२०२३ मध्ये खून : पुढील सुनावणी २९ जानेवारी रोजी
पणजी : सराईत गुन्हेगार विशाल गोलतकर याचा २०२३ मध्ये खून करण्यात आला होता. या प्रकरणी सराईत गुन्हेगार साई उर्फ कोब्रा कुंडईकर, तुषार कुंडईकर या भावंडांसह ओंकार च्यारी, गौरेश गावस आणि निलंबित प्रशिक्षणार्थी पोलीस काॅन्स्टेबल अमेय वळवईकर या पाच जणांविरोधात न्यायालयाने आरोप निश्चित करण्याचा आदेश दिला आहे. याबाबतचा आदेश पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायाधीश ईर्शाद आगा यांनी दिला आहे.
जुने गोवा पोलिसांनी १६ जुलै २०२३ रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार, सराईत गुन्हेगार विशाल गोलतकरचा मृतदेह १६ जुलै २०२३ रोजी सकाळी ११ वा. मेरशी येथील ‘अपना घर’ जवळ रस्त्याच्या बाजूला झाडीत सापडला होता. यावेळी पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, त्याच्यावर धारधार शस्त्राने डोक्यावर तसेच इतर ठिकाणी हल्ला केल्याचे समोर आले होते. त्यानंतर विशाल गोलतकर याच्या नातेवाईकांनी विशाल याचा खून पूर्ववैमनस्यातून झाल्याचा संशय व्यक्त करत तक्रार दाखल केली होती. त्याच दरम्यान पोलिसांनी सराईत गुन्हेगार संशयित साई उर्फ कोब्रा कुंडईकर, तुषार कुंडईकर या भावंडांसह ओंकार च्यारी, गौरेश गावस आणि निलंबित प्रशिक्षणार्थी पोलीस काॅ. अमेय वळवईकर या पाच जणांना ताब्यात घेतले. याशिवाय एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याची अपना घरात रवानगी केली होती. या प्रकरणी जुने गोवा पोलीस निरीक्षक सतीश पडवळकर यांनी वरील पाच संशयिताविरोधात भादंसंच्या कलम ३०२, ५०४, ५०६ (ii), आणि शस्त्र कायद्याचे कलम २७ अंतर्गत गुन्हा दाखल करून वरील पाच जणांना अटक केली.
या प्रकरणाची चौकशी पूर्ण करून पोलिसांनी पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयात ४१९ पानी आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात ४० साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या आहेत. खून प्रकरण सत्र न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येत असल्यामुळे तिथे वर्ग करण्यात आले. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली असता, न्यायालयाने प्रथमदर्शनी पुराव्याची दखल घेऊन वरील संशयितांना खून प्रकरणी आरोप निश्चित करण्याचा आदेश जारी केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २९ जानेवारी रोजी होणार आहे.
४ जणांना मिळाला होता जामीन
विशाल गोलतकर खून प्रकरणातील मुख्य संशयित साई कुंडईकर वगळता इतर चार जणांना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. याशिवाय एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याची अपना घरात रवानगी केली होती.