संशयिताचे बँक खाते गोठवले; पाच दिवस कोठडी
मडगाव : फातोर्डा येथील महिलेला वॉटस्अॅप कॉल करत पोलीस असल्याचे सांगत मनी लाँड्रिंग प्रकरणात आपला सहभाग असून यातून सुटकेसाठी २.२० लाख रुपये घेण्यात आले होते. याप्रकरणी फातोर्डा पोलिसांनी अमित वाघेला व फैझल शेख या दोघा संशयितांना अटक केली. दोन्ही संशयितांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच तपासादरम्यान बँक खातेही गोठवण्यात आले आहे.
फातोर्डा पोलिसांनी सायबर क्राईमप्रकरणी दोघा संशयितांना मुंबईतून अटक केली आहे. डिसेंबर २०२४ मध्ये फातोर्डा डोंगरवाडा येथील वैशाली भोसले या महिलेला वॉटस्अॅपवर कॉल करत संशयित अमित वाघेला याने आपण पोलीस बोलत असल्याचे सांगितले. तसेच मनी लाँड्रिंग प्रकरणात आपले नाव गुंतलेले असून या प्रकरणातून आपली सुटका व्हावी असे वाटत असल्यास पैसे पाठवण्यात सांगितले. घाबरलेल्या महिलेकडून मुंबई येथील फेडरल बँकेच्या खात्यात २ लाख २० हजार ९६८ एवढे रुपये ट्रान्स्फर करण्यात आले होते. फेडरल बँकेत पैसे जमा झाल्यानंतर ते पैसे फैझल अस्लम शेख या नावाच्या खात्यात जमा झाल्याचे समजले. त्यावेळी सदर महिलेला आर्थिक फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ फातोर्डा पोलिसांत या सायबर क्राईमबाबत तक्रार नोंद केली. दोन्ही संशयित हे मुंबईत असल्याची माहिती मिळताच फातोर्डा पोलिसांच्या पथकाने मुंबईत जात संशयितांना ताब्यात घेत अटक केली. संशयितांकडून लुबाडणुकीसाठी वापरण्यात आलेले बँक खातेही पोलिसांकडून गोठवण्यात आले. दोन्ही संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
फातोर्डा पोलिसांची मुंबईत जात कारवाई
फातोर्डा पोलिसांनी संशयितांचा फोन क्रमांक व बँकेच्या माहितीनुसार तपास करण्यास सुरुवात केली. त्यावेळी दोन्ही संशयित हे मुंबईत असल्याची माहिती मिळताच फातोर्डा पोलिसांच्या पथकाने मुंबईत जात दोन्ही संशयितांना ताब्यात घेत अटक केली.