सूचना सेठ विरोधात सुनावणी सुरू

चार वर्षीय मुलाच्या खूनप्रकरणी तक्रारदाराची साक्ष नोंद

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
10 hours ago
सूचना सेठ विरोधात सुनावणी सुरू

पणजी : आपल्याच चार वर्षीय मुलाचा खून केल्याप्रकरणी बंगळुरू येथील आर्टिफिशिल इंटेलिजन्स कंपनीची संस्थापिका तथा सीईओ सूचना सेठ हिच्या विरोधात बाल न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या प्रकरणी न्यायालयाने तक्रारदाराची साक्ष नोंद केली आहे.

संशयित सूचना सेठ हिने ७ जानेवारी २०२४ रोजी रात्री सिकेरी- कांदोळी येथील हॉटेलमध्ये स्वत:च्या चार वर्षांच्या मुलाचा खून केला होता. त्यानंतर स्वत:च्या हाताची नस कापून आत्महत्येचाही प्रयत्न तिने केला. पण, त्यात ती अपयशी ठरली. तिने मुलाचा मृतदेह बॅगमध्ये भरून गोव्यातून रस्त्यामार्गे बंगळुरुला पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, कळंगुट पोलिसांच्या सतर्कतेमुळे ती कर्नाटक पोलिसांच्या तावडीत सापडली. कर्नाटक पोलिसांनी तिला अटक करून गोवा पोलिसांच्या स्वाधीन केले. गोवा पोलिसांनी तिला अटक केली होती. या प्रकरणी कळंगुट पोलिसांनी तपास पूर्ण करून संशयित सूचना सेठ हिच्याविरोधात बाल न्यायालयात आरोपपत्र दाखल केला आहे. तिथे सुनावणी सुरू झाल्यानंतर ती मानसिकदृष्ट्या ठीक नाही, असा दावा तिच्या वडिलांनी करून पुन्हा मानसिक चाचणी करण्यात यावी, असा अर्ज बाल न्यायालयात केला होता. त्यातही तिची मानसिक स्थिती उत्तम असल्याचा अहवाल वैद्यकीय मंडळाने दिला होता. याच दरम्यान न्यायालयाने सूचना सेठ हिच्यावर आरोप निश्चित करून खटला सुरू केला. या प्रकरणी न्यायालयाने तक्रारदाराची साक्ष नोंद करून पूर्ण केली आहे. त्यात त्याने तक्रारीची व्यवस्थित माहिती दिल्याचे समोर आले आहे.