सत्र न्यायालयात अर्ज दाखल : उद्या सुनावणी
पणजी : जमीन हडप प्रकरणातील मुख्य संशयित सिद्दिकी खान याचा साथीदार आसिफ सौदागर (३३, करासवाडा - म्हापसा) याला विशेष तपास पथकाने (एसआयटी) अटक केली. संशयित सौदागरने पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १८ रोजी होणार आहे.
या प्रकरणी तत्कालीन उपनिबंधक अर्जुन शेटये यांनी अज्ञात व्यक्तीविरोधात म्हापसा पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, थिवी - बार्देश येथील सर्व्हे क्र. ४५५/७, ४६६/५ आणि ४६६/६ मधील जमीन बनावट दस्तावेज तयार करून हडप करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले होते. त्यानंतर म्हापसा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. याच दरम्यान जमीन हडप प्रकरणी विशेष तपास पथकाची स्थापना करुन वरील प्रकरण तिथे वर्ग करण्यात याले. दरम्यान, एसआयटीने मागील चार वर्षे फरार असलेला मुख्य सूत्रधार सिद्दिकी उर्फ सुलेमान खानला हुबळीमधून अटक केली होती. त्यानंतर सिद्दिकीने १३ डिसेंबर २०२४ रोजी पहाटे आयआरबी कॉन्स्टेबल अमित नाईक याची मदत घेत पळ काढला. त्यानंतर गुन्हा शाखेच्या पथकाने एर्नाकुलम-केरळ पोलिसांच्या मदतीने सिद्दिकीला २१ रोजी अटक केली होती. त्यावेळी त्याच्यासोबत त्याची पत्नी अफसाना उर्फ सारिका सुलेमान खान होती. एसआयटीने तिला अटक केली होती. न्यायालयाने तिची जामिनावर सुटका केली आहे.
दरम्यान, या प्रकरणी सहभाग असल्यामुळे एसआयटीने संशयित सिद्दिकी याचा साथीदार आसिफ सौदागर याला १४ रोजी अटक केली आहे. आसिफ सौदागर याने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे.
सिद्दिकी न्यायालयीन कोठडीत, पत्नीला जामीन
जमीन हडप प्रकरणातील मुख्य सूत्रधार सिद्दिकी उर्फ सुलेमान खान न्यायालयीन कोठडीत असून त्याची पत्नी अफसाना उर्फ सारिका सुलेमान खान हिला न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.