वाचन केलेलं नसेल, तर हे वृत्तनिवेदन सोपं जात नाही. काही उमेदवार नाटकात अभिनय करणारे असतात. त्यांच्या वृत्तनिवेदनात कृत्रिमता, अती हेल, नाट्यमयता येते. त्याची गरज बातम्यांच्या वाचनात नसते. काही उमेदवार हे सूत्रसंचालन, निवेदन वगैरे करत असतात. त्यांनीही बातम्यांचा टोन, गती समजून घेऊन त्याप्रमाणे त्या सादर कराव्या लागतात. वाक्यांश कसे विभागणे व कुठं अल्प सेकंद विराम घ्यावा, कुठं मोड्युलेशन घ्यावं हे माहीत असावं लागतं. न अडखळता, स्पष्टोच्चारांसहीत बातम्या सांगाव्या लागतात. उमेदवारांना परीक्षक दिसत नाही. पडदा असतो. वृत्तनिवेदक एकटाच स्टुडिओ कक्षात असतो. काही उमेदवार विनाकारण नर्व्हस होऊन गडबडतात. कौशल्य असूनही ताण असल्यास तो आवाजातून दिसून येतो. या ऑडिशन चाचणीत ५० गुण मिळवणाऱ्यांना अंतिम मुलाखतीसाठी बोलावले जाते.
मुलाखतीत तीन चार सदस्य प्रश्न विचारतात. आपले छंद, कुठं राहता, बातम्यांची आवड का व बातम्यांसंदर्भात प्रश्न विचारतात. या मुलाखतीच्या चाळणीतून ५० टक्के गुण मिळवलेले वृत्तनिवेदक नंतर पॅनलवर नैमित्तिक न्यूज रीडर म्हणून नियुक्त केले जातात. त्यांना परत प्रशिक्षण असतंच.
सारांश - सामान्य ज्ञान कायम अद्ययावत ठेवावं.
मुकेश थळी
(लेखक साहित्य अकादेमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक, अनुवादक,
कोशकार असून आकाशवाणीचे निवृत्त वृत्तनिवेदक आहेत)