आम्ही मात्र बातम्या सुरू होण्याआधी आजूबाजूला पाहू लागलो. सवयच झाली ती. आपला जीव सांभाळायची.
पहाटेच्या ड्युटीला सहाच्या अगोदर पोहचणं गरजेचं असतं. मी खोर्लीहून निघायचो. स्कूटरने तशी समस्या नव्हती. पावसात जरा त्रास व्हायचा. कधीकधी पाऊस खूपच जोराचा, सोसाट्याचा, वादळी असायचा. रेनकोट घालून न घातल्यात जमा इतके भिजायला व्हायचे. मी वाटेत थांबत असे आणि पाऊस कमी झाल्यावर परत स्कूटर सुरू. पण अंग ओलेचिंब झाल्यावर शक्य होईल तेवढं पुसणं तेही लगोलग व नंतर लगेच बातम्या लिहायला सुरूवात करणं इकडेच लक्ष असायचं.
कँटीन चालवणारा जरा उशिराच यायचा. घसा कोरडा झालेला असायचा तेव्हा चहाचे दोन घुटके आवश्यक वाटायचे. तरीही वृत्त विभाग प्रमुख व सकाळच्या शिफ्टचे संपादक दिलीप देशपांडे हे घरून चहाने भरलेला एक मोठ्ठा थर्मास आणत. सौ. कल्पनाताई हा थर्मास भरून पाठवत. साखर वेगळी पाठवत. माझ्या टिफिनमध्ये पाव अथवा चपाती वगैरे असत. वेळ नसायचाच. शेवटचं बुलेटीन वाचन ८:४० ला असायचं. त्या वेळी सव्वाआठला थोडी उसंत मिळे. तेव्हा मी शांतपणे पाव व चहा घेत असे. देशपांडे सर थर्मास ठेवूनच जायचे. त्यात अक्षय पात्रासारखा, चहा संपून संपेना असा असे.
अधेमधे थर्मास आणला नाही तर देशपांडे सर साडेसातचे बुलेटिन झाल्यावर खाली कॅफे भोसलेत चहा घ्यायला जाऊया म्हणत. ते गुलाबी बिनसाखर चहा मागवत. मी चहा व चपाती. कधी कधी मिक्स भाजी पण मी खात असे. नंतर त्यांच्या गाडीने मला वर आल्तिनो आकाशवाणीवर सोडून ते घरी जात.
एकदा सकाळच्या शिफ्टला सीताराम नायक उर्फ बाबू हे नैमित्तिक न्यूज रीडर ड्युटीला होते. मी संध्याकाळला होतो. नेहमीप्रमाणे साडेसात झाल्यानंतर देशपांडेंनी बाबूला ऑर्डर दिली. चल आज खाली चहाला जाताना तुझ्या स्कूटरने जाऊ. दोघे खाली आले. चहा झाला. परत वर जाताना आल्तिनोची चढण स्कूटरने काढताना वर एक मोठ्ठं झाड कर्र कर्र करून रस्त्यावर आडवं पडताना त्यांनी डोळ्यांनी पाहिलं. आवाज प्रचंड होता. अवघ्या मिटर्सवर ही घटना घडली होती. दोघेही पुरे घाबरले होते. नको तो चहा आणि नकोच ते काही असं झालं होतं. नुकतंच झाड पडलं होतं. सीताराम बाबूला बुलेटिन वाचायचं होतं. जे तयार टेबलवर त्यांनी लिहून ठेवलं होतं. ५० मिनिटं बाकी होती. तरीही दोघांना या आकस्मिक घटनेने घाम आला होता. दैव बलवत्तर म्हणून केसाला धक्का लागला नाही. त्यावेळी तिथं रहदारी सुरू होते. पण काहीही गैर घडलं नव्हतं. स्कूटर पुढं काढणं शक्य नव्हतं. ती तिथंच पार्क केली. कसाबसा त्यांनी आपला जीव मुठीत धरून ते पडलेल्या झाडाचं धूड त्यांनी ओलांडलं. ५०० मीटर अंतरावर आकाशवाणीची गेट होती. तिथे पोहोचले. बुलेटिन झालं. सर्व काही सुरळीत झालं. पण नंतर मात्र आम्ही कायम सजग सचेत राहिलो, खाली चहा प्यायला जाताना. उगाच ही भयानक आठवण येऊन काळजी वाटायची.
एकदा आमचा एक वृत्तनिवेदक बातम्या वाचायला गेला. स्टुडिओत गेला. संध्याकाळी ७.२० वाजता बातम्या तो नेहमीप्रमाणे वाचू लागला. इतक्यात त्यानं खाली एक साप बघितला. तसा तो स्थिर होता म्हणजे जास्त हालचाल करत नव्हता. माझा मित्र हे प्रकरण पाहून घाबरला. कुणाचीही बोबडी वळेलच. लायव्ह प्रसारण चालू होतं. त्याला ते सोडून बाहेर येणं शक्य नव्हतं. सगळं लक्ष सापावर व थोडंसं कागदांवर ठेवून त्यानं बातम्या वाचल्या. दहा मिनिटं एका विचित्र घाबऱ्याघुबऱ्या अवस्थेत तो होता. बातम्या संपल्या. तो कसाबसा कागदं घेऊन स्टुडिओच्या त्या जाडजूड दरवाज्यातून बाहेर निसटला. तो साप तिथं कसा पोहोचला हे एक प्रकारचं गूढच ठरलं. कारण स्टुडिओला एकच दरवाजा होता. पण आम्ही मात्र बातम्या सुरू होण्याआधी आजूबाजूला पाहू लागलो. सवयच झाली ती. आपला जीव सांभाळायची.
(लेखक साहित्य अकादेमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक, अनुवादक, कोशकार असून आकाशवाणीचे निवृत्त वृत्तनिवेदक आहेत)
मुकेश थळी