निशा मधुलिका: जिद्दीचं दुसरं नाव!

उत्तर प्रदेशातील एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात १९५९ साली जन्मलेल्या निशा मधुलिका यांचा प्रवास हा केवळ स्वयंपाकापुरता मर्यादित नाही, तर तो आहे जिद्द, सकारात्मकता आणि स्व-ओळख निर्माण करण्याच्या धैर्याची एक कहाणी! सुरुवातीला शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या निशा यांनी नंतर पतीच्या व्यवसायातही मदत केली, पण जेव्हा मुलं मोठी होऊन घरापासून दूर गेली, तेव्हा त्यांना जाणवलेल्या एकटेपणावर मात करण्यासाठी त्यांनी एक अद्भुत मार्ग निवडला, तो म्हणजे ब्लॉगिंग!

Story: इतिहास घडवणाऱ्या स्त्रिया |
14th November, 10:29 pm
निशा मधुलिका:  जिद्दीचं दुसरं नाव!

 २००७ मध्ये सुरू झालेला हा प्रवास एकटेपणाला दिलेले एक गोड आव्हान होते. त्यांनी आपल्या ब्लॉगवर केवळ शाकाहारी स्वयंपाकाचे विविध पदार्थ आणि घरगुती पारंपरिक रेसिपीज साध्या, सोप्या भाषेत मांडायला सुरुवात केली. त्यांच्या लिखाणाची सहजता आणि पारंपरिक चवीची ओढ वाचकांना लगेचच भावली आणि हा प्रतिसाद त्यांना पुढचे पाऊल टाकण्याची प्रेरणा देऊन गेला.

२०११ मध्ये, त्यांनी आपला यूट्यूब चॅनल सुरू केला आणि पाककृतींचे व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात केली. त्यांची हिंदी भाषेतील सहज संवादशैली आणि कृतीचे अगदी सोपे सादरीकरण, यामुळे त्या अल्पावधीतच लाखो घरांमध्ये पोहोचल्या. त्यांच्या व्हिडिओजमध्ये कोणताही दिखावा नव्हता, फक्त प्रेम, आपुलकी आणि उत्तम चवीची खात्री होती, ज्यामुळे त्यांचा चॅनल बघता बघता प्रचंड लोकप्रिय झाला.

आज, २०२५ पर्यंत, निशा मधुलिका यांच्या यूट्यूब चॅनलवर १.४ कोटींहून अधिक सबस्क्राईबर्स आहेत आणि त्यांनी तब्बल २३०० हून अधिक व्हिडिओ शेअर केले आहेत, ज्यांना अब्जो वेळा पाहिले गेले आहे! ही आकडेवारी केवळ त्यांच्या लोकप्रियतेची नव्हे, तर त्यांच्या कामाप्रती असलेल्या समर्पणाची साक्ष देते. केवळ यूट्यूबच नव्हे, तर फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरही त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत.

यूट्यूब अ‍ॅड रेव्हेन्यू, ब्रँड कोलॅबरेशन्स आणि स्वतःच्या फूड वेबसाइटच्या माध्यमातून त्यांची सध्याची नेटवर्थ अंदाजे ४३ कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे, त्यांनी इंडियन एक्सप्रेस, टाइम्स ऑफ इंडिया, अमर उजाला आणि दैनिक भास्करसारख्या नामवंत वृत्तपत्रांसाठी फूड कॉलम लिहून आपल्या लेखणीची छापही पाडली आहे.

त्यांच्या या अतुलनीय कार्याची दखल घेत २०१६ मध्ये इकॉनॉमिक टाइम्सने त्यांना भारतातील टॉप १० यूट्यूब सुपरस्टार्समध्ये स्थान दिले. २०२० मध्ये, १ कोटी सबस्क्रायबर्स पूर्ण केल्याबद्दल त्यांना यूट्यूबचा प्रतिष्ठित डायमंड प्ले बटन मिळाला.

निशा मधुलिका यांचा प्रवास सिद्ध करतो की वय हा केवळ एक आकडा असतो. जेव्हा तुमच्यात काहीतरी करण्याची प्रखर जिद्द आणि सकारात्मकता असते, तेव्हा यशाचे दरवाजे आपोआप उघडतात. त्यांनी केवळ रेसिपीज शेअर केल्या नाहीत, तर घर सांभाळणाऱ्या असंख्य महिलांना त्यांच्या स्वयंपाकाच्या कौशल्याला स्वतःची ओळख बनवण्यासाठी आणि स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी एक मोठी प्रेरणा दिली आहे. त्यांची यशोगाथा आज प्रत्येक वयोगटातील लोकांना 'काहीतरी नवीन' करण्यासाठी प्रोत्साहित करते!


- स्नेहा सुतार