रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणारे अपघात आणि कुटुंबांवर ओढवणारे संकट, ही आता नित्याची गोष्ट झाली आहे. बिघडलेले रस्ते हा अपघात नसून व्यवस्थेचा गुन्हा आहे. सुरक्षित प्रवासासाठी नागरिकांनी आता आवाज उठवण्याची वेळ आली आहे.

'अपघात होऊन महिला जागीच ठार, ओव्हरटेक करताना तीन गाड्यांचा झाला अपघात, रस्त्यांवर पडलेल्या खड्डांमुळे झाला अपघात' असे शब्द वर्तमानपत्रातून नेहमीच वाचायला मिळतात. या सगळ्याचे मुख्य कारण म्हणजे 'बिघडलेले रस्ते'.
रस्ता हा आपल्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा असा घटक. ज्याच्याशिवाय आपले जगणे अर्थहीन आहे. आपल्या दिवसाची सुरुवात आणि रात्रीचा शेवट हा त्या रस्त्याच्या सानिध्यातूनच होत असतो. मात्र, कधी रस्ते आपल्या स्वतःच्याच जीवावर आघात करतात.
आज प्रत्येक ठिकाणी रस्त्यांची अवस्था बिकट परिस्थितीमध्ये आढळते. यावर आवाज मात्र कोणीही उठवत नाही. याचे दुष्परिणाम रस्त्यावरून गाडी घेऊन जाणाऱ्या माणसाला सोसावे लागतात. म्हणजेच, रस्त्यावरून जाणारा माणूस अपघाताचे कारण ठरतो. कधी त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू होतो, कधी त्या व्यक्तीचे अवयव तुटून पडतात, तर कधी तो व्यक्ती उपचारादरम्यान नाहीसा होतो. मात्र या सर्वात कुठल्यातरी कुटुंबातील सदस्य कायमचा नाहीसा होऊन जातो. प्रत्येक अपघातामागे एक कुटुंब उद्ध्वस्त होते. कधी कुणाचा बाप जातो, कधी मुलगा, तर कधी एकमेव कमावता सदस्य. आपण फक्त म्हणतो 'अपघात झाला'. पण तो अपघात नव्हता तो व्यवस्थेचा गुन्हा होता. या सर्वाचा आपण कधी बारकाईने विचार केला आहे का? आपण म्हणत असतो की सगळीकडे रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे, सरकार त्यावर काही निर्णय घेत नाही. पण जेव्हा अपघात होऊन एखादा माणसाचा मृत्यू होतो, तेव्हा आपल्याला असा विचार पडतो का की तो मृत्यू झालेला माणूस आपल्या कुटुंबापासून नाहीसा झाला आहे? आणि त्या अपघाताचे नेमके कारण काय आहे?
आज प्रत्येक दिवसाला किमान चार - पाच अपघात होत असतात. या अपघातांचे मुख्य कारण म्हणजे खड्डे पडलेले व बिघडलेले रस्ते. पावसामुळे रस्त्यांना खड्डे पडतात त्या खड्ड्यांमुळे अपघात होतात, कधी गाड्यांच्या ओव्हरस्पीडमूळे अपघात होतात, तर कधी योग्य सिग्नल्स न पाळल्याने अपघात होतात. अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे आज प्रत्येक ठिकाणी भिषण अपघात होत आहेत.
जेव्हा पाऊस जवळ येतो तेव्हा रस्त्यांच्या कामाकडे वळले जाते. परंतु ते केलेले काम जास्त दिवस काही टिकत नाही. उलट काम केलेल्या रसत्याची परिस्थिती आणखी बिकट होते. सरकार दरवर्षी कोट्यवधी रुपये रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मंजूर करत असते, पण हे पैसे प्रत्यक्षात कुठे जातात? हे एक मोठे कोडेच आहे. कारण प्रत्येक वर्षी रस्ते बिकट अवस्थेत असतात. याचे घाव अपघात झालेल्या माणसांना सोसावे लागतात. आज रस्त्याच्या बाजूने चालणारा माणूस सुरक्षित नाही आहे. कारण, आज गाड्या इतक्या वेगाने चालवतात की सामान्य माणसाचे रस्त्यावर चालणे देखील घातक झालेले आहे. आपण नेहमी रस्त्यावरून जात असतो, पण आपण कधी या गोष्टीचा विचार करतो का की, आपण सर्वजण कष्टाचे पैसे कमवून कर भरतो मग रस्त्यांची दुर्दशा सुधारली का जात नाही? आपल्याला सुरक्षित रस्ते का मिळत नाहीत?
म्हणूनच, आज वेळ आहे ती आवाज उठविण्याची. केवळ रस्त्यांची तक्रार करून उपयोग नाही, आपण नागरिक म्हणून जबाबदारी घेतली पाहिजे. स्थानिक प्रशासनाकडे तक्रार नोंदवली पाहिजे, सोशल मीडियावर आवाज उठवला पाहिजे.आपण एकत्र आलो, तर कोणतीही व्यवस्था बदलू शकतो. या सर्व बिघडलेल्या रस्त्यांमुळे जे भयंकर अपघात होतात, त्यावर स्वतः आपण आवाज उठविण्याची गरज आहे.
कारण,
आपल्याबरोबर इतरांची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे,
रस्त्यांच्या अवस्थेवर आवाज उठवणे ही आज काळाची गरज आहे.
कित्येक लोक अपघातात मृत्यूमुखी झाले, त्यांचा विचार करून इतरांसाठी वाईट परिस्थिती बदलण्याची ही वेळ आहे.

- पूजा भिवा परब
पालये, पेडणे-गोवा