‘शुक्रतारा मंदवारा…’ कविवर्यं मंगेश पाडगावकर यांच्या लेखणीतून साकारलेले हे गीत श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध करताना त्याला मखमली सुरांचा बादशाहा म्हणून ज्यांना संगीत जगतात ओळखले जाते, त्या अरुण दाते यांच्या भारलेल्या स्वरांत गुंफले आणि एका अप्रतिम गाण्याची अनुभूती संगीत रसिकांना मिळाली.
जवळजवळ ६० वर्षांपूर्वी प्रसारित झालेल्या ‘शुक्रतारा मंदवारा...’ या गाण्याची गोडी अजूनही तितकीच गोड असून या गाण्याचा प्रभाव आजही रसिकांच्या मनावर कायम आहे. अरुण दाते या सुरांच्या बादशाहाने गायिलेल्या या गाण्याचे सूर कानावर पडताच नकळतच डोळे मिटले जातात आणि या सुरांच्या हिंदोळ्यावर आपण झुलत राहतो.
गानसम्राज्ञी लता दीदींनी आपल्या ७० वर्षांच्या कालावधीत शेकडो मराठी गाणी गायिली. परंतु मराठी भावसंगीतात फक्त एकच युगूलगीत गायिले आणि ते ही अरुण दाते यांच्यासोबत. ते गाणे म्हणजे ‘शुक्रतारा मंदवारा...’
मराठी भावसंगीतातील हे पहिलेच युगूलगीत तुफान गाजले. सुरुवातीला जेव्हा हे गाणे मंगेश पाडगांवकरांनी लिहिले आणि संगीतकार श्रीनिवास खळे यांना दाखवले, तेव्हा श्रीनिवास खळे यांनी सांगितले की, हे गाणे मला युगूलगीत करायचे आहे. कारण हे गाणे गाण्यासाठी मला एक वेगळा आवाज मिळाला आहे आणि आपण पहिल्यांदा वेगळे असे काहीतरी करत आहोत. तेव्हा मंगेश पाडगावकर यांनी ते गाणे परत युगूलगीतामध्ये लिहून दिले आणि एका नवीन युगूलगीताचा जन्म झाला.
या गाण्याचा इतिहास मोठा रंजक आहे. संगीतकार यशवंत देव हे मुंबईच्या रेडियो स्टेशनवर संचालक म्हणून असताना त्यांनी इंदौर रेडियो स्टेशनवर उर्दू गझल गाताना अरुण दाते यांचा आवाज ऐकला. या आवाजाने ते प्रभावित झाले आणि त्यांनी गाण्याच्या गायकाची माहिती काढली तेव्हा त्यांना समजले की, हा आवाज अरुण दाते यांचा आहे आणि ते सध्या मुंबईतच आहेत. तेव्हा त्यांनी मराठी गाणे गाण्यासाठी त्यांना संपर्क केला. परंतु अरुण दाते यांच्याकडून काहीच प्रत्युत्तर न आल्याने श्रीनिवास खळे हे अरुण दाते यांच्या घरी आले तेव्हा अरुण दाते यांचे वडील रामूभैय्या दाते घरी होते. त्यांना सर्व हकिगत समजल्यावर ते अरुण दाते यांच्यावर नाराज झाले. रामूभैय्या यांनी श्रीनिवास खळे यांना तुम्ही गाणे ऐकावा असे सांगितल्यावर त्यांनी पेटी काढली आणि गाणे ऐकवले. ते गाणे होते, ‘शुक्रतारा मंदवारा... हे गाणे ऐकल्यावर अरुण दाते फारच खूश होऊन म्हणाले की, खरंच वाटत नाही की हे गाणे जणू माझ्यासाठीच बनले आहे... माझ्या आयुष्यात प्रथमच माझ्या आवाजाच्या जातीचं गाणं कुणीतरी बनवलं आहे! आणि मग हे गाणे १९६२ साली सप्टेंबरमध्ये रेडियोसाठी ध्वनिमुद्रीत झाले आणि मग १९६३ साली एचएमव्हीसाठी ते पुन्हा ध्वनिमुद्रीत केले गेले. ‘शुक्रतारा मंदवारा’ या गाण्याचे ध्वनिमुद्रण झाले आणि केवळ दोन आठवड्यात या गाण्यांनी अशी काही जादू केली की, कानातून हृदयात उतरलेले हे गाणे रसिकांच्या हृदयात कायम कोरले गेले. त्या काळात सोशल मीडिया, इंटरनेट, पेन ड्राइव्ह आदी काहीच साधने नव्हती. तरीही हे गाणे सर्वांच्या मनावर अधिराज्य करून राहिले. त्या काळात प्रेमी युगुलांच्या ओठांवर या गाण्यांनी भुरळ पाडली होती.
गायक अरुण दाते यांचे मूळ नाव अरविंद आहे. परंतु या गाण्यामुळे गायक अरुण दाते यांना ‘अरुण’ हे नाव मिळाले. याची कहाणी मोठी रंजक आहे. त्याकाळी भावसरगम नावाचा कार्यक्रम केशवराव भोळे यांनी ऑल इंडिया रेडियोवर दर शुक्रवारी सुरू केला होता. गाणे प्रसारित करायच्या वेळेत तिथे ए.आर.दाते असे नाव देण्यात आले होते. यशवंत देव यांना पूर्ण नाव माहीत नव्हते, पण जेव्हा ते अरुण दाते यांच्या घरी आलेले तेव्हा त्यांना त्यांचे वडील ‘अरु’ या नावाने हाक मारत होते. त्यामुळे त्यांनी अरु म्हणजे अरुण असे समजून तिथे अरुण हे नाव लिहून दिले. आणि मग त्या नावातच हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले. पुढे अरुण हेच नाव कायम झाले. प्रिय व्यक्तीच्या सोबतीचा आनंद हा पैशाने विकत घेता येत नाही असे वपु म्हणतात... त्याचा प्रत्यय आपल्याला या गाण्यात येतो. निर्वाज्य प्रेमाची व्याख्या आपल्याला शुक्रतारा मंदवारा या गाण्यातून मिळत राहते. आणि हा भाव आपल्याला, ‘आज तू डोळ्यांत माझ्या... मिसळूनी डोळे पहा...तू अशी जवळी रहा... या गीतातील शब्दांतून आपल्या हृदयापर्यंत पोहोचतो. अरुण दाते आपल्या मखमली सुरांत भिजलेल्या स्वरांनी जेव्हा आर्जव करतात, तेव्हा सुरांत भिजलेले शब्द आपल्यालाही चिंब भिजवून टाकतात आणि ही सुरांची नशा दीर्घकाळ मनात ठसते.
“ लाजर्या माझ्या फुला रे गंध हा बिलगे जीवा
अंतरीच्या स्पंदनांने अन थरारे ही हवा
भारलेल्या या स्वरांनी भारलेला जन्म हा
तू अशी जवळी रहा !.. “
अरुण दाते यांच्या नाजूक आणि भावनेने ओथंबलेल्या स्वरांची जादू या गाण्यातील शब्दांत अशी काही आहे की, या कडव्यातला प्रत्येक शब्द हा काळजात खोलवर उतरून राहतो.
हे मूळ गाणे अरुण दाते यांच्या सोबत लता मंगेशकरसहित नंतर सुधा मल्होत्रा आदी अनेक गायिकांनी गायिले. परंतु गायक मात्र अरुण दातेच राहिले. त्यांच्या प्रत्येक गाण्यातील आवाजातील गोडवा हा मर्मबंधातली ठेव म्हणूनच प्रत्येकाच्या हृदयात जपला गेला.
कविता आमोणकर