नाहक पर्यटकांवर होणारे हल्ले आणि लुबाडण्याच्या प्रकारांना आळा घालून पर्यटन क्षेत्राच्या वृध्दीसाठी सुरक्षित पर्यटन धोरणाची गरज आहे.
पर्यटन हा गोव्याचा उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत. १९८३ साली चोघम बैठक झाली आणि गोव्यातील पर्यटनाला खऱ्या अर्थाने व्यावसायिक महत्त्व मिळाले. समुद्रकिनारी शॅक, रेस्टॉरन्ट, हॉटेल उभी राहिली. भरारी घेणार्या पर्यटनात राज्य सरकारने पर्यटन खात्याच्या मार्फत रेसिडेन्सीसारखी हॉटेल्स उभी करून आदरातिथ्य व्यवसायात उडी घेतली. हल्लीच्या काळात समुद्रकिनारी पर्यटकांना मारझोड करण्याच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे. यापूर्वी हे प्रकार घडत असतील. मात्र एन्ड्रॉईड मोबाईल फोनच्या जमान्यामुळे हा प्रकार जगासमोर येत आहे. या घटनांमुळे गोव्याची बदनामी होत असून त्याचा पर्यटन व्यवसायावर देखील परिणाम जाणवत आहे. राज्याचा आर्थिक कणा असलेले पर्यटन क्षेत्राला मारक ठरणार्या अशा घटनांना तसेच पर्यटकांना नाहक त्रास करणाऱ्या प्रकारांना प्रतिबंध आणण्यासाठी आवश्यक तसेच कडक पावले उचलण्याची गरज आहे.
कळंगुटमध्ये शॅकवाल्यांच्या मारहाणीत तेलंगणातील बोल्ला रवी तेजा या पर्यटक युवकाचा खून झाला. त्यानंतर पुन्हा ठाणे मुंबईतील पर्यटकांना शॅकवाल्यांकडूनच मारझोड करण्यात आली. नवीन वर्ष साजरे करण्यासाठी दाखल झालेल्या पर्यटकांना डिसेंबरच्या शेवटी व जानेवारीच्या सुरूवातीच्या आठवड्यात सिकेरी कांदोळी ते कळंगुट बागा व आश्वे पेडणे या उत्तर गोव्यातील समुद्रकिनारी शॅकमध्ये मारहाणीचे अनेक प्रकार घडले. त्यामुळे पोलिसांना या पट्ट्यातील ही आस्थापनांवर प्रतिबंध घालण्यात आले.
गेल्या काही वर्षांपासून किनारी भागातील मसाज पार्लर, शॅक, रेस्टॉरन्ट, क्लब व्यावसायिकांसह, बस व पर्यटक टॅक्सीवाल्यांकडून पर्यटकांना मारहाण, लुबाडणूकीचे प्रकार गोव्यातील किनारी भागात घडत आहेत.
शिवाय राज्यात रेन्ट अ कॅब व रेन्ट बाईक व्यवसायिकांचा सुळसुळाट सुरू आहे. ही भाड्याची वाहने चालवताना पर्यटकांना वाहन वाहतूक नियमांचे भान राहत नाही. तसेच ही वाहने भाड्याने देणार्या व्यवसायिकांना देखील ट्रॅफिक नियमांचे पडून गेलेले नाही. यामुळे हे पर्यटक वाहतूक पोलिसांच्या तावडीत सापडतात. साहजिकच जीवाचा गोवा करण्यासाठी आलेल्या पर्यटकांना गोवा पोलीस त्रास देतात, असे वाटू लागते.
किनारी भागात चोरट्यांचा देखील सुळसुळाट असतो. दुचाकीवरून किंवा रस्त्याच्या कडेला चालणार्या पर्यटकांच्या हातून वस्तू हिसकावून नेणे, एखादे हॉटेल किंवा क्लबचा रस्ता दाखवण्याच्या बहाण्याने निर्जनस्थळी नेऊन पर्यटकांना लुबाडणे, अशा घटनांमुळे गोव्याची प्रतिमा पर्यटनात खालावली जात आहे.
गोव्यात पर्यटनासाठी येणार्या पर्यटकांना आदरातिथ्य देणे हे सरकार आणि सरकारी यंत्रणांबरोबरच व्यावसायिक आणि राज्यातील लोकांची जबाबदारी आहे. तरीही सुशेगात आणि संयमी म्हणून नावलौकिक मिळालेल्या गोव्यात तेही राज्याची चंदेरी दुनिया असलेल्या किनारी भागात उठसूट पर्यटकांवर खूनी हल्ल्यांचे प्रकार सुरूच आहेत.
कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही पोलिसांवर असते. पर्यटकांवर होणारे हल्ले आणि त्यांची होणारी मानसिक तसेच आर्थिक छळणूक थांबवणे या यंत्रणेला शक्य झालेले नाही. यामुळे नाहक पर्यटकांवर होणारे हल्ले आणि लुबाडण्याच्या प्रकारांना आळा घालून पर्यटन क्षेत्राच्या वृध्दीसाठी सुरक्षित पर्यटन धोरणाची गरज आहे.
उमेश झर्मेकर
(लेखक गोवन वार्ताचे उत्तर गोवा
ब्युरो चीफ आहेत.)