'वागळे' एका यशस्वी उद्योजकाची कहाणी

आजीच्या गोष्टींमधून साहित्य प्रवासाचा पाया रचला गेला. या कथांमधील एक खरे व्यक्तिमत्त्व म्हणजे गोव्याचे उद्योजक आणि दानशूर राजाराम नीलकंठ वागळे हे होते. त्यांच्या यशाची आणि निस्वार्थ सेवेची ही कहाणी.

Story: व्यक्ती एके व्यक्ती |
07th November, 11:32 pm
'वागळे' एका यशस्वी उद्योजकाची कहाणी

लहानपणी रोज रात्री मी आजीच्या कुशीत झोपत असे. याचे मुख्य कारण तिच्या गोष्टी हे होते. रोज एक तरी गोष्ट ऐकल्याशिवाय मला झोप येत नसे. कदाचित इथेच माझ्या साहित्य प्रवासाचा पाया रचला गेला असावा. असो, तर आजीच्या गोष्टीत नेहमीच राजकुमार, राजकुमारी आणि राक्षस यांचा भरपूर 'स्टॉक' असे. त्याचप्रमाणे कोणत्या वेळी कोणती गोष्ट सांगायची यात तिचा हातखंडा होता. सुट्टीत राजकुमाराच्या तर, परीक्षा सुरू झाली की मग ऐतिहासिक आणि बोधप्रद गोष्टींना ऊत येई. मग कोण कसा अभ्यास करून मोठा झाला, कोण आपल्या अकलेने पुढे गेला, असे भरपूर काही. जेणेकरून आम्ही खूप अभ्यास करावा, अशी कल्पना तिची होती.

अशा गोष्टीत एक गोष्ट 'कॉमन' होती, ती म्हणजे 'वागळ्याची गोष्ट'. खरे तर ती सत्य घटना होती, पण आजी तिचे गोष्टीत रूपांतर करून खूप रंगवून सांगायची. हळूहळू आम्ही मोठे झालो. मग आजोबांबरोबर कधीकधी मी जवळच्या शहरात बाजाराला जात असे. गाव तसे लहान, त्यामुळे अनेक गरजांसाठी शहरावर अवलंबून राहणे क्रमप्राप्त होते. त्या काळी वाहतुकीची साधने तशी कमी होती. बसचा एक फेरा सकाळी आणि थेट संध्याकाळी असायचा. आमच्या गावाला दोन बाजूंनी मायनिंगचा वेढा होता. त्यामुळे ट्रक भरपूर असत आणि तेच प्रवासाचे मुख्य साधन होते. शहरात गेल्यावर 'लिस्ट' प्रमाणे सामान घेतले की, मग आजोबांची पाऊले वरच्या बाजारात वागळ्यांच्या दुकानात वळायची. अर्थात दुकान म्हणजे आपण पाहतो तसे नव्हते, ते एखादे ऑफिसच असल्यासारखे होते. राजाराम नीलकंठ वागळे ऊर्फ कोकणीत ‘वागळो’. ते त्या दुकानाचे मालक. एक यशस्वी उद्योजक म्हणून प्रसिद्ध होते. आमचे आजोबा त्यांचे मित्र होते. शिकारीच्या आवडीतून त्यांची ओळख झाली, ज्याचे रूपांतर मैत्रीत झाले.

तर, असे हे राजाराम वागळे, वर सांगितल्याप्रमाणे एक यशस्वी उद्योजक होते. गौरवर्ण, अस्सल शेणवी चेहरा, त्याकाळी दुटांगी धोतर आणि कोट हा त्यांचा वेष असे. दुकान-कम-ऑफिसमध्ये ते बसलेले असत. आम्ही गेलो की ते लगबगीने बाहेर येत आणि माझ्या आजोबांचा हात धरून आतमध्ये घेऊन जात. त्यांच्याबरोबर आमचीही वरात असे. आतमध्ये नारळ, सुपारीच्या राशी असत. अनेक जण सुपारी निवडत बसलेले असत, तर कोणी नारळ सोलत असे. वागळे तसे मोठे दिलदार व्यक्ती होते. मला त्यांच्याकडे जाणे फार आवडायचे, कारण चहा. घरात लहानपणी आम्हाला जो प्यायला बंदी होती. पण आजोबा घरात कडक असले तरी, वागळेंच्या चहाला त्यांनी नकार कधीच दिला नाही, तसेच मलाही त्यांनी रोखले नाही.

राजाराम वागळे हे मूळतः मायनिंग 'कॉन्ट्रॅक्टर' होते. सावर्ड्याच्या आसपास असणाऱ्या अनेक मँगनीज खाणींवर त्यांचे ट्रक आणि 'मशिन्स' चालत. मूळ कोकणातील वागळे, त्यांचे वडील कामधंद्यानिमित्त गोव्यात आले आणि इथेच स्थायिक झाले. त्याकाळी मुंबई इलाख्यातून पोर्तुगीज गोव्यात येणे तसे सोपे नव्हते. त्यावेळेस आरोंदा ते किरणपाणी आणि खाडीतून कोळ्याच्या वेशात येऊन, ते गोव्यात कसे शिरले याची सुरस कथा वागळे नेहमीच सांगायचे. हुशार असूनही साधारण शिक्षण झालेले राजाराम, वडिलांप्रमाणे खाणीवर कारकून म्हणून कामाला लागले. पगार आणि 'ओव्हरटाईम' धरून कमाई तशी बरी होती, पण स्वभाव त्यांचा तसा हुन्नरबाज होता. मध्येच काहीतरी करण्याची सणक त्यांना येई, पण मार्ग सापडत नव्हता. त्यात शिकारीची भयंकर आवड होती. ओळखीने त्यांनी दुबार बंदूक मिळवली होती. आजोबांबरोबर ते अनेकदा शिकारीला जात असत. असेच एकदा सांगे भागात शिकारीला गेले असताना , त्यांची एका मुस्लिम व्यापाऱ्यांशी ओळख झाली. मैत्री झाली. वागळ्यांचे असे होते की, ते चटकन आपलेसे होत. त्याला त्यांचा स्वभावगुणच म्हणा ना! आणि फायद्याची व्यक्ती असेल तर लगेच मैत्री करत. पण एक मात्र खरे की, त्यांनी नात्याचा दुरुपयोग केला नाही. उलट आयुष्यभर त्यांनी ती नाती जपली. त्या नवीनच मित्र झालेल्या व्यापाऱ्याने त्यांना मार्ग दाखवला, "वागळे, 'क्या रखा है नोकरी मे?' अरे, ट्रक लाव 'माईन'मध्ये ", असे त्याने सांगितले. अर्थात त्याकाळी ट्रक घेणे तसे परवडणारे नव्हते. त्यात त्यांची मध्यमवर्गीय मानसिकता होती. पण त्या व्यापाऱ्याने जोर धरला. मग थोडी उसनवारी, थोडे गहाणवट असे करून एकदाचा ट्रक आला.

झाली सुरुवात! वागळ्यांचा हातगुण तसा चांगला होता. लोखंड त्यांना मानवले. एकाचे दोन, चाराचे बारा असे ट्रक त्यांनी उभे केले. शहरात एक जुने घर विकत घेतले. आता त्यांनी नोकरी सोडली होती. ट्रक पण 'ड्रायव्हर' चालवीत असत. मग फावल्या वेळात काय करायचे ? त्यांनी डोके चालवले आणि नारळ, सुपारीची घाऊक खरेदी-विक्री चालू केली. अमाप पैसा आला, घर भरून गेले. नाव होऊ लागले. एक मात्र खरे की, एवढे होऊनही वागळे स्थिर राहिले. कर्तृत्वाने मोठा हा माणूस मनाने निर्मळच राहिला. शहरात 'हायर सेकंडरी' शाळा चालू करायची होती. कसलेही आढेवेढे न घेता, त्याकाळी त्यांनी एकावन्न हजार रुपये दिले. इमारत डौलात उभीराहिली . आसपासच्या गरीब मुलांची फी ते भरत असत. एक मात्र, ते रोख मदत करत नसत. पण गरजूंना पुस्तके आणि इतर सामान ते स्वतः आणून देत. रोख पैसे दिले तर ते योग्य ठिकाणी वापरले जात नाहीत, असे ते नेहमीच म्हणत. दान हे सत्कारणी लागावे, यावर त्यांचा कटाक्ष होता. आणि ते बऱ्याच अंशी खरेही आहे.

घरी येणाऱ्या पाहुण्यांचा आदर-सत्कार नेहमीचाच असे. पण स्वतःचे जेवणाचे ताट वाढल्यावर पहिला प्रश्न पत्नीला करत , "तू जेवलीस का?". अहो, त्या जमान्यात आपल्या पत्नीबरोबर एकत्र गप्पा मारत जेवणारा पहिला माणूस मी पाहिला. आता तुम्ही म्हणाल, मी काय म्हणते आहे ? पण पूर्वी तशी परिस्थिती होती. वागळे हे सर्वार्थाने यशस्वी व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा मुलगा गणेश, म्हणजे आमचे गणेश काका. त्याने वडिलांचा वारसा समर्थपणे चालवला, अगदी त्याच पद्धतीने. नुकतेच, वागळेंनी उभारलेल्या 'हायर सेकंडरी'चे 'डिग्री कॉलेज' झाले आहे . गणेश काकांनी पन्नास लाख रुपये देणगी दिली. परवाच नामकरण सोहळा झाला. मोठा 'बोर्ड' लावला आहे, 'कै. राजाराम नीलकंठ वागळे महाविद्यालय'चा


- रेशम जयंत झारापकर

मडगाव, गोवा.