पर्ये भागातील तणाव निवळला

पोलिसांचा दावा : दगडफेक, हिंसेमुळे ७७ जणांवर गुन्हे दाखल

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
10 hours ago
पर्ये भागातील तणाव निवळला

वाळपई : पर्ये येथील पारंपरिक कालोत्सव साजरा करण्यावरून गावकर, राणे व माजीक या तिन्ही महाजन गटांत निर्माण झालेला गोंधळ सध्यातरी शमलेला आहे. पारंपरिक कालोत्सवानंतर दुसऱ्या दिवशी गवळण काला साजरा करण्यात आल्यानंतर सदर भागामध्ये वातावरण शांत झाले आहे. तणाव निवळल्यावर पोलीस फौज हटविण्यात आली आहे. दरम्यान, हिंसा करणे, दगडफेक करणे, खुर्च्यांची फेकाफेक करणे अशा घटनेवरून गावकर, राणे, माजीक व इतर गटाच्या जवळपास ७७ पेक्षा जास्त जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पारंपरिक कालोत्सव साजरा करण्यात आल्यानंतर गुरुवारी गवळण काला साजरा करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संध्याकाळी ८ वाजण्याच्या सुमारास हा उत्सव संपला. त्यानंतर या भागामध्ये शांततामय वातावरण निर्माण झाले. कोणत्याही क्षणी पुन्हा एकदा वातावरण बिघडण्याची शक्यता असल्यामुळे पोलीस घटनास्थळी उपस्थित होते.

गुरुवारी गवळणकाला साजरा करण्यात आल्यानंतर रात्री पोलीस पहारा ठेवण्यात आला होता. शुक्रवारी सकाळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. तरीसुद्धा शुक्रवारी दिवसभर पोलीस पेट्रोलिंग करण्यात आले. कोणत्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही याची दखल पोलीस यंत्रणांकडून घेण्यात येत होती.

पोलीस निरीक्षक शिरोडकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सध्यातरी पोलीस बंदोबस्त पूर्णपणे हटविण्यात आला आहे. तरीसुद्धा पोलिसांचे नजर या भागामध्ये आहे.

सध्या ७७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यांची ओळख पटलेली आहे. व्हिडिओच्या आधारावरून या घटनेशी संबंधित असलेले व प्रकरणांमध्ये ज्यांचा हात आहे त्यांची ओळख पटवण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. यामुळे येणाऱ्या काळात या संख्येमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

घटनेशी संबंधित असणाऱ्यांची कोणत्याही प्रकारची गय केली जाणार नाही. या घटनेमध्ये ज्यांचा सहभाग आहे, त्या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. या प्रकरणातून कोणीही सुटणार नाही, असे पोलीस उपअधीक्षक जीवबा दळवी यांनी सांगितले.