आजच्या धावपळीच्या जीवनात, शरीर आणि मनाच्या पुनर्निर्मितीसाठी आवश्यक असणारी झोप, स्त्रियांना अनेकदा दुय्यम ठेवावी लागते. या झोपेच्या अभावामुळे त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम या लेखात पाहूया.

आपल्या जीवनात झोप ही अन्न, पाण्याइतकीच मूलभूत आहे. दिवसातील सुमारे एक तृतीयांश वेळ मनुष्य झोपेत घालवतो, कारण झोप ही शरीर आणि मनाच्या पुनर्निर्मितीसाठी आवश्यक असते. पण, आजच्या वेगवान आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे विशेषतः स्त्रिया झोपेच्या अभावाचा जास्त सामना करत आहेत. घर, करिअर, मुलं, सामाजिक जबाबदाऱ्या आणि वैयक्तिक आयुष्याचा तोल सांभाळत तारेवरची कसरत करताना स्त्रियांना आपली झोप अनेकदा दुय्यम ठेवावी लागते.
झोपेचा अभाव म्हणजे काय?
झोपेचा अभाव म्हणजे व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक पुनर्बलनासाठी आवश्यक इतकी झोप न मिळणे. सामान्यपणे प्रौढ स्त्रियांना दररोज ७ ते ८ तासांची सलग व चांगली झोप आवश्यक असते. जर एखादी स्त्री सतत कमी झोप घेत असेल, झोप वारंवार खंडित होत असेल किंवा झोपेची वेळ अनियमित असेल, तर तिला झोपेचा अभाव जाणवतो.
झोपेच्या अभावाची प्रमुख कारणे
कामाचा आणि कौटुंबिक ताण: दिवसभर काम, मुलांची काळजी, घरकाम व व्यावसायिक जबाबदाऱ्या यामुळे वेळेअभावी झोप मागे पडते.
हार्मोनल बदल: मासिक पाळी, गर्भधारणा, प्रसूतीनंतरचा काळ आणि रजोनिवृत्तीच्या काळात झोपेचा पॅटर्न बदलतो.
ताण व मानसिक चिंता: चिंता, नैराश्य व तणावामुळे झोप येण्यात अडथळा निर्माण होतो.
तंत्रज्ञानाचा अतिरेक: झोपण्यापूर्वी मोबाइल, टीव्ही किंवा लॅपटॉपचा वापर मेंदूला उत्तेजित ठेवतो आणि झोप उशिरा लागते.
आरोग्याशी संबंधित समस्या: थायरॉईड, स्लीप ऍपनिया, पाठीचा किंवा डोकेदुखीचा त्रास झोपेत अडथळा आणू शकतो.
झोपेच्या अभावाचे शारीरिक परिणाम
हार्मोनल असंतुलन: झोप शरीरातील हार्मोन्सचे संतुलन राखण्यासाठी आवश्यक असते. झोपेच्या अभावामुळे कोर्टिसोल (ताण हार्मोन) वाढतो आणि इन्सुलिन रेसिस्टन्स निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वजन वाढणे, मधुमेहाचा धोका आणि मासिक पाळीचे अनियमित चक्र दिसू शकते.
रोगप्रतिकारशक्ती कमी होणे: झोपेच्या दरम्यान शरीरात सायटोकिन्स नावाचे प्रथिने तयार होतात, जी संसर्गाशी लढण्यास मदत करतात. झोपेचा अभाव असल्यास ही प्रक्रिया मंदावते आणि शरीर आजारांना लवकर बळी पडते.
हृदयविकाराचा धोका: दीर्घकाळ झोपेचा अभाव असलेल्या स्त्रियांमध्ये रक्तदाब वाढण्याची आणि हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता अधिक असते.
त्वचा व केसांवरील परिणाम: झोप कमी झाल्यास त्वचेतील कोलेजन निर्मिती घटते. यामुळे त्वचा निस्तेज, कोरडी आणि सुरकुतलेली दिसते. तसेच केसगळती आणि त्वचेसंबंधी ऍलर्जी यांसारखे त्रास वाढतात.
झोपेच्या अभावाचे मानसिक आणि भावनिक परिणाम
नैराश्य आणि चिंता: संशोधनानुसार, झोपेच्या कमतरतेमुळे स्त्रियांमध्ये डिप्रेशन व ऍन्क्झायटी डिसऑर्डरचा धोका पुरुषांपेक्षा अधिक प्रमाणात असतो. झोप न मिळाल्याने मेंदूतील सेरोटोनिनचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे मूड बदल, रडण्याची प्रवृत्ती व चिडचिड वाढते.
एकाग्रता आणि स्मरणशक्तीवर परिणाम: झोप ही मेंदूतील माहिती साठवण्याची आणि प्रक्रिया करण्याची वेळ असते. झोपेचा अभाव असल्यास स्मरणशक्ती कमी होते आणि निर्णयक्षमता दुर्बळ (दुर्बल) होते.
नातेसंबंधांवर परिणाम: थकवा आणि भावनिक अस्थिरतेमुळे स्त्रिया कुटुंबीय आणि सहकाऱ्यांवर सहज चिडू शकतात किंवा दुरावा निर्माण होतो.
दीर्घकालीन परिणाम
झोपेच्या अभावामुळे आरोग्यावर दीर्घकाळ परिणाम दिसू शकतात जसे:
स्थूलता आणि मधुमेह
हृदय रोग
प्रजनन समस्या आणि वंध्यत्व
अकाली वार्धक्य
आयुष्यमान कमी होणे
झोपेचा अभाव टाळण्यासाठी उपाय
झोपेची नियमित वेळ ठरवा: दररोज ठरलेल्या वेळेला झोपणे आणि उठणे.
झोपण्यापूर्वी आरामदायी दिनक्रम तयार करा: वाचन, ध्यान, हलके संगीत, दीर्घ श्वासोच्छ्वास यामुळे मन शांत होते.
स्क्रीन टाळा: झोपण्याच्या किमान एक तास आधी मोबाइल, टीव्ही किंवा लॅपटॉपचा वापर टाळा.
आहार सांभाळा: रात्री जड, तळलेले पदार्थ किंवा कॅफिनयुक्त पेय टाळा.
व्यायाम करा: नियमित शारीरिक व्यायाम झोपेची गुणवत्ता सुधारतो.
मानसिक आरोग्य सांभाळा: ताण कमी करण्यासाठी योग, ध्यान किंवा समुपदेशनाचा आधार घ्या.
स्त्रिया आपल्या कुटुंबासाठी, करिअरसाठी आणि समाजासाठी झटत असतात. अशा स्थितीत आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास दीर्घकाळ गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. पुरेशी झोप म्हणजे स्त्रीचे सर्वांगीण आरोग्य आणि आयुष्याची गुणवत्ता टिकवून ठेवण्याचा सर्वात सोपा आणि नैसर्गिक मार्ग आहे. लक्षात ठेवा, झोप ही लक्झरी नाही, तर एक मूलभूत गरज आहे.

- डॉ. श्वेता राऊत मुळगावकर