खीर

आपण वाचतो तेव्हा आपण स्वत: ते चित्र आपल्या मनात रंगवत असतो पण आपण जेव्हा चित्रपट बघतो तेव्हा कुणीतरी रंगवलेले चित्र आपण बघत असतो. पण चैत्र हा लघुपट बघताना मात्र आपल्याच मनातले चित्र समोर दिसत आहे असे वाटत होते.

Story: आवठलेलं |
11th January, 05:30 am
खीर

मैत्री... किती सहज, सोपा शब्द.  पण याला किती पैलू आहेत हे उलगडून पाहणेदेखील अवघड. या अवघड पैलुंमधला एक नाजूक धागा म्हणजे स्त्री-पुरुष मैत्री. ठराविक वयापर्यंत या स्त्री-पुरुष मैत्रीला एका हळव्या भावनेचे कोंदण असते. अगदी कोवळ्या वयात या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले तर? असा एक मुख्य प्रश्न असतो कारण सगळीकडूनच ‘एक लडका और एक लडकी कभी भी सिर्फ दोस्त नहीं बन शकते.’ अशा प्रकारची विधाने लादली गेलेली असतात. त्यामुळे त्यावरच विश्वास ठेवून बऱ्याच जणांची वाटचाल सुरू असते. अर्थात यात त्यांचा दोष नाहीच. हे विधान किती चुकीचे आणि पोकळ आहे याची उकल वयाच्या एका टप्प्यावर सगळ्यांनाच होते. पण मग इतर प्रश्न समोर उभे असतात. कोण काय म्हणेल? लोक काय विचार करतील? घरचे काय विचार करतील? गैरसमजातून नको ते वादळ निर्माण होणार नाही ना? असे अनेक प्रश्न मनात घर करून असतात. हे सगळे असे होतेच असा काही माझा दावा नाही. पण हे असे सगळे व्हायची शक्यता मात्र सगळ्यात जास्त असते असे मला मनापासून वाटते. 

वयाचा एक टप्पा पार झाला की मात्र लोकांच्या समाधानापेक्षा आपला आनंद जास्त महत्त्वाचा वाटायला लागत असावा. या वयात माणूस तसाही बऱ्याच पाशांपासून मुक्त झालेला असतो. अशावेळी भावनिक पूर्णत्व मिळावे अशी एकमेव अपेक्षा असावी. लोकांचा वगैरे विचार न करता मग माणूस निदान स्वतःपुरत्या एका सुरक्षित चौकटीत जगू लागतो. दुसऱ्यांचे समाधान म्हणून काही गोष्टी त्यांच्यापासून लपवून ठेवल्या तरी त्या स्वतःपाशी कबूल करायला त्याला काहीच वाटत नसावे. 

स्त्री-पुरुष मैत्री ही अशीच असते असे माझे मत ‘खीर’ या लघुपटामुळे अधिकच पक्के झाले. 

मैत्रीची व्याख्या फार व्यापक असते किंवा आपण असे म्हणू की आपण ती फार व्यापक करून ठेवली आहे. वयात आलेल्या मुलीची आई मैत्रीण होते किंवा बापाची चप्पल मुलगा घालायला लागला की बापाने त्याचा मित्र व्हायला पाहिजे यासारखी विधाने ही व्याख्या व्यापक करण्याला हातभारच लावत असतात. प्रत्येक नात्याचा एक स्वतंत्र अवाका असतो आणि त्या नात्यापुरता तो सुंदरच असतो. प्रत्येक नात्यात मैत्री आणल्याने ते नाते सुंदर होते हा मलातरी एक गैरसमज वाटतो. याचप्रमाणे प्रत्येक नात्यातून मैत्री वजा केली तर ते रुक्ष होत नाही असे वाटते. मैत्री आणि प्रेमाची सरमिसळ तर बऱ्याचदा होतेच. वयाने लहान आणि फारसा अनुभव नसताना ते होणे हे साहजिकच आहे पण नंतर मात्र आपल्या भावना आपल्या मनावर स्वच्छ उमटत आहेत का नाही हे बघणे गरजेचे. 

अवघ्या सहा मिनिटाच्या लघुपटाची सुरुवात होते ती धूळ, पसारा आणि बंद घड्याळ यावरून वैतागलेल्या एका बाईच्या चिडचिडीने आणि त्यानंतर लगेच येतो तो पुरुषाच्या प्रत्युत्तर आणि उलट चिडचिडीचा आवाज. कोणत्याही मुरलेल्या, जबाबदाऱ्यांतून मुक्त झालेल्या जोडप्याची वाटावी अशी ही अगदी प्रापंचिक बडबड वाटते. नंतर प्रवेश होतो तो नातवंडांचा. त्यावरून एक मोठा खुलासा होतो. खरेतर, कोणत्याही चित्रपटाबद्दल किंवा पुस्तके, नाटकांबद्दल लिहिताना त्याची कथा वाचकांपर्यंत पोहचू न देता त्यातील आशयाची कल्पना तेवढी पोहचवणे आणि ती कलाकृती अनुभवण्यासाठी वाचकाला प्रोत्साहन देणे यात लेखकाच्या लेखनकौशल्याची कस लागते. पण इथे मात्र माझे लेखनकौशल्य तोकडे पडणार आहे याची कबुली आधीच दिलेली बरी. लेखाच्या सुरुवातीला ‘स्पोईलर अलर्ट’ असतो तसाच काहीसा हा इशारा आहे. 

तर, लघुपटातल्या नातवंडांना आणि आपल्याला हा खुलासा एकाच वेळी होतो. आजोबांची मैत्रीण बघून अडनिड्या वयातली नात अवघडते.  आजोबा आपल्या आजीला ‘रिप्लेस’ करणार आहेत का काय? अशीही तिच्या वयानुरूप भीती तिच्या मनात तरळून जाते. भावनांची आणि नात्यातली गुंतागुंत तिला समजावून सांगणे अवघड. ती तिला समजावून कळणारही नाहीत. भावनिक पूर्णत्व, केवळ सोबत किंवा ज्याला आपण अलौकिक म्हणू शकतो अशा प्रकारचे हे प्रेम ही समजावून सांगण्याची गोष्ट नाहीच. पण रुसलेल्या, नाराज झालेल्या आणि मुख्य म्हणजे असुरक्षित झालेल्या नातीला समजावताना आजोबा अगदी अलगद एक समान धागा पकडतात, तो हलकासा सैल करतात आणि त्यामुळे संपूर्ण नात्यावर आलेला तणाव अगदी अलगदपणे दूर होतो. पोटभर जेवणाच्या शेवटी चमचाभर खीर खाल्ल्यावर मिळते तेच हे समाधान!  

यामुळे आपल्या हातात मात्र अनेक धागेदोरे येतात. कुठेही घाई, गडबड न करता.. कुणालाही न दुखवता नात्यांची उकल करता यावी यासाठी आधी ते नाते आपल्याला समजायला हवे. त्यासाठी मैत्रीची व्याख्या व्यापक न करता आपली सगळी नाती व्यापक करता येतील का? या प्रश्नाचे उत्तर शोधणे आवश्यक वाटते.


मुग्धा मणेरीकर, फोंडा