जादा मोबदल्याच्या आमिषाने २.४४ कोटी रुपयांचा गंडा

बेतकी-खांडोळा येथील युवकाची फसवणूक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
just now
जादा मोबदल्याच्या आमिषाने २.४४ कोटी रुपयांचा गंडा

पणजी : शेअर ट्रेडिंगमध्ये जादा मोबदला देण्याचे आमिष दाखवून बेतकी- खांडोळा येथील एकाला २.४४ कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी सायबर विभागाने अज्ञात वॉट्सअॅप मोबाईलधारकांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी बेतकी - खांडोळा येथील रुद्रेश साखरदांडे यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, २५ नोव्हेंबर २०२४ ते ७ जानेवारी २०२५ दरम्यान अज्ञात व्यक्तीने त्याच्याशी वेगवेगळ्या वॉट्सअॅप मोबाईल क्रमांकाच्या, फेसबुक व सोशल मीडियाच्या इतर माध्यमांद्वारे संपर्क साधला. तसेच त्यांना शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवल्यास जादा मोबदला देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी तक्रारदाराला फेसबुक या सोशल मीडियाच्या लिंक पाठवून त्यात सहभागी करून घेतले. त्यानंतर त्याला शेअर ट्रेडिंग अॅप डाऊनलोड करण्यास लावले. त्या अॅपद्वारे तक्रारदाराला विविध बँकेच्या खात्यात सुमारे २ कोटी ४४ लाख ५९ हजार ४०८ रुपये जमा करण्यास भाग पाडले. काही काळानंतर संबंधित अॅपमधील तक्रारदाराचे खाते ब्लाॅक करण्यात आले. याच दरम्यान फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने सायबर विभागात धाव घेत आपली सुमारे २ कोटी ४४ लाख ५९ हजार ४०८ रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली.

अज्ञात मोबाईल धारकांविरोधात गुन्हा नोंद

तक्रारीची दखल घेत सायबर विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दीपक पेडणेकर यांनी अज्ञात वॉट्सअॅप मोबाईल धारकांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३१९ (२) आरडब्ल्यू ३(५)आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ ‘डी’ अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.