निसर्ग हा माणसाचा जन्मदाता आहे आणि जन्मदात्याच्या प्रती आपण आदर, सन्मान, काळजी मनात बाळगली पाहिजे. निसर्ग नियमांना समजून उमजून घेत त्याप्रमाणे आपलं वाढणं हे जास्त नैसर्गिक आणि सहज सुलभ आणि सुंदर आहे.
देवाने आपल्या सर्वांना सर्वात अनमोल आणि सुंदर अशी देणगी दिली आहे ती म्हणजे निसर्ग. स्वच्छ सुंदर सूर्यप्रकाश, शांत शीतल वारे, पावसाचा शिडकावा, इंद्रधनुची कमान, ढगांची चढती कमान, डोंगरदऱ्यांचा पसारा आपले दोन्ही बाहू पसरून जणू तो आपल्या स्वागतासाठी सज्ज असतो. त्याचे प्रत्येक रंग, रूप आणि छटा आपल्या मनाला मोहवीत असते मग तो जपानचा साकुरा असो वाळवंटातील मृगजळ असो पावसाळी संध्या असो की तारकांची रात्र असो पौर्णिमेचा चंद्र आकाशस्थ नक्षत्रे रोजच आपले दर्शन देत आपल्याला सुखवीत असतात. ऋतुप्रमाणे त्याचे बदलणारे रूप दिवस आणि रात्र, पहाट आणि संध्या सारेच आपल्या जीवनाचे अविभाज्य भाग. हिरवीगार हिरवाई, पिकली झाडांवर लगडलेली फळे, उमललेली फुले त्यावर विहारणारी रंगीबेरंगी फुलपाखरे अशी विलोभनीय चित्रे नजरेत साठवून ठेवण्याजोगीच. बदलणाऱ्या ऋतुचक्राप्रमाणे बदलत जाणारे हवामान, वातावरणातला बदल हे सर्व निसर्ग नियमाला धरूनच असतं. फुलांचं उमलणं जसं साहजिकच आणि नैसर्गिक तशीच निसर्गातली पानगळ ही आवश्यकच असते, जुन्याची जागा नव्याला करून देणं आवश्यक असतं कोवळी पालवी आणि पानगळ हे दोन्ही निसर्ग नियम आहेत आणि ती जीवनशैली कायम टिकून राहण्यासाठी पुनरुज्जीवन हेही गरजेचं. निसर्गाला अनुसरून माणसाचे आहार-विहार, आचार-विचार आणि व्यवहार घडत जातात. कालमानानुसार बदलतही जातात. निसर्ग नियमांना समजून घेत त्यांच्यासवे आपणही वाढत जाणं हे सहज सुंदर असतं. बिजाचं अंकुरणं, पालवी फुटणं, फुलांचा बहर, फळांचं लगडणं या सर्व स्थितितून आपल्याला निसर्गाच्या प्रत्येक अवस्थेची माहिती होत जाते, ते टप्पे आपण अनुभवू शकतो त्यातले सौंदर्य टिपू शकतो. हे फक्त निसर्गातील झाड, फुलांच्या बाबतीतच नाही तर प्राणी, नदी-नाले बाकी सर्व शाश्वत गोष्टींच्या बाबतीतही पाहू शकतो. आपले स्वतःचे शरीर ही सुद्धा एक परमेश्वरी देणगी आहे आणि त्याबद्दल आपण नक्कीच देवाचे आभार मानावे तितके थोडे. निसर्ग हा आपल्या जगण्याचा अंतिम स्त्रोत आहे आणि त्याचे संवर्धन करणं, त्याची जपणूक करणं सर्वस्वी आपल्या हातात असतं. मानवाने केलेल्या छोट्याश्या चुकीतून निसर्गाला मोठी हानी पोहचू शकते हे सध्या लॉस अॅनजेलिस इथे लागलेल्या भयानक आगीने दाखवून दिले आहे. निसर्गाने निर्माण केलेले मानव, प्राणी, पशू-पक्षी, झाडे-वेली, नद्या-नाले, पर्वत हे सारे घटक एकमेकांवर अवलंबून असतात हे सर्व घटक निसर्गाचे संतुलन राखण्यात महत्त्वपूर्ण ठरतात. या सर्व घटकांचे कायम असणे गरजेचे असते. त्यासाठी जंगलाचा नाश होईल इतकी झाडे तोडणे, पाण्या सारख्या शुद्ध प्राकृतिक गोष्टीत सोडले जाणारे दूषित पाणी पर्यावरण आणि मानवी जीवन दोन्हींना घातकच असते. स्वच्छता आणि शुद्धता या गोष्टींमुळे निसर्गप्राप्त घटकांचे आपण जतन करू शकलो तर ते सर्वांसाठी योग्यच ठरेल. प्रत्येकाने याचा विचार करूनच आपली जीवनशैली बनवली पाहिजे. प्लास्टिकला नकार देत निसर्गाचा नाश करणं थांबवलं पाहिजे. नासधूस आणि नको तितके यांत्रिकीकरण या गोष्टींमुळे निसर्ग घटकांना हानी पोहचू शकते. अनमोल ठेवा आपण नष्ट करू शकतो याची जाणीव ठेवली पाहिजे. ज्या गोष्टी मानवनिर्मित नाहीत त्या सर्व गोष्टी निसर्ग या व्याख्येत मोडतात म्हणजे निसर्गाची प्रत्येक गोष्ट ही जितकी नैसर्गिक तितकीच बहुमोल कारण तिची निर्मिती आपण करू शकत नाही. मानवी जीवनासाठी निसर्ग हा आवश्यकच नाही तर वरदान स्वरूप आहे तो मोहक, आकर्षक आहे. प्राणी, वनस्पति, वन्यजीवन यांच्याशी जोडण्यासाठी आपल्याला निसर्गाकडेच वळावे लागते. निसर्गाच्या कुशीत राहण्याची ही जन्मजात इच्छा माणसाच्या मनात घर करून असते. कारण तिथे मिळणारी गहरी शांतता मनाला विसावा देणारा गारवा अनुभवताना मिळू शकते. दोन चार दिवसांनी थोडंसं शहरापासून, रोजच्या रुटीनपासून दूर निसर्गाच्या सानिध्यात गेलं की मन पुन्हा ताजेतवाने होते. आराम करायला ते एक विश्रांती स्थान असते नैराश्य, त्रास, तणाव, राग या भावना नष्ट करायच्या असतील तर निसर्गाच्या सानिध्यात गेलं पाहिजे. स्वतःच्या मनाची, शरीराची शक्ती आरोग्य वाढवण्यास निसर्ग मदत करतो. निसर्ग प्रेरणा देणारे ठिकाण असू शकते. कलाकारांच्या प्रतिभेला उत्तेजन देणारे वातावरण मिळू शकते. अर्थात प्रत्येक जण काही मेघाकडे बघून कालिदासासारखे महाकाव्य लिहिणार नाही पण एकंदरीत मनाची अवस्था हलकी फुलकी होते जे मनाच्या आरोग्यासाठी आवश्यक असते. शिवाय वन विहार करताना चालण्याचा व्यायाम शारीरिक हालचालीतून फिटनेस याने आरोग्य राखले जाते चार माणसे एकत्र येऊन अशी निसर्गाची सहल अनुभवतात तेव्हा मित्रत्वाचे नाते घट्ट होते. निसर्ग तुम्हाला बरंच काही शिकवत असतो ते जाणून घेण्याची इच्छा पाहिजे. निसर्गाच्या नीरव शांततेत आपण आपल्या मनाशी संवाद साधू शकतो. तुकारामासारखे संत जंगलातील वृक्ष वेलींच्या सहवासात देवाशी तादात्म्य साधतात किंवा ऋषि मुनी अरण्यात राहूनच वेदांचा अभ्यास, त्याची निर्मिती करू शकले. विज्ञानामुळे माणसाने जरी प्रगती केली असली तरी निसर्गाचा ऱ्हास करण्यातही तोच कारण ठरतो. निसर्ग हा माणसाचा जन्मदाता आहे आणि जन्मदात्याच्या प्रती आपण आदर, सन्मान, काळजी मनात बाळगली पाहिजे. निसर्ग नियमांना समजून उमजून घेत त्याप्रमाणे आपलं वाढणं हे जास्त नैसर्गिक आणि सहज सुलभ आणि सुंदर आहे.
प्रतिभा कारंजकर, फोंडा