वेडं पिल्लू शहाणं झालं!

Story: छान छान गोष्ट |
25 mins ago
वेडं पिल्लू शहाणं झालं!

ओतरण गावात सूर्यगंगा नदी वहायची. या नदीच्या अल्याड ऊसाच्या शेतीच्याजवळच कमळा आजीचं झोपडीवजा घर होतं. आजीनं ऐंशी वर्ष पार केली होती तरी होती कशी काटक. कष्टाची हाडं ती. आजीला मूलबाळ नव्हतं. ती बिचारी एकटीच रहायची. मग सोबतीला म्हणून कोंबड्या पाळायची. 

मधे एक जीवघेणा रोग आला न आजीच्या कोंबड्या पटापटा मेल्या. त्यांना मातीत पुरताना आजीच्या जीवावर यायचं. मग काही काळ तिने कोंबड्या बाळगायचा नाद सोडून दिला. 

झालं काय, एका भल्या सकाळी कमळा आजीची मैत्रीण द्रुपदी कमळा आजीजवळ आली व म्हणाली, “कमळे, लेकीकडे जातेय गं महिनाभर रहायला, तेव्हा ही माझी एक कोंबडी मी येईस्तोवर सांभाळशील नं?”

कमळा आजीने मैत्रिणीला चहापाणी दिलं व तिची कोंबडी मागल्या पडवीतल्या डालग्यात झाकून ठेवली. कोंबडी रोज अंडी घाली. ती अंडी कमळा आजीने नीट तांदळाच्या मडकीत रचून ठेवली व काही दिवसांनी कोंबडीला रोवणीवर बसवली.

कमळा आजीच्या मैत्रिणीचं, द्रुपदीचं येणं लेकीच्या आग्रहामुळे अधिकच लांबलं. आता कमळा आजीलाही कोंबडीचा लळा लागला होता. ती कोंबडीला धान्याची कणी घालायची, पसरट वाडगं पाण्याने भरून ठेवायची. दुपारची कोंबडीशी बोलत बसायची.

कमळा आजी कोंबडीशी बोलायची. “तुझी मालकीण तुझी जबाबदारी माझ्यावर सोडून गेलेय खरी, पण मलाही तुझी सोबत मिळाली हो. तुला मी खाऊपिऊ घालते, तेवढंच माझ्या जीवास समाधान मिळतं.”

एके दिवशी अंड्यातनं रेशमाच्या गोळ्यांसारखी मऊमऊ पिल्लं बाहेर आली. आजीला कोण आनंद झाला. आजी कोंबडीला म्हणाली, “बाई गं, आता तुझी जबाबदारी अजून वाढली. ऊसाच्या शेतातनं कधी कोल्हा येईल तर कधी रानमांजर येईल, तुझ्या पिल्लांना खाऊ पाहील, आकाशातनं घार घिरट्या घालील. पिल्लांना जप गो बाई. मी ही अशी म्हातारी, मी कुठवर पुरे पडणार!”

कोंबडी आता पिलांना सोडून घराभोवती फिरायची. नख्यांनी माती उचकटून किडे आणून पिलांना भरवायची.  हळूहळू आजीने पिलांना त्यांच्या आईसोबत परसवात सोडायला सुरूवात केली. पिल्लं आईच्या मागोमाग फिरायची. आई नख्यांनी माती विसकून, खाणे कसे शोधते ते पहायची.

कमळा आजी सोप्यावर धान्य पाखडायला, तर कधी दळण दळायला म्हणून बसली की ‘यो यो’ आवाज काढत पिलांना हाकारायची व त्यांना बारीक कणी खाऊ घालायची. 

कोंबडीच्या पाच पिलांतलं एक पिल्लू जरा जास्तच धीट होतं. आईमागं फिरायचं सोडून भलतीकडेच पळायचं. 

एकदा एक मोठ्ठी घार आकाशातनं वेगानं खाली आली. कोंबडी कल कल कल कल करू लागली तशी आजी वेगाने आली, एकटंच फिरणारं ते पिल्लू घारीला आयती मेजवानी मिळणार होतं पण आजीनं वेळेवर येऊन घारीला हाकवून लावलं. पिल्लू मात्र जाम घाबरलं.

रात्री कोंबडीआईने वेड्या पिल्लाला खूप ओरडा दिला. “तू उद्यापासनं डालग्याच्या बाहेर यायचं नाहीस. तू नियमांच पालन करत नाहीस. तुझी भावंड कशी माझ्या मागं मागं असतात. तूच एकटाएकटा आपल्याच नादात दूर दूर जातोस. आज त्या घारीने तुला उचललं असतं म्हणजे!” असं म्हणताना कोंबडीआईचे डोळे ओलावले. पिलाने आईस सांगितलं, “आई, उद्यापासनं नाही मी एकटं एकटं भटकत दूर जाणार.”

चारपाच दिवस नीट गेले. पुन्हा वेड्या पिल्लाचे पहिले पाढे पंचावन्न सुरू झाले. दुपारी असंच भटकता भटकता वेडं पिल्लू करवंदीच्या जाळीत गेलं. तिथे एक साप वेटोळं घालून गारव्याला बसला होता. त्याने नुकत्याच दोन बेडक्या खाल्ल्या होत्या पण काही अंतरावर दाणे टिपणारं ते इवलुसं पिल्लू पाहून सापाच्या तोंडाला पाणी सुटलं. तो पिल्लाला मटकावणार इतक्यात आजीकडे दूध द्यायला येणारा गवळी सायकलीची घंटी ट्रींग ट्रींग वाजवत आला. त्याची चाहूल लागताच साप आपल्या बिळात पसार झाला.

पिल्लू मात्र त्या झाडकळीतून जीव घेऊन पळालं नि आईच्या पंखाखाली येऊन दडलं. आईने त्याला पंखानेच फटकारलं.

तेव्हापासनं ते वेडं पिल्लू आपल्या आईला व भावंडांना धरूनच राहू लागलं.

आजी मग त्या पिल्लाकडे कौतुकाने बघे व म्हणे, “माझं वेडं पिल्लू बघा कसं शहाणं झालं.”


गीता गरुड